तांबव्यामध्ये मला लोकांच्या उठावाचे एक नमुनेदार चित्र पाहायला मिळाले. काशिनाथपंतांची जनतेपुढे होणारी भाषणे मी ऐकली. त्यांमध्ये गांधींच्यावर असणारी त्यांची भक्ती, अहिंसेवरचा त्यांचा विश्वास, विधायक पद्धतीने देश बांधण्याच्या कार्यक्रमाची मनाची तयारी; त्यामुळे ते लोकांवर मोठा परिणाम करीत असत. तांबवे आणि आसपासच्या भागांतील लोकांचे काशिनाथपंत देशमुखांवर फार मोठे प्रेम होते. त्यांचा नेहमीचा व्यवसाय व्यापार होता. कराडच्या बाजारपेठेत त्यांचे दलालीचे दुकान होते. जनतेतून नेता निर्माण कसा होतो, हे मी प्रत्यक्ष या निमित्ताने पाहिले आहे. काशिनाथशेटजींनी माझ्यावर प्राथमिक कार्यकर्त्याच्या अवस्थेपासून फार प्रेम व कौतुक केले. मला आपल्या भागामध्ये नेऊन जनआंदोलनाच्या प्रक्रियांचे शिक्षण दिले.
हे जसे तांबव्यामध्ये घडले, तसेच इंदोली आणि मसूरमध्येही घडत होते. मसूरचे राघूआण्णा लिमये हे तर माझे कायमचे मित्र बनले. प्रथमतः त्यांची माझी तशी ओळख नव्हती. पण एके दिवशी कराडच्या घाटावरच्या सभेत हा तरुण मुलगा चिठ्ठी पाठवून, 'मला बोलायचे आहे' असे सांगून भाषणासाठी उभा राहिला. आणि त्याने भाषण केले, ते इतके मुद्देसूद, विचार इतके स्पष्ट आणि स्वच्छ, बोलण्यामधली कळकळ आणि स्वातंत्र्याविषयीची तळमळ ही इतकी उत्कट होती, की त्या माणसाकडे मी झपाट्याने आकर्षित झालो. मी जाऊन त्यांना दुस-या दिवशी भेटलो आणि त्यांची ओळख करून घेतली. मी कराडमध्ये काम करीत होतो, हे त्यांनी पाहिले होते. चार-आठ दिवसांत मी, ज्या भागात आमचे घर होते, त्या भागात राघूआण्णांसाठी एका सभेचे आयोजन केले आणि प्रथम मी बोललो. माझे भाषण ऐकून राघूआण्णा माझ्या गळ्यातच पडले. अधिक भावनाप्रधान भाषण होते. त्यानंतर राघूआण्णांचेही भाषण झाले आणि ती सभा संपली. पण त्या दिवसापासून आमची दीर्घ मुदतीची मैत्री सुरू झाली.
राघूआण्णा पुढे १९६२ मध्ये मोटर अपघातात निधन पावले. त्या दरम्यानच्या बत्तीस वर्षांमध्ये त्यांची माझी मैत्री अखंड राहिली. आम्ही दोघांनी कित्येक दिवस एकत्र जेलमध्ये काढले. त्याची हकीकत योगायोगाने पुढे येईल; पण इतका मनमोकळा, प्रेमळ, ग्रामीण जनतेशी शंभर टक्के एकरूप झालेला असा कार्यकर्ता मी कधीच पाहिला नाही. एक नमुनेदार कार्यकर्ता आणि जिव्हाळ्याचा मित्र म्हणून मला त्यांची नित्य आठवण राहील.
अशा तऱ्हेने चळवळ वाढत होती. माझी मित्रांची संख्याही वाढत होती. नवी जिव्हाळ्याची नाती निर्माण होत होती. आणि या सर्व मंतरलेल्या वातावरणात मी कसा बुडून गेलो होतो. या कार्यकर्त्यांपैकी काही लोक माझ्या घरी येत. माझ्या आईशी त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी काशिनाथपंत आणि राघूआण्णा या दोन्ही कार्यकर्त्यांवर माझी आई आपल्या मुलासारखेच प्रेम करी. तेही तिला आईच म्हणत. यामुळे आमच्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी माझी आई आणि योगायोगाने आमचे घर समरस होत गेले. त्यामुळे मला घरची मोठी अडचण पडली नाही. गणपतराव जरी आपले काम करत होते, तरी त्यांची आम्हांला सहानुभूती होती. आणि एक प्रकारे त्यांना मी जे करतो आहे, त्याबद्दल अभिमान वाटत होता. लोकांमध्ये माझ्या वयाच्या मानाने मी बरीच मान्यता पावत होतो, हे पाहून त्यांना आनंदच होत असला पाहिजे, असे मला वाटते.
या चळवळीत अधिक संघटित असा उठाव झाला, तो बिळाशी हा शिराळे पेट्यातील वारणेच्या काठचा जो प्रसिद्ध भाग आहे, तेथे ख-या अर्थाने झाला. श्री. बाबूराव चरणकर आणि साथी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तेथल्या जवळजवळ चाळीस गावांतील पाटील मंडळींनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले. जंगल-सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि एका अर्थाने त्या भागातील ब्रिटिश सरकारचा अंमल संपला, अशी परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना त्या भागामध्ये मोकळ्या मनाने हिंडताही येईना. सरकारी प्रसिद्धीप्रमाणे 'बिळाशीचे बंड' असे त्याला नाव दिले गेले. ते काही सशस्त्र बंड नव्हते. लोकांनी शांततेचा अवलंब करून सरकारशी सहकार्य करायचे नाही, असे ठरवले होते. ब्रिटिश राज्याचा जो कारभार चालत होता, त्याची खुबी ही होती, की त्यांनी लोकांच्या मनात त्यांच्या सत्तेबद्दल एक प्रकारचे भय निर्माण केले होते. आणि खेड्यापाड्यांतून पाटील, तलाठी आणि पोलिस यांच्या सहकार्याने त्यांनी आपल्या राज्याचा डोलारा उभा केला होता. बिळाशी परिसरातील त्या चाळीस-पन्नास गावांत राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. पाटील-तलाठ्यांना लोकांचे सहकार्य मिळेना, म्हणून त्यांनी राजीनामे दिले होते.