• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ५०

मध्यम उंचीचे, काहीसे किरकोळ बांध्याचे, डोळ्यावर चश्मा आणि त्या पलिकडून पाहणारी त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर आली. अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि तितकेच स्वच्छ पांढरे सैलसे धोतर, पायांत साध्या वहाणा अशा या घरगुती वेषात ते होते.

त्यांनी आमचे कुशल विचारले, आमची नावे विचारली. मी अजून हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे, हे ऐकून त्यांनी कौतुकाने विचारले,
''एवढा लांब प्रवास कशासाठी केला, बाळ?''

मग राघू आण्णांनी आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, अशी माहिती दिली. बिळाशीच्या बंडाची हकीकत त्यांना सांगितली. आणि तेथे नुकतेच जाऊन आलो, तीही हकीकत सांगितली. तेव्हा सावरकरांच्या त्या तेजस्वी डोळ्यांत काहीसे हसू दिसले.

''मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही!'' खळखळून हसत ते म्हणाले,

थोड्या वेळाने ते म्हणाले,

'' तुम्हांला मला काही विचारावयाचे आहे काय ? ''

मी सांगितले,

''निदान मला काही विचारावयाचे नाही. मला फक्त आपणांस डोळे भरून पाहायचे होते.''

ते उठून माझ्याजवळ आले.

''माझ्यात बघण्यासारखे काय आहे? मी तुमच्यासारखाच माणूस. तुमच्या आधी काही वर्षे जन्माला आलो. देशसेवेचे व्रत घेतले आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असे काय आहे ? आमच्या पिढीने त्यांना जे योग्य वाटले, ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते, ते पाहायचे आहे.''

- आणि नंतर ते गंभीर होऊन खाली बसले.

त्यांना आठवण झाली नासिकच्या अनंत कान्हेरेची.
ते म्हणाले,

''तुम्ही मंडळी नेहमी मोठ्या संख्येने चांगले काम करता आहात. परंतु स्वातंत्र्य-आंदोलनासाठी जेव्हा कोणीच अवतीभोवती तयार होत नव्हते, तेव्हा एकाकीपणाने आम्ही हे राष्ट्रकार्य करीत होतो. त्यांतले अनंत कान्हेरे फासावर गेले. हल्लीचे तुम्ही लोक त्या बलिदानाला विसरला आहात, अशी मला उगीच हळहळ वाटते.''

राघूआण्णांनी सांगितले,
''आम्ही कसे विसरू? आपल्याकडूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी बलिदान केले, म्हणूनच आपले दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत.''