• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१५५

जवळ जवळ तासभर डॉक्टर लोहिया आणि माझी ही बैठक झाली आणि त्यांचा माझ्यावर जो परिणाम झाला, तो लोकनेता कसा असावा, याचे मूर्तिमंत चित्रच मी त्यांच्या रूपाने पाहिले, असे माझ्या मनाने घेतले. त्यांची भेट प्रयत्नांती पण होऊ शकते, हे विशेष होते. भूमिगत अवस्थेत असताना जर कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना भेटता आले नाही, तर त्या पुढाऱ्यांची गरज काय आहे, असा काहीसा विचार माझ्या मनाशी येऊन गेला. त्यांनी केलेले विचारांचे मार्गदर्शन फार उपयुक्त होते. ते मनाशी मी जोखून पाहिले आणि त्याचा मनाशी साठा केला.

त्यानंतर श्री. आण्णासाहेबांच्याकडून निरोप आला, की 'चार-दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक होणार आहे, तेव्हा दोन-चार दिवस मुंबई सोडून जाऊ नका.' मीही मुंबईच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या वर्तुळात रंगून गेलो होतो. मुंबई शहरच आपल्या या राजकीय चळवळीचे केन्द्र व्हावे, असेही मनात येऊन गेले. चार दिवसांनी श्री. आण्णासाहेबांच्याकडून निरोप आला, की 'त्यांचा कोणी एक स्वयंसेवक माझ्या राहण्याच्या ठिकाणी येऊन मला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी मी त्या सभेला यावे.' आणि त्या संध्याकाळी पाच वाजता त्यांचा स्वयंसेवक मला घेऊन जाण्यासाठी आला. त्या वेळी क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूला मी राहत होतो. तेथून काही वेळ ट्रामने, पुढे बसने असे आम्ही माहीमपर्यंत गेलो. तेथून चालत एक-दोन वेडीवाकडी वळणे घेत सहा-सव्वासहाच्या सुमाराला एका टुमदार घरात आम्ही प्रवेश केला. तेथल्या बैठकीच्या जागेमध्ये श्री. आण्णासाहेब होते आणि त्यांच्याबरोबर आणखी आठ-दहा माणसे होती. त्यांनी माझी तेथल्या मंडळींशी ओळख करून दिली. अर्थात या ओळखीमध्ये धारण केलेली नावे खोटी किती आणि  खरी नावे किती, याचा मला काही अंदाज आला नाही. मी मात्र माझे खरे नाव सांगितले आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ता आहे, असेही सांगितले. अर्थात लोक मला नावाने चांगलेच ओळखत होते. सातारच्या चळवळीचे हळूहळू नाव काढत होते. त्यामुळे लोकांनी मला माझे अनुभव विचारले. त्यापूर्वी आणखी चार-दोन नवी मंडळी त्यांत येऊन दाखल झाली. तेथे आलेल्या लोकांपैकी एक नाव माझ्या चांगले लक्षात आहे. आणि ते म्हणजे कुलाबा जिल्ह्यातील श्री. कोतवाल यांचे - जे पुढे हुतात्मा कोतवाल म्हणून प्रसिद्ध झाले. तेथे बसलेल्या मंडळींमध्ये सर्वांच्या पाठीमागे भिंतीला टेकून शांतपणे बसणारे हे साधे गृहस्थ मी पाहिले. त्यांनी मला एक-दोन प्रश्न विचारल्याचे स्मरते. विशेषत: 'युद्धप्रयत्नांच्या विरोधी घातपाताचे जे कार्यक्रम आखले जातात, त्याच्यासाठी ट्रेनिंगची वगैरे व्यवस्था तुम्ही काय करता,' असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. मी त्यांना सांगितले,

'किर्लोस्करवाडी आणि ओगलेवाडी या कारखान्यांत काम करणारे बरेचसे कामगार आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अंगच्या कौशल्यावरच आमचा भर आहे. याच्यापेक्षा तांत्रिक स्वरूपाचे शिक्षण देण्याचे कार्यक्रम आमच्याकडे आम्ही अजून घेतलेले नाहीत. आमचा सर्व भर काम करणा-या माणसांच्या धैर्यावार आणि साहसावर अवलंबून आहे.''

जेथल्या तेथल्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे हे कार्यक्रम करावे लागतात, असे सर्वांचे मत पडले. ती दहा-पंधरा माणसांची बैठक जवळ जवळ दोन तास चालली होती. तीमध्ये झालेली एक चर्चा मला आठवते. ती म्हणजे त्यातल्या एका कार्यकर्त्याने उठून ग्रामीण भागामध्ये सरकारच्या हातामध्ये वाटणीसाठी धान्य जाऊ देता कामा नये, अशी काही योजना आखली पाहिजे, असा विचार मांडला होता. विचार मी समजू शकतो, पण त्याची अंमलबजावणी कशी करावयाची, असा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा रशियात जर्मन आक्रमणापुढे शरण जाण्यापूर्वी सर्व पिके जाळून टाकण्याचा (Scorch the earth) जो कार्यक्रम घेतला होता, तोच येथे घेतलेला बरा, अशी त्यांची सूचना होती. आणि त्या वेळी या प्रमुख केंद्राकडून जी सूचना-पत्रके आली होती, त्यांत या योजनेचा उल्लेख होता, याची मला आठवण आहे. मी या कल्पनेला अत्यंत स्पष्ट शब्दांत विरोध केला. मी सांगितले,
''ही अत्यंत अव्यवहार्य अशी योजना आहे. उभी पिके आहेत, ती काही ब्रिटिश सेनेसाठीच नाहीत. ती हिंदुस्थानातील जनतेसाठी आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी आहेत. पिके जाळण्याचा कार्यक्रम हाती घेणे म्हणजे लोकांशी लढाई सुरू करणे असा त्याचा अर्थ होईल आणि लोक आपल्याबरोबर न येता उलट सरकारला मदत करतील. वर्तमानपत्रांत वाचलेल्या पुस्तकी कार्यक्रमांचा अवलंब करून ही चळवळ चालविता येणार नाही.''

''मी तरी निदान या कार्यक्रमाशी सहमत राहणार नाही. आणि या विचारांचा प्रचार करणार नाही. कोणी तसे जर करीत असेल, तर मी हा न व्हावा, असाच प्रयत्न करीन. त्यामध्ये अंतिमत: लोकलढ्याचे नुकसान आहे, अशी माझी खात्री आहे.''