' त्या ' झाडाशी आमच्या भावना गुंतलेल्या आहेत !
यशवंतराव राजकारणी होते. राजकारणी लोक सहजासहजी भावनावश होत नाहीत. शह-काटशहांच्या लढाईत भावना दुर्लक्षिल्या जातात, पण यशवंतराव नेमके याला अपवाद होते. अत्यंत संस्कारसंपन्न व संवेदनशील असे मन त्यांना लाभले होते. माणसांवर तर त्यांनी प्रेम केलेच, पण निसर्गाचे सुद्धा त्यांना आकर्षण होते. त्यांच्या हळव्या मनाची ओळख करून देणारा हा प्रसंग.
१९३२ सालच्या २६ जानेवारीस यशवंतरावांनी व त्यांच्या सहका-यांनी कराडच्या टिळक हायस्कूलसमोरील एका कडुनिंबाच्या झाडावर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार तिरंगा फडकावला व पं. नेहरूंनी लाहोर काँग्रेसमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा केला. ' वंदे मातरम ' च्या घोषणा दिल्या. या कृत्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व अठरा महिने तुरूंगवासाची शिक्षा दिली. पुढे स्वातंत्र्याची चळवळ वाढतच राहिली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. यशवंतराव मंत्री झाले. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व यशवंतराव राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
पुढे देशाचे गृहमंत्री असताना १९६७ साली एका कार्यक्रमासाठी ते टिळक हायस्कूलमध्ये आले होते. त्यावेळी भाषण करताना ते म्हणाले, ' या समोरच्या लिंबाच्या झाडावर आम्ही मुलांनी तिरंगा फडकावला होता. त्या झाडाकडे पाहिल्यावर मला स्वातंत्र्यचळवळीचे ते रोमहर्षक दिवस आठवतात.शाळा चालकांना माझी विनंती आहे की, कृपया ते झाड पाडू नका. त्या झाडाशी आमच्या भावना गुंतलेल्या आहेत.'
' वृक्षवल्ली आम्हा सोयरी.... ' हा संत तुकारामांचा अभंग आळविणारे अनेकजण आहेत, पण साहेब तो अभंग प्रत्यक्ष जगत होते.