कलावंतांची कदर
संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या आंदोलनामध्ये आचार्य अत्रे यांच्या वाणीला व लेखणीला विलक्षण धार आली. आपल्या भाषणातून आणि ' मराठा ' मधून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. अनेकांचे वस्त्रहरण केले. परंतु यशवंतरावांची कुशाग्र बुद्धिमत्ता व शुद्ध चारित्र्य ते जाणून होते. त्यामुळेच यशवंतरावांना ते काहीसे दबकून असत. एकदा भाषणाच्या ओघात अत्रे म्हणाले, ' महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे मासळीबाजार ( मच्छीबाजार ) आहे. ' अत्र्यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ सुरू झाला. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी एक समिती नेमली व तिने या प्रकाराचा सांगोपांग विचार करून निकाल द्यावा असे ठरले.
काही दिवसांनी कमिटीने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये असभ्य व असंसदीय शब्द वापरल्या बद्दल अत्र्यांना एक महिना कैद व ५०० रु. दंड करावा अशी शिफारस केली होती. अत्र्यांना विधानसभेत बोलावून वॉरंट काढून निकाल त्यांच्या हाती द्यावा असे ठरले. त्यानुसार अत्रे विधानसभेत हजर राहिले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या टेबलावर कमिटीची शिफारस होती. त्यांनी सभागृहाला निकाल वाचून दाखवला व म्हणाले, ' खरोखरच, आचार्य अत्रे यांच्यासारख्या विद्वान माणसाने आपल्या पवित्र संसदेस असे म्हणायला नको होते. आपल्या सर्वांच्या भावना मी जाणतो. तेव्हा मला वाटते जेल शिक्षा काही करू नये, फक्त दंड करावा.'
त्याप्रमाणे ठराव करून अत्र्यांचा तुरुंगवास रद्द करण्यात आला.