• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ३६

पण हे सर्व प्रश्न आमच्या आवाक्याबाहेरचे होते.

मी हे सर्व अशासाठी सांगितले, की समाजाचे चित्र एक नवा अनुभव घेऊन बदलत होते, ते कशा प्रकारचे होते, त्याची कल्पना यावी, म्हणून. पण एक गोष्ट मात्र खरी, की कोणी तटस्थ असो किंवा कोणी मनातून विरोधी असो, देशात एक नवे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एक विलक्षण लोकजागृती झाली होती. आणि तिच्याविरूद्ध काही करावे, असे वाटणाऱ्यांच्या वृत्तीही कमजोर होत होत्या, बदलत होत्या. मी तर स्वतःला या चळवळीत मनाने लोटून दिले होते व प्रत्यक्ष कामालाही लागलो होतो. मी त्या कार्यामध्ये समरस झालो होतो.

या चळवळीच्या निमित्ताने आमच्या गावी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या काही मुलांची एक फेरी आली. 'आम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू' अशी सुरुवात करून गांधींच्या सत्याग्रहाची तत्त्वे सांगणारी गीते गात पहाटेच्या सुमाराला ते गावातून फेरी काढत. त्यांचे अनुकरण करायचे आम्ही ठरविले. आमच्या गावातील शेकडो मुले आणि मुली अशा प्रभात-फेरीत सामील होऊ लागली. सकाळी पाच वाजता ठरल्या ठिकाणी जमावे आणि वेगवेगळी गाणी म्हणत गावभर हिंडावे, असा तास, दोन तासांचा कार्यक्रम चाले. या निमित्ताने नवी गाणी तयार होऊ लागली. नवे कवीही निर्माण झाले. एक संपूर्ण नवीन चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

आमच्या कृष्णेच्या घाटावर होणा-या सभांत भाषण करण्यासाठी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे, तरुण, विद्वान, पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे एक आठवडाभर आले होते आणि तेथे त्यांची आठ-दहा भाषणे झाली. गावातील सर्व सुशिक्षित, व्यापारी आणि इतर मंडळी त्यांच्या भाषणाला तोबा गर्दी करीत असत. त्यावेळी त्यांचे वय तीस वर्षांचे होते. चेह-यावरती बुद्धिमत्तेचे प्रखर तेज होते. अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली शाल होती.

त्यांची ती व्याख्याने मी आजही विसरू शकत नाही. पारतंत्र्याची त्यांनी खूप नवी मीमांसा केली. स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला. ही शेवटची लढाई आहे आणि यात आपण सर्वस्वाचा होम केला पाहिजे, असे आवाहन केले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.

तर्कतीर्थांच्याप्रमाणेच एकदा या चळवळीच्या निमित्ताने श्री. काकासाहेब गाडगीळही भाषणासाठी कराडला आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रथम पाहिले. एका मोठ्या सभेत त्यांचे भाषण झाल्याचे मला आठवते. सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती. त्यावेळी लाऊडस्पीकर नसल्यामुळे वक्त्यास उंच आवाजात बोलावे लागे. काकासाहेब भाषणासाठी उभे राहिले आणि सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या शेवटच्या टोकावर नजर पोहोचेना, तेव्हा ते समोरच्या टेबलावर चढले व टेबलावर उभे राहून त्यांनी भाषण केल्याचे मला स्मरते. त्यांच्या भाषणात देशभक्तीचे आवाहन होते, नर्म विनोद होता, खट्याळ उपरोध पण होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीवर प्रखर टीका होती. काकांचे भाषण अत्यंत कळकळीचे आणि आवेशपूर्ण झाले. त्यांच्या शैलीदार वक्तृत्वाची व बेडर व्यक्तिमत्त्वाची कायमची नोंद झाली.

माझ्या मताने तर्कतीर्थांच्या भाषणांचा वैचारिक प्रभाव सामान्य माणसावर आणि विशेषतः तरुणांवर जास्त पडला. तर्कतीर्थांच्या भाषणाची शैलीच वेगळी होती. त्याला देशभक्तीची धार होती, विचारांची एक पकड होती. त्यांच्या पहिल्या भाषणातील पहिलेच वाक्य इतके नाट्यपूर्ण व अर्थपूर्ण होते, की ते आजही माझ्या ध्यानात आहे.