• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१६५

''मला काही होणार नाही. तू काळजी करून नकोस. आता तू आपल्या प्रकृतीची काळजी घे आणि फलटणमध्ये फार वेळ न थांबता कराडला आईकडे जा.''

तिची प्रकृती बरी नव्हती. पण तिने माझ्या अटकेचा झालेला प्रकार मोठ्या धैर्याने सहन केला आणि त्या रात्री फलटण संस्थानने बांधलेल्या नव्या जेलखान्यामध्ये पहिला राजबंदी म्हणून माझा मुक्काम झाला.

आश्चर्य असे, की त्या रात्री मी जेलमध्ये गाढ झोपी गेलो. दहा महिन्यांचे माझे भूमिगत जीवन संपुष्टात आले होते. माझ्या जबाबदा-या आणि चिंता संपल्या होत्या. आता सरकारच्या हाती काय असेल, आणि ते जे करतील, ते पाहत राहायचे, असा मोकळा विचार माझ्या मनात येऊन गेला.

तिस-या दिवसापासून सातारा जिल्हा आणि पुणे सर्कलमधील सी. आय्. डी. चे प्रमुख पोलीस अधिकारी माझ्या उलट तपासणीसाठी मला येऊन भेटू लागले. मला वाटले होते, हे वरिष्ठ अधिकारी मला काही हुशारीने प्रश्न विचारतील. त्यांना काही राजकीय विचारांची पार्श्वभूमी असेल, असा माझा समज होता, परंतु त्यांचे प्रश्न मला निर्बुद्धपणाचे वाटले. चळवळीत कामे करणा-या माणसांची नावे विचारणे, त्यांची ठिकाणे विचारणे असे अगदी मामुली प्रश्न ते मला विचारीत बसले होते.

मला वाटले होते, ते या चळवळीचे रूपांतर कसेकसे होत आहे, वगैरे त्यांना जाणून घेण्याची इच्छा असेल; पण तसे काही दिसले नाही. त्यामुळे माझी सोय झाली. ते माझा छळ करतील, अशी शंका मला वाटत नव्हती. परंतु कोण जाणे, त्यांच्या मनात आले, तर ते काहीही करतील, असे केव्हा तरी मनात येऊन जाई. पण शेवटी तसा काही प्रकार झाला नाही. मी जेलमध्ये आहे, असे समजल्यानंतर कराडहून आई मला भेटायला आली. मी जेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विनंती केली, की मी जेव्हा माझ्या आईला भेटेन, तेव्हा तेथे कोणी हजर असता कामा नये. ती दु:खाने भरून गेलेली आहे. तिला मोकळे व्हायचे आहे. म्हणून तेथे कोणी तिसरा माणूस असणे बरे नाही. तो जेलचा अधिकारी माणुसकी असणारा होता. त्याने सांगितले, की मी तशी व्यवस्था करतो. मी जवळ जवळ सहा महिन्यांनी आईला भेटत होतो. दादांच्या मृत्यूचे दु:ख तिने आकांत करून हलके केले. मी तिची समजूत घातली. माझी प्रकृती बरी आहे, असे पाहून आईला त्यातल्या त्यात समाधान झाले आणि या दु:खात मी इतके दिवस माझ्या आईला भेटलो नव्हतो, ही जी माझ्या मनाला लागून राहिलेली टोचणी होती, ती कमी झाली.
आठ-दहा दिवस मला फलटणच्या जेलमध्ये राहावे लागले. नंतर ते मला सातारा जेलमध्ये घेऊन गेले. माझ्यावर खटले भरावे, की मला स्थानबद्ध म्हणून पाठवावे, असा काही तरी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद चालू होता, असे मला नंतर कळले. जवळ जवळ दोन आठवडे मी सातारच्या जेलमध्ये राहिलो. त्या जेलमध्ये असलेले जिल्ह्यातले बरेचसे कार्यकर्ते सत्याग्रही भेटले. पण अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुणाच्याही संगतीत ठेवले नाही. नुकतेच पकडलेले, दरोडेखोर म्हणून नामांकित असलेले म्हातारबा रामोशी कोतावडेकर यांच्या खोलीत मला त्यांनी ठेवले.

म्हातारबा रामोशी यांचे नाव मी ऐकून होतो. माझ्यापेक्षा पाच एक वर्षांनी ते वयाने मोठे होते. किंचितसा सावळा वर्ण, सहा फुटांपेक्षा जास्त उंची, अंगकाठी सडसडीत, बोलणे अतिशय प्रौढ, अंगावरचे कपडे पांढरे स्वच्छ, ब्राह्मणी पद्धतीने नेसलेले धोतर हे त्या माणसाच्या पोशाखातील वैशिष्ट्य पाहून मला मोठी मजा वाटली. दोन दिवसांत त्यांच्या माझ्यात मैत्री झाली. मी म्हातारबांना त्यांच्या धंद्यातील कौशल्याबद्दल काही प्रश्न विचारले. माझेही नाव ते ऐकून होते. त्यांनी माझ्याजवळ फार मोकळे निवेदन केले. ते चौघेजण भाऊ होते. दरोडे टाकण्याचे त्यांचे काम पिढीजात चालू होते. त्यांनी मला त्यांच्या धंद्याचे काही नियम सांगितले आणि मला आश्चर्य वाटले, की दरोडे घालण्यातसुद्धा काही नियम असतात. ते नियमाने कायदे मोडतात ! हा एक मला नवा अनुभव होता. त्यांनी सांगितले, की दरोडा घालण्यापूर्वी पंचांग पाहून ते दिवस ठरवीत असत, दिशा ठरवीत असत आणि मग योग्य त्या ठिकाणी पाहणी करीत असत. पण ठिकाण ठरविताना त्यांचा एक महत्त्वाचा नियम असा होता, की ज्या पोलीस स्टेशनखाली त्यांचे गाव आहे, त्या, आणि शेजारच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन दरोडे घालावयाचे. स्त्रियांच्या अंगावर हात टाकावयाचा नाही आणि दरोड्यातून मिळालेल्या मिळकतीपैकी चवथा हिस्सा गोरगरिबांना वाटून टाकावयाचा. हे सर्व नियम त्यांनी दोन पिढ्या तरी पाळले होते.