• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८९

हे सर्व वाचत असतानाच, जे राजकीय संस्कार घेऊन मी कोल्हापूरला आलो होतो, त्यांचा विकास कसा करावयाचा, हाही माझ्यापुढे प्रश्न होता. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वाहून घ्यायचे, हा तर निर्णय होताच, परंतु त्या  स्वातंत्र्याचा अर्थ काय, हे निश्चित करण्याची गरज होती. कोट्यवधी गरीब शेतकरी मागासलेपणात बुडून गेले आहेत, त्यांचे भवितव्य काय? माझ्यासारखी अनेक तरुण मुले शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे अंधारात आहेत, त्यांना डोळस करून एक नवी दृष्टी दिल्याशिवाय त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार नाही, त्याचे काय? अशा अनेक प्रश्नांचा मनात एकसारखा संघर्ष चालू होता. विसापूर जेलमधून बाहेर पडताना गांधीवादाबद्दलची आपुलकी आणि समाजवादासंबंधीचे आकर्षण या दोन भावना म्हणा किंवा हे दोन विचार म्हणा, घेऊन मी बाहेर पडलो होतो आणि माझ्या मनात जे हे विचार चालू होते, त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये वारंवार चर्चा करीत होतो. कोल्हापूर प्रजा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होता; पण त्यांचे प्रश्न वेगळे होते. समाजवादाची मीमांसाकरण्यासाठी काही अभ्यास-मंडळे सुरू करावीत, असे मी माझ्या जिल्ह्यापुरते ठरविले आणि त्यासंबंधी मी माझे प्रयत्न सुरू केले. श्री. आत्माराम पाटील बोरगावकर व राघूआण्णा लिमये हे याबाबतीत माझ्या अधिक जवळ होते. श्री. आत्माराम पाटील महिन्यातून एकदा तरी कोल्हापूरला येत. आमच्या अनेक विषयांवर चर्चा होत. जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची एक मित्रसंघटना उभी करण्याचा प्रयत्न करायचा निर्णय आम्ही घेतला. परंतु त्याचबरोबर काँग्रेस हाच आपला राजकीय पक्ष मानावयाचा व त्याच्या ध्येयधोरणाबाहेर ही संघटना न्यावयाची नाही, असे बंधन आपण स्वीकारले पाहिजे, अशी त्यांची व माझी चर्चा होत असे. त्याचप्रमाणे ते क्रियाशील राहिले.

पुढे नवे नवे मित्र जोडून ते त्यांना कोल्हापूरला घेऊन येत किंवा आपल्या गावी त्यांच्या बैठका ठरवून कोल्हापूरहून मला बोलावून घेत. हे मित्र-मंडळ बांधण्याचे आमचे हे क्रियाशील पाऊल पकड घेऊ लागले. त्यामुळे माझ्या मनाला उत्साह वाटू लागला.

शेतकरी कार्यकर्त्यांशी बोलताना समाजवादाचा विचार मांडला, तर त्यांना तो आवडत असे. कारण समाजवादाचा त्यावेळी जास्तीत जास्त जो अर्थ समजला होता, त्याची दोन अंगे होती. एक गरीब-श्रीमंत ही विषमता घालविणे आणि जे मागासलेले आहेत, त्यांना सर्व तऱ्हेच्या उन्नतीची संधी अधिकार म्हणून मिळवून देणे. त्यामुळे अवतीभोवती दिसणारी गरिबी आणि मागासलेपण यांमुळे दबून गेलेल्या त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर मला नवा उत्साह दिसून येई. काँग्रेस संघटनेत राहून समाजवादी मित्रांचा एक संघ बनवावयाचा व हळू हळू त्यांच्या मदतीने सर्व जिल्हा काँग्रेसच समाजवादी विचारांची करावयाची, अशी आमची इच्छा होती. आमच्या कामाची ही दिशा होती आणि एक-दोन वर्षाच्या प्रयत्नांनंतर त्याला काही रंगरूप येऊ लागले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढू लागला, पण त्यामध्ये काही अडचणीही येत होत्या.

माझे मित्र श्री. काशिनाथपंत देशमुख हे कट्टर गांधीवादी होते. त्या बाबतीत ते बिलकूल तडजोड करायला तयार नव्हते. गांधींच्या विधायक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीने ग्रामीण जीवनात शक्ती येईल, असा त्यांचा विश्वास होता. समाजवाद शब्द आम्ही दोन्ही मंडळी वापरीत होतो, पण प्रत्येकाची प्रेरणा, संदर्भ व अर्थ पूर्णतः वेगळा होता. ते जेव्हा असे प्रश्न उपस्थित करत, तेव्हा माझ्या मनात मोठा पेच पडे, की आपण आपल्या स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही ना? गांधींच्या राजकीय नेतृत्वावर माझी तेवढीच निष्ठा होती. त्यांच्या विधायक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना क्रियाशील ठेवण्याचा व जनसंपर्क साधण्याचा मार्ग साध्य होत होता, ही गोष्ट खरी, पण समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रूप घ्यायचे सामर्थ्य त्या कार्यक्रमात आहे, का नाही, याच्याबद्दल माझ्या मनात शंका असे. तशा तात्विक व वैचारिक चर्चा कार्यकर्त्यांच्या बैठकींतून रंगत असत. कधी कधी मतभेदाला ऊत येई. पण आमच्या मैत्रीत कधी बाधा आला नाही.

कोल्हापूरला माझ्या काही नवीन ओळखी होत होत्या. त्यापैकी एक म्हणजे श्री. बिडेश कुलकर्णी. हे कोल्हापूरला असताना त्यांची माझी भेट व ओळख झाली. ह्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ते मोठे विवादपटु होते. संभाषणातील स्पष्टोक्ती आणि विवाद घालण्यातली चतुरता यांमुळे त्यांच्याशी बोलताना आनंद होई. ते होते सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचे.