• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ६४

मी अहमद कच्छी या मुसलमान मित्राबद्दल यापूर्वी थोडे लिहिले आहे. हा मित्र कायदेभंगाच्या चळवळीत काम करू शकणार नव्हता. तरीही त्याच्याशी माझी गाढ मैत्री जमली होती. त्याला देशासाठी काही तरी करावे, अशी हौस होती. पण स्वतःला अधिक काही करता येत नाही, तर निदान जे करतात, त्यांना साहाय्यभूत व्हावे, असे त्याला वाटे. ही त्याची मर्यादा पाहून त्याने शक्य तेवढेच करावे, असा मी त्याला सल्ला दिला. आमच्या दोघांच्याही वाचनाच्या आवडी-निवडी सारख्या होत्या. त्याला आवडलेली पुस्तके तो मला आणून देत असे. तो वर्षातून एक-दोन वेळा मुंबईस आपल्या नातेवाइकांकडे जात असे. त्या वेळी तो चांगली मराठी व गुजराती पुस्तके तेथून आणीत असे. त्याची मातृभाषा गुजराती होती. मला आठवते, १९३१ सालच्या मध्यावर मुंबईत त्या वेळी गाजत असलेले 'माझे रामायण' हे तुळजापूरकर यांचे पुस्तक तो माझ्यासाठी आठवणीने घेऊन आला. आज हे पुस्तक कोणाच्या लक्षात आहे, की नाही, हे मला माहीत नाही, पण त्या वेळी आम्हांला ते फार वाचनीय वाटले आणि आवडलेही. लेखनाची शैली आत्मकथेच्या स्वरूपाची होती. त्याच वेळी (माझी आठवण आहे, की) प्रसिद्ध व लोकप्रिय गुजराती कवी श्री. कलापि यांची काही कवितेची पुस्तकेही तो घेऊन आला. आठवड्यातील दोन-तीन तास त्यातील सुंदर कल्पना व सौंदर्यस्थळे तो गुजरातीतून मराठीत करून मला सांगत असे. माझ्यावर त्याचा लोभ होता. तो आमच्या हायस्कूलमधील अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. मी शिक्षण अर्धवट टाकून चळवळीत पडतो आहे, याची तो चिंता करीत असे. पण माझे करणे अयोग्य होते, असे मात्र त्याला वाटत नव्हते.

अशा या बदललेल्या वातावरणात आमच्या कराड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक २०-२२ जानेवारीच्या सुमारास तांबवे येथे आम्ही भरवली. त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यकर्त्यांमध्ये काशिनाथपंत देशमुख आणि राघूआण्णा लिमये हे प्रमुख होते. बैठकीत काही महत्त्वाचे कार्यक्रम ठरले. ग्रामीण भागात जंगल सत्याग्रह संघटित करावयाचा आणि जितके जास्तीत जास्त सत्याग्रही कारागृहात पाठविता येतील, तितके पाठवावयाचे, असा निर्णय झाला आणि त्याची जबाबदारी राघूआण्णा लिमये व काशिनाथपंत देशमुख यांनी आपल्यावर घेतली. माझ्यावर त्यांनी पहिली जबाबदारी टाकली, ती ही, की २६ जानेवारीचा दिवस हा सर्व ठिकाणी संस्मरणीय ठरेल, अशा रीतीने साजरा होईल, अशी योजना करावयाची. मी या कामाची जबाबदारी घेतली आणि कराडला परतलो. साधनांची थोडी-फार जुळवाजुळव केली आणि कराड तालुक्यातील प्रमुख गावी २६ जानेवारीला जाहीर झेंडावंदन व्हावे, अशा तऱ्हेची योजना आखली.

खुद्द कराड शहरातील २६ जानेवारीची तयारी करण्याचे काम मी माझ्या मित्रांच्या गटाकडे सोपविले. तालुक्याच्या महत्त्वाच्या चार-दोन गावांना कार्यक्रम संघटित करण्यासाठी मी दोन दिवसांची सायकल रपेट केली. दिनांक २५ जानेवारीला संध्याकाळी कराडला परत आल्यानंतर आखलेल्या कार्यक्रमाची कल्पना माझ्या मित्रांनी मला दिली. ती अशी, की शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी रात्रीचे झेंडे लावावयाचे. त्यांत म्युनिसिपल कचेरीवर तिरंगी झेंडा लावणे ही मुख्य कल्पना होती. आमच्या मित्रमंडळींनी कायदेभंगासंबंधी लिहिलेली पत्रके व गांधींच्या अटकेबद्दल सरकारच्या निषेधाच्या घोषणा रात्री गावातील प्रमुख ठिकाणी चिकटवायच्या व हायस्कूलमधल्या आम्ही मुलांनी हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या झाडावर झेंडा चढवून दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता झेंडावंदन करायचे. त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. एका गटाने रात्री ११ च्या पुढे गुप्तपणे जाऊन म्युनिसिपल कचेरीवर झेंडा चढविला. हे मोठे कठीण काम होते. पण म्युनिसिपालिटीचे रक्षकच आम्हांला सामील असल्यामुळे ते सोपे झाले. त्याचप्रमाणे सर्व गावामध्ये आणखी काही प्रमुख ठिकाणी झेंडे लावले. बुलेटिन्स् चिकटविण्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी म्हणून मी आणि तात्या डोईफोडे गावात हिंडत होतो. त्यावेळी कराड शहरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे चावडी-चौक, तात्या डोईफोडे त्या चौकात गेल्यानंतर बुलेटिन चिकटविण्याच्या कामात गुंतलेला असतानाच पोलिसांनी त्याला पाहिले व पकडले. असे काहीसे होईल, अशी अपेक्षा होतीच. त्यामुळे आम्ही त्याची फारशी चिंता केली नाही. आम्ही आमच्या दुस-या कामाला लागलो. दुस-या दिवशी सकाळी ८ वाजता ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या हायस्कूलच्या पटांगणातील झाडाभोवती जमलो. आमच्यापैकी एकाने झाडावर चढून झेंडा फडकाविला आणि आम्ही सर्वांनी ध्वजवंदन करून झेंड्याला सलामी दिली. 'वंदे मातरम्' च्या घोषणा दिल्या. नंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम समाप्त केला आणि आपापल्या घरी परतलो. परंतु शाळेच्या तपासणीसाठी आलेले एज्युकेशनल इन्स्पेक्टर समोरच्या बहुलेकरांच्या बंगल्यात मुक्कामास होते. त्यांनी आमचा झेंडावंदनाचा हा कार्यक्रम चालू असतानाच तपशीलवार पाहिला होता. त्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर शाळेच्या प्रमुख अध्यापकांकडे चौकशी सुरू केली.