• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

(कृष्णाकांठ)

Krishnakath
। कृष्णाकांठ ।

लेखक : यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र ( खंड पहिला)
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

प्रकरण पहिले - जडण घडण
प्रसिद्ध कवी श्री. गोविंदाग्रज यांची एक प्रख्यात कविता आहे. तिचे शीर्षक आहे 'कृष्णाकाठीं कुंडल'. 'कृष्णाकाठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं' अशी काहीशी त्या कवितेची ओळ होती. मी लहानपणी कविता वाचायला लागल्यापासून माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे. आणि ती आवडती का, तर कुंडल हे माझ्या आजोळच्या देवराष्ट्राच्या जवळचे दोन-तीन मैलांवरचे गाव. त्यामुळे ही कुंडलची कविता म्हणजे देवराष्ट्रातील कविता असे माझ्या मनाने घेतले. कृष्णाकाठी जसे कुंडल नव्हते व आजही नाही, त्याचप्रमाणे देवराष्ट्रही कृष्णाकाठी नव्हते व आजही नाही; पण तरीसुद्धा आम्ही सर्वजण स्वत:ला कृष्णाकाठची माणसे समजतो. त्याला कारण आहे. कृष्णेत आणि कुंडल किंवा देवराष्ट्र यांच्यामध्ये चार-दोन मैलांचे अंतर आहे. पण कृष्णाकाठच्या सुबत्तेची निदान सोबत तरी लाभली आहे, असा एक दिलासा आम्हां मंडळींना वाटत असे आणि म्हणून कृष्णेबद्दलचे प्रेम हे बाळकडूसारखे माझ्या मनात आहे.

सातारा जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराच्या कुशीत वसलेले देवराष्ट्र हे एक लहानसे गाव. गावाचा आसमंत ऐतिहासिक अवशेषांनी भरलेला. इथे लेणी आहेत, देवळे आहेत, गावाच्या नैऋत्येस महादेवाची पुरातन मंदिरे उभी आहेत. सर्वांत जुने देऊळ समुद्रेश्वराचे, म्हणजेच महादेवाचे. गाव त्याला 'सागरोबा' म्हणते. गावचे हे दैवत. डोंगरही सागरोबाचा. आसपासच्या टेकड्यांत ऋषी-मुनींच्या गुहा आहेत. असे म्हणतात, की देवराष्ट्र हे एका राज्याचे ठिकाण होते. सातवाहनाच्या राज्यानंतर महाराष्ट्रात जी अनेक लहानमोठी राज्ये उदयास आली, त्यापैकी एक देवराष्ट्र होय. या राज्याची राजधानी कौंडिण्यपूर, म्हणजे आजचे कुंडल होती, असे म्हणतात. देवराष्ट्राच्या राजाचे नाव कुबेर होते. अशीही कथा आहे. कुबेरेश्वराचे देऊळही इथे आहे.