माझ्या लहानपणाच्या अनुभवाची ही पार्श्वभूमी आहे, त्यामुळे मला अशा स्तरांतील व परिसरातील मुला-माणसांबद्दल एक प्रकारचे कौतुक व जिव्हाळा आहे. मग ती कोणत्याही जातीची का असेनात, त्यांचे-माझे तेव्हाच जमून जाई. हा अनुभव मला माझ्या आजोळी आला. आणि हाच अनुभव मी कराडला शिक्षणासाठी स्थिर झालो, तेथेही आला. आजोळच्या घरी आमचा शेजार लहान, छोट्या जमातींतील माणसांचाच होता. सणगर, धनगर, मुसलमान, रामोशी यांचा शेजार हा माझ्या आयुष्यातील एक विशेष ठेवा आहे, असे मी नेहमीच मानत आलो आहे. त्यामुळे त्यांची घरे, त्यांची राहणी, त्यांच्या चालीरीती ह्या नकळत मला आपल्याच वाटत असत. माझ्या कल्पनेप्रमाणे, माझा हा त्यावेळचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेली भावनात्मक स्थिती ही मला पुढच्या आयुष्यात अतिशय उपयोगी पडली.
देवराष्ट्राला एखादे वर्ष शाळेत गेल्यानंतर मी पुन्हा कराडला शाळेत जाऊ लागलो. पण त्याच्या आधीच माझे वडील १९१७ सालच्या प्लेगमध्ये वारले. मी वडिलांच्या प्रेमाला वयाच्या चवथ्या वर्षी पारखा झाल्यामुळे त्यांचे मी पाहिलेले रूप, चेहरा-मोहरा, शरीराची ठेवण या गोष्टी मला फार स्पष्टपणे आठवत नाहीत. एक गोष्ट मात्र निश्चितपणे आठवते, ती त्यांच्या शेवटच्या आजारात ते कराडहून देवराष्ट्राला आले, तेव्हाची आहे. कराडला प्लेग सुरू झाला, म्हणून त्यांनी आपले सर्व कुटुंब, मुलेबाळे यांना देवराष्ट्राला आपल्या सासुरवाडीला पाठविले होते. आणि आमच्या मामांनी त्यांच्या लहानशा घरात ही सर्व कुटुंबीय मंडळी राहू शकणार नाहीत, म्हणून महिंद वाड्याच्या शेजारी असणा-या एका वाड्यातल्या दोन खोल्यांत आमच्या कुटुंबाची व्यवस्था करून दिली होती. आमच्या मामांच्या घरापासून हे घर तसे जवळ होते. त्यामुळे दिवसभर आम्ही मामांच्या घराच्या दाराशी रस्त्यावर खेळत असू. मी त्यावेळी चार वर्षांचा असेन.
असाच एकदा मामांच्या घरापाशी मी इतर मुलांशी खेळत असताना समोरून येणारे माझे वडील मला दिसले आणि मी धावतच जाऊन त्यांना बिलगलो. पण त्यांनी मला नेहमीप्रमाणे उचलून कडेवर घेतले नाही. त्यांनी माझा हात हाताशी घेतला आणि मला सांगितले,
''बाळ, आपण घरी जाऊ या. मला बरे नाही.''
मी त्यांच्या बोटाला धरून घरी आणले, आई-वडिलांचे काय बोलणे झाले, मला कळले नाही. परंतु आईने वडिलांना अंथरूण टाकून दिले आणि त्यावर ते पडले. मला कल्पना नव्हती, की त्यांचे ते शेवटचे अंथरुण असेल.
त्यांना अंथरुण घालून दिल्यानंतर माझी आई घाबरून गेली, दु:ख करू लागली. मला त्यातले काही एक कळत नव्हते. गावातल्या लोकांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे कल्पना आली, की काही तरी गंभीर प्रसंग आहे. पण त्याच्या परिणामाची मला मुळीच कल्पना नव्हती. मरण म्हणजे काय असते, हे मला माहीत नव्हते. एक-दोन दिवसांतच वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यातच ते मरण पावले. त्यांच्या शेवटच्या क्षणी आम्हां सर्व मुलांना घराबाहेर आणून, समोरच असलेल्या एका तुळशीच्या कट्टयावर घोंगडे टाकून त्यावर बसवले होते. थोडा वेळ मध्ये गेला आणि एकदम आम्ही आमच्या आईच्या दु:खाचा हंबरडा ऐकला. कावरीबावरी होऊन सर्व भावंडे तुळशीचा कट्टा सोडून घराकडे जाऊ लागलो. पण इतरांनी आम्हांला अडवले नि सांगितले,
''बाबांनो, येथेच थांबा, घरी जाऊ नका.''
ही आठवण आजही मला व्यथित करते. माझ्या आईची समजूत काढणे कोणालाच शक्य नव्हते. तिचा शोक अनावर होता. माझी आजी, मामा तिची समजूत घालत असले पाहिजेत, असे लांबून दिसत होते. माझ्या वडिलांची मला जी आठवण आहे, ती एवढीच.