शांततेची हमी... !
सन १९५० नंतर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाची शक्ती वाढू लागली होती. १९५२ च्या निवडणुकीत एकदा बारामतीला काँग्रेसची प्रचारसभा होती. मार्केट कमिटीच्या मैदानावर सभेचे आयोजन केले होते. त्याकाळी बारामती भागात शे. का. प. व समाजवादी पक्षाचा प्रभाव होता. काँग्रेसच्या सभेत साता-याचे यशवंतराव चव्हाण बोलणार म्हणून जाहीर झाले होते. सभेमध्ये गोंधळ होणार या शक्यतेने गर्दी उसळली होती.
सभा सुरु होताच श्रोत्यांमध्ये गोंधळ सुरु झाला. काँग्रेसच्या प्रचारकांना बोलताच येईना. काय करावे कोणाला कळेना. इतक्यात आतापर्यंत व्यासपीठावर शांतपणे बसून समोरचा गोंधळ पाहणारे यशवंतराव उठले , माईकजवळ गेले आणि म्हणाले, ' बंधु - भगिनींनो, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाई उद्धवराव इंगळे याठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माईकसमोर यावे आणि आपली भूमिका मांडावी. ' काँग्रेसच्या प्रचारसभेत शे. का.प. च्या कार्यकर्त्याला भाषण करण्याची विनंती करण्यात आली, आणि ही विनंती कोणी केली ? तर ज्यांची प्रचारसभा आयोजित केली होती त्या यशवंतरावांनी !
समोरची परिस्थिती पाहून तात्काळ आणि अचूक निर्णय घेण्याची यशवंतरावांची ही खास पद्धत होती. उद्धवरावांचे भाषण सुरु झाले, त्यामुळे श्रोत्यांमध्ये असलेल्या शे. का. प. च्या कार्यकर्त्यांना गडबड करता येईना. परिणामी गोंधळ थांबला. त्यांचे भाषण संपल्यावर यशवंतराव उठून म्हणाले, ' उद्धवरावांचे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले आता मला माझे विचार सांगावयाचे आहेत. सभेमध्ये शांतता राखण्याची हमी मला तुमच्याकडून हवी आहे. ' या वाक्याचा परिणाम झाला. लोकांनी यशवंतरावांचे भाषण शांतपणे ऐकून घेतले.
आपल्या भाषणाने श्रोत्यांना जिंकणारे अनेक वक्ते असतात पण भाषणापूर्वीच्या भाषणाने श्रोत्यांना आपलेसे करणारे यशवंतराव महान वक्ते होते.