• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१६

या रितीने काही सार्वजनिक काम प्रत्यक्ष करण्याला माझी सुरुवात झाली आणि त्यामुळे वेगवेगळ्या माणसांशी संबंध आले. गावात मी सर्वत्र ओळखला जाऊ लागलो. आपण एक सार्वजनिक कार्यकर्ता आहोत, याची मलाही जाणीव होऊ लागली. यासाठी वाचन केले पाहिजे, अधिक समजून घेतले पाहिजे, अशा भावनेने प्रयत्नशील राहिलो.

या सुमाराला मी माझी मराठी सातवी पास करून, कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये एका वर्षात तीन इयत्ता पास करण्याचा कोर्स पुरा करून हायस्कूलचा विद्यार्थी बनलो. एक वेगळे क्षेत्र, वेगळी माणसे आणि एका वेगळ्या वातावरणात मी आलो. या सुमाराला माझ्या वाचनाची सवय पक्की झाली, अशी माझी आठवण आहे. लायब्ररीतून आणि मित्रांकडून हरिभाऊ आपट्यांच्या कादंब-या आणून वाचायला सुरुवात केली. आणि पुस्तकांचा नाद सुरू झाला. मिळेल तेथून पुस्तक घ्यावे आणि ते वाचावे, असा सपाटा मी सुरू केला. वाचनाची आवड निर्माण झाली, हे खरे; पण त्यामध्ये फारशी शिस्त नव्हती. काय वाचावे आणि काय वाचू नये, याचे कोणी मार्गदर्शन करीत नव्हते. त्यामुळे जे हाताशी येईल, किंवा कोणी उत्तम आहे, अशी शिफारस करील, किंवा जे आवडेल, ते मी वाचत होतो. पण पुढे जसजसा काळ गेला, तसतसा मग माझा मीच आवडीने काय वाचावे आणि काय वाचू नये, हे ठरवू लागलो. 'विजयी मराठा' आणि 'राष्ट्रवीर' या मर्यादित वाचनाच्या कक्षेबाहेर गेलो होतो. आणि माझ्या वयाच्या मनाने मी अधिक गंभीर लेखन वाचायचा प्रयत्न करीत होतो. केळुसकरांनी लिहिलेले 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' मी मन लावून वाचले. तसेच शिवरामपंत परांजपे यांचे ''काळा'तील निबंध'' मी वाचण्याचा प्रयत्न केला.  केळुसकरांचे मराठी सरळ, साधे होते, ते समजत गेले; पण शिवरामपंत यांचे मराठी हे मोठे अवघड वाटत असे. खरे म्हणजे त्यांचे मराठी हे एका अर्थाने संस्कृतच होते. आणि संस्कृतचा मला गंध नसल्यामुळे त्यातली महत्त्वाची सौंदर्यस्थळे मला फारशी समजत नसत. पण विचांराचा धागा धरून मी ते वाचन सुरू ठेवले.

या वाचनानंतर माझ्या मनावर आणि विचारांवर काही वेगळे संस्कार झाले आणि त्यांमुळे मी माझे बंधू गणपतराव यांच्याशी अधिक चर्चा करू लागलो, वाद घालू लागलो. श्री. भाऊसाहेब कळंबे यांच्या 'विजयाश्रमात' त्यांनी घेतलेले त्यांचे संस्कार आणि माझे संस्कार यांत फरक पडत चालला होता. मी त्यांना पेचात टाकणारे प्रश्न विचारू लागलो. बहुजन समाजाने शिकले पाहिजे, हे खरे, पण ते कशासाठी ? निव्वळ नोकरीसाठी, की देशासाठी काही विशेष करण्यासाठी? असे माझे साधे, सरळ प्रश्र असत. निव्वळ ब्राह्मणांना विरोध करून बहुजन समाजाचे हित कसे होईल? या माझ्या प्रश्रांना समाधानकारक उत्तरे मिळत नसत. त्यांची एक बाजू ते अशी सांगत असत, की ब्राह्मणांचा द्वेष केलाच पाहिजे, असा आग्रह नाही; पण सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक बाबतींत या मडंळींनी इतर समाजाची गळचेपी केलेली आहे, यातून मुक्त नको का व्हायला ? आणि या संदर्भात एके दिवशी त्यांनी मला वऱ्हाडमधील पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले महात्मा ज्योतिराव फुले यांचे एक छोटे चरित्र वाचायला दिले. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत लिहिलेले महात्मा फुल्यांचे हे पहिलेच चरित्र होते. माझे बंधू म्हणाले,

''तू हे वाच. मग आपण त्यानंतर बोलू.''

त्यांना 'विजयाश्रमात' महात्मा फुल्यांच्या विचारांची जी शिकवण दिली गेली होती, तिच्या आधारावर ते बोलत होते. महात्मा फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे, असे मलाही वाटले. त्यांनी उभे केलेले काही प्रश्र तर निरूत्तर करणारे होते. शेतकरी समाजाची होणारी पिळवणूक, दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजन समाज व स्त्रिया यांचे प्रश्र सोडविल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही, हा त्यांच्या विचारांचा सारांश माझ्या मनामध्ये ठसला.