• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१४८

पुढे तीन महिन्यांनंतर त्यांनी आपला दिलेला शब्द खरा केला आणि श्री. छन्नूसिंग, पांडू मास्तर वगैरे इतर मित्रांसह ते येरवडा जेल फोडून बाहेर आले. किसन वीर जेल बाहेर येऊन जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये आले, तेव्हा त्यांना प्रथम कराडच्या आसपास आणण्याची व्यवस्था मी केली होती आणि त्यांना भेटून त्यांच्या गैरहजेरीत सातारा जिल्ह्यात काय काय घडले, याची हकीकत मला जशी माहीत होती, तशी त्यांना सांगितली.

भूमिगत चळवळ ही आरंभी जनतेची चळवळ म्हणून उघडपणाने चालली होती. तिचे मूळ स्वरूप आता बदलू लागले. गनिमी काव्याची ती चळवळ बनली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला आम्ही सुद्धा जे उघडपणाने हिंडण्या-फिरण्याचा प्रयत्न करीत असू, ते आता गुप्त जागा शोधून तेथे मुक्काम करण्याचा प्रयत्न करू लागलो. अशी परिस्थिती सुरू असताना रेठरे बुद्रक येथे श्री. शरदराव ढवळे यांच्या मळ्यात आम्ही कार्यकर्त्यांची एक फार महत्त्वाची बैठक बोलावली. अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते तेथे जमले होते. श्री. शरदराव ढवळे यांनी फार मोठा धोका पत्करून त्याच गावचे सखाराम दाजी या माझ्या मित्राच्या साहाय्याने या बैठकीची तयारी केली होती.

या बैठकीत काशिनाथपंत देशमुख, तासगावहून कुऱ्हाडे आणि माझे फार वर्षांचे मित्र श्री. धुळाप्पा नवले, वाळवे तालुक्यातील श्री. बरडे व कासेगावकर वैद्य, पाटणहून विठ्ठलराव घाडगे, कराड तालुक्यातील सर्व प्रमुख सहकारी - विशेषत: शांताराम इनामदार, पेंढारकर, व्यंकटराव माने, माधवराव जाधव आणि इतर बरेचजण हजर होते.

आम्ही तिथे ज्या चर्चा केल्या, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची ही बैठक फार महत्त्वाची होती. जवळ जवळ दीड महिन्यात झालेल्या चळवळीचा आढावा घेण्यात आला. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या गटांचे प्रतिनिधीही या बैठकीत हजर होते. त्यामुळे बैठकीला एक प्रकारचे प्रातिनिधिक स्वरूप आले होते. या बैठकीमध्ये पहिला विचार जो मांडला गेला, तो असा, की मोर्च्याच्या चळवळीने जनतेच्या भावनेचा उद्रेक जरी व्यक्त झालेला असला, तरी त्यामध्ये मनुष्यहानी होते. तेव्हा अशा स्वरूपाचे कार्यक्रम पुन्हा हातांत घेऊ नयेत. सरकारी गोळीबाराला माणसे बळी जाऊ देता कामा नयेत. जरूर पडली, तर मग गोळीला गोळीने उत्तर देण्याची तयारी असल्याशिवाय असे कार्यक्रम अंगावर घेऊ नयेत.

युद्धप्रयत्न कमजोर करण्याच्या दृष्टीने घ्यावयाचे कार्यक्रम व त्याबद्दलचा दृष्टिकोन यावर पुष्कळ मनमोकळी चर्चा झाली. युद्धोपयोगी साहित्य घेऊन जाणा-या मालगाड्या रोखण्याचा प्रयत्न करणे किंवा रेल्वे-रस्ते बंद करणे किंवा रेल्वे-स्टेशनची नासधूस करणे किंवा पोस्ट खात्याचे काम बंद पाडता येईल, अशी तजवीज करणे अशा तऱ्हेचे कार्यक्रम हाती घ्यायला हरकत नाही, असे स्पष्टपणे मांडले गेले.

गोळीबारात मनुष्यहानी होऊ देता कामा नये, या मताशी मीही सहमत झालो होतो. पहिले पाऊल म्हणून मोर्च्याचा कार्यक्रम आवश्यक होता. परंतु त्याची पुनरावृत्ती करण्याचे काही प्रयोजन नाही, असा सर्वांचा सूर होता. अर्थात त्यांत मीही सहभागी होतो.
काही कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये अहिंसेच्या प्रश्नाचा उच्चार केला. आपण अहिंसेचा त्याग कसा करू शकतो? हा मुद्दा उपस्थित केला. मी स्वत: या मताला आलो होतो, की अहिंसेची व्याख्या या लढ्याच्या कार्यक्रमासाठी अधिक व्यापक करण्याची गरज आहे. स्वसंरक्षणासाठी आपल्याजवळ हत्यार असेल, तर ते वापरावे, हे युक्त होते. परंतु कुणाची तरी हत्या करावयाची, या विचाराने कार्यक्रम आखले जाऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे, असे मी आग्रहाने मांडले. युद्धप्रयत्नात अडथळा निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, हे तत्त्वत: मान्य झाले आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना जसजसे मार्ग सुचतील व व्यवहारत: अमलात आणता येतील, त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत, असे ठरले. विचारांच्या दृष्टीने ही बैठक मला महत्त्वाची वाटली.