साहित्यिक आणि अभियंते
मराठी साहित्यिकांना त्यांच्या लिखाणाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. अनेक साहित्यिक आर्थिक विवंचनेत दिवस कंठत असतात. साठच्या दशकातही हीच स्थिती होती. विख्यात लघुनिबंधकार अनंत काणेकर तेव्हा विरारला रहात होते. एकदा मुंबईत एका कार्यक्रमात ते आणि यशवंतराव एकत्र होते. काणेकरांना त्या कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला. यशवंतरावांनी सहज कारण विचारले तेव्हा काणेकर म्हणाले, ' विरारहून यायला नेहमीच उशीर होतो. अनेकांची अवस्था माझ्यासारखीच आहे.' यशवंतराव मनाशी काही ठरवत होते. ते काणेकरांना म्हणाले, ' तुम्ही मला मराठी साहित्यिकांची यादी द्या. आपण त्यांना मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी घरे देऊ.' यशवंतराव असे फक्त म्हणाले नाहीत तर थोड्याच दिवसात ' साहित्य सहवास ' ही सुंदर वसाहत शासनाने निर्माण केली. अनेक साहित्यिक तिथे राहू लागले. एकदा यशवंतराव काणेकरांना म्हणाले, ' साहित्य सहवासमधील एक फ्लॅट शासनाचे मुख्य अभियंता दुर्गादास बोरकर यांच्यासाठी राखीव असू द्या. '
काणेकर म्हणाले, ' आम्हा साहित्यिकांमध्ये इंजिनिअर कशाला ?'
यशवंतराव हसून म्हणाले, ' अहो, साहित्यिक आणि अभियंत्यांमध्ये विशेष फरक नाही. तुम्ही साहित्यिक मंडळी शब्दावर शब्द मांडता. वेलांटीवर वेलांटी देता आणि अभियंता वीटेवर वीट रचतो, दगडावर दगड मांडतो. शेवटी दोघेही नवनिर्मितीच करतात ना ?' मग अचानक गंभीर होऊन यशवंतराव म्हणाले, ' या दुर्गादास बोरकरांनी सचिवालयाची इमारत आराखड्यापेक्षा ( बजेटपेक्षा ) छपन्न लाख रुपये कमी खर्चात बांधून दिली आहे. ही त्यांनी जनतेची केलेली सेवाच नव्हे काय ?'
काणेकरांना यशवंतरावांचे म्हणणे पटले व बोरकरांना ' साहित्य सहवास ' मध्ये फ्लॅट देण्यात आला. आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर समाजाच्या हितासाठी करणा-या लोकांना यशवंतरावांनी नेहमीच प्रोत्साहन व आधार दिला.