मी ही गोष्ट अशासाठी नोंदतो आहे, की त्या गोष्टीची माझ्या मनाला अजूनही चुटपुट लागून आहे, की मी त्यांना परावृत्त करू शकलो असतो, तर बरे झाले असते. तरुण पत्नी घरात ठेवून ते इस्लामपूरला गेले आणि पुन्हा कधीच परतले नाहीत.
इस्लामपूरच्या मोर्च्याची तयारी श्री. पांडू मास्तर म्हणून आमच्या जिल्ह्याचे फार मोठे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. येडे निपाणीच्या डोंगराजवळ मोर्चेवाले हजारोंनी जमले होते. सर्व मोर्च्यांच्या माझ्या परिपाठाप्रमाणे मी व के. डी. पाटील येडे निपाणीच्या त्या ठिकाणी, ज्या ठिकाणाहून मोर्च्याची सुरुवात होणार होती, तेथे हजर राहिलो होतो आणि त्यांच्याबरोबर चालत चालत कामेरीच्या पुढे मैलभर इस्लामपूरच्या बाहेर थांबलो होतो. या मोर्च्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेण्यास लोक मला मज्जाव करीत असत, म्हणून मी बाहेर थांबत असे. इस्लामपूरच्या मोर्च्यावर गोळीबार करून मोर्चा पांगविण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केले. त्यात ते यशस्वी झाले. श्री. पांडू मास्तर व त्यांचे काही साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आणि तेथून परतलेल्या माझ्या मित्रांनी आम्ही जेथे थांबलो होतो, तेथे येऊन काय काय घडले, ते सर्व मला सांगितले. लोक पांगून जरी परत आले होते, तरी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबाराच्या अत्याचारामुळे ते चिडून गेले होते. त्यांनी परत जाऊन उत्साहाने काम करण्याचा आपला मनोदय जाहीर केला. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या ठिकाणी निघून गेलो.
कराड, पाटण, तासगाव, वडूज आणि इस्लामपूर या ठिकाणी झालेले हे मोर्चे १९४२ च्या चळवळीच्या इतिहासातले एक सोनेरी पान आहे, असे मी मानतो. जनआंदोलनाने उग्र स्वरूप घेतल्यानंतर लोक कुठल्याही स्वार्थत्यागाला कसे तयार होतात, याचे विराट दर्शन या निमित्ताने आम्हां सर्वांना झाले. परंतु सरकारी अत्याचाराने संघटित रूप घेऊन भूमिगत चळवळीवर प्रखर प्रहार करण्याचा निर्णय घेतलेला दिसला. त्याची सुरुवात ह्या गोळीबारामुळे झाली, असे म्हटले पाहिजे. या सर्व गोष्टींच्या चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असे ठरविले, की कुठे तरी एके ठिकाणी बसून सरकारने घेतलेल्या या धोरणानंतर आपण पुढचे पाऊल कसे टाकावे, याचा विचार केला पाहिजे. ह्या वेळपर्यंत जिल्ह्यामध्ये आपापल्या स्वतंत्र नेतृत्वाखाली वेगळे वेगळे गट स्वयंस्फूर्तीने काम करीत होते. मी कराड हे केन्द्र करून त्याच्या आसपास काम करीत होतो. परंतु अधूनमधून निरोप पाठवून, कधी पत्र पाठवून, कधी प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न करून या सर्व गटांशी अप्रत्यक्ष संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.
कुंडल हे केंद्र धरून क्रांतिवीर नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारी फार मोठी कार्यकर्त्यांची संख्या होती. त्यांच्यामधून क्रांतिवीर जी. डी. बापू यांनी पुढे फार मोठ्या स्वरूपाचे काम केले.
सांगलीला श्री. वसंतराव पाटील यांना केंद्र समजून त्यांच्या भोवती एक तरुण कार्यकर्त्यांचा असाच एक मोठा संच काम करीत होता. श्री. वसंतराव पाटील यांचे या चळवळीतील कार्य एका पराक्रमी पुरुषाचे होते. त्यांचे संघटना-कौशल्य हे त्यांच्या पुढच्या यशस्वी जीवनात अधिकच डोळ्यांत भरते.
वाळवे तालुक्यातील बरडे गुरुजी हे एक स्वतंत्र प्रवृत्तीचे क्रांतिकारी होते. त्यांनी आपल्या पद्धतीने शिराळा पेटा आणि वाळवे तालुक्यातील काही भाग यांमध्ये काम करावयास सुरुवात केली होती.
एक गोष्ट मला येथे नमूद केली पाहिजे, ती म्हणजे या वेळी कवठ्याला किसन वीरांशी आम्ही बोलणे करून आल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या पुण्याच्या प्रवासात ते पकडले गेले आणि आमची एक प्रकारे मोठी निराशा झाली. जेलमधून त्यांचे निरोप येऊ लागले, की 'आम्ही तयारी करीत आहोत, संधीची वाट पाहत आहोत, प्रसंग पडला, तर आम्ही जेल फोडून बाहेर येऊ.' किसन वीर हे आमच्यांतून जेलमध्ये गेल्यामुळे आमच्या कार्याची शक्ती कमी झाली होती. ते बाहेर येण्याची आशा दाखवीत होते, पण ते कितपत शक्य आहे, याची आम्हांला कल्पना नव्हती.