त्याप्रमाणे ते थोड्या वेळाने आम्हां दोघांना घेऊन काकासाहेबांच्या ऑफिसमध्ये गेले व आमची हकीकत सांगून ओळख करून दिली. मला पाहून काकासाहेबांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी सिंहासने या नावाने आलेले पत्र मागवून घेतले आणि सिंहासने यांना एक कागद देऊन त्यावर मजकूर लिहायला सांगितला. दोन्ही अक्षरांची तुलना करून ते म्हणाले,
''तुम्ही सांगता, हे खरे दिसते, आम्ही प्रसिद्ध केलेले हे पहिले पत्र कोणी तरी गैरसमज पसरविण्यासाठी पाठविलेले असावे.'' त्यांनी सिंहासन्यांना सांगितले, ''तुम्ही पुन्हा एक पत्र लिहून द्या. ते आम्ही प्रसिद्ध करतो.''
सिंहासने यांनी काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे एक पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले आणि पुढे योग्य वेळी ते पत्र 'ज्ञानप्रकाश'मध्ये प्रसिद्धही झाले.
मी ही आठवण अशासाठी सांगतो आहे, की वार्ताहर म्हणून काम करण्याच्या माझ्या हौसेचा येथे शेवट झाला. मी मनाशी म्हटले, पुन्हा आता हा उद्योग करायचा नाही. पदरचा टपाल-खर्च करून राष्ट्रीय चळवळीची प्रसिद्धी व्हावी, याकरता मी हा उद्योग आपल्या मर्जीने अंगावर घेतला होता. त्यात इतक्या आपत्ती, कटकटी आणि खटपटी असतील, याची मला कल्पना नव्हती. आणि विशेषतः, त्या उपसंपादकांनी ज्या पद्धतीने माझ्याकडे रोखून पाहिले होते, त्याची आठवण होऊन मी माझ्या मनाशी एकदम अस्वस्थ झालो होतो. अशा पद्धतीने माझ्या वार्ताहर-कारकीर्दीचा अंत झाला. पण एका नामवंत दैनिकाच्या प्रसिद्ध संपादकाला भेटून आपले म्हणणे त्याला मान्य करण्यात यशस्वी झालो, याचा काहीसा आंनदही होता.
या तऱ्हेने हे वर्ष चालले होते. महात्मा गांधी सप्टेंबर महिन्यात गोलमेज परिषदेसाठी लंडनला निघाले होते. त्यांच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरभरून येत असत. महात्मा गांधी कोणत्या जहाजाने जाणार, लंडनमध्ये कोठे उतरणार, लंडनच्या गरीब वस्तीत ते कसे राहणार, वगैरे बातम्या वृत्तपत्रांत वाचून आम्ही हरखून जात होतो. गोलमेज परिषदेला इतर पक्षांचे पुढारीही चालले होते. परंतु गांधीजींच्या जाण्यामागे जनसामर्थ्य होत. त्यामुळे सबंध हिंदुस्थान आणि माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडचेही लक्ष त्यांच्याकडे होते.
गोलमेज परिषदेच्या हकीकती वर्तमानपत्रांतून येऊ लागल्या व हळूहळू कळू लागले, की यातून फारसे काही फलदायी निष्पन्न होणार नाही.
वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी आपापल्या धर्माच्या किंवा जातीच्या हितसंबंधांचे प्रश्न तेथे उपस्थित केले. गांधीजींनी हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या प्रश्नावर भर दिला आणि काही तडजोड निघते का, असा प्रयत्न केला. गांधीजींच्या तेव्हाच्या भाषणाचे जे वृत्तांत वर्तमानपत्रांतून येत होते, त्यांवरून काँग्रेसची जी राष्ट्रीय भूमिका होती, तिचे ते प्रतिपादन करीत होते. ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींना त्यांनी हिन्दुस्थानच्या प्रतिनिधींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असाही सल्ला दिला. परंतु या सर्व गोष्टींचा काही उपयोग झाला नाही. यातून काही फलित निघेल, अशी जी आशा होती, ती जवळ जवळ संपली होती. त्यामुळे देशात पुन्हा सत्याग्रह-संग्राम सुरू होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी उत्तर प्रदेशातील किसानांची चळवळ संघटित करण्यात गुंतले होते आणि त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये दडपशाहीला प्रारंभ झाला होता.