मी कवठ्याहून परत कराड तालुक्यात गेलो आणि कराडचा मोर्चा २४ ऑगस्टला मामलेदार कचेरीवर न्यायचा, या दृष्टीने तयारीचे काम सुरू केले. यासाठी मला तांबव्याला जाऊन श्री. काशिनाथपंत देशमुख यांच्याशी बोलावे लागले. त्यांनाही ही कल्पना पसंत होती. कारण हा लढा अहिंसात्मक पद्धतीने चालावा, ह्या गोष्टीवर त्यांचा भर होता. माझाही त्यांच्याशी काही मतभेद नव्हता. परंतु अहिंसेचा फार तांत्रिक आणि मर्यादित अर्थ करून चालणार नाही, असे मी त्यांच्याशी आग्रहाने मांडत होतो. परंतु त्यांचा मोर्च्याच्या कल्पनेला पाठिंबा असल्यामुळे माझे काम सोपे झाले. कारण ते अतिशय लोकप्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी तांबवे आणि आसपासच्या खेड्यांतील लोक मिरवणुकीने २४ ऑगस्टला मामलेदार कचेरीवर येतील, अशी व्यवस्था केली. आम्हां कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन या मोर्च्याचे नेतृत्व कोणी तरी प्रौढ व पोक्त माणसाने करावे, म्हणून कराड तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री. बाळासाहेब पाटील उंडाळकर यांनी या मोर्च्याचे नेतृत्व करावे, असे ठरले. कराड शहरातून या मोर्च्यामध्ये अनेक माणसांनी भाग घ्यावा, अशी आम्ही तयारी केली होती. श्री. शांतारामबापू, कासेगावकर वैद्य, सदाशिवराव पेंढारकर आणि तरुण पिढीतील नवीन मुलांची एक सेनाच कराड शहरात उभी राहिली होती, असे मी पाहिले. या तरुण सेनेचे नेतृत्व श्री. महादेव जाधव यांनी केले. पुढे आम्ही त्यांना माधवराव जाधव असे संबोधू लागलो. उत्कृष्ट खेळाडू आणि निधड्या छातीचे क्रांतिकारक असा त्यांचा पुढे लौकिक झाला.
कराड आणि आसपासच्या खेडेगावांतील लोक हजारोंच्या संख्येने कराडच्या मामलेदार कचेरीपुढे जमले. मामलेदार कचेरीच्या मैदानात झेंडा घेऊन गेले. पोलिसांनी श्री. बाळासाहेब उंडाळकरांना अटक केली. त्यांच्या समवेत असलेल्या आणखी काही लोकांना अटक झाली. लाठीधारी पोलिसांची एक मोठी रांगच्या रांग मामलेदार कचेरीच्या आतील बाजूला उभी केली होती. सर्व लोक आपला विजय झाला, या भावनेने आपापल्या गावी परत गेले. आमचा हा मोर्च्याचा पहिला प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला.
या मोर्च्यानंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी असेच मोर्चे काढावयाचे, असे ठरले. तशी सूचना आम्ही आमच्या मित्रमंडळींच्या द्वारे आणि पत्राने इतर तालुक्यांच्या ठिकाणी दिल्या. किरवे गावाच्या शेजारी तालुक्यातील विठ्ठलबुवा मावशीकर आणि सुपने येथील बाबा शिंदे वगैरे अनेक भूमिगत कार्यकर्त्यांची एक बैठक त्याच सुमारास मी घेतली. अवती-भोवती पिकांची दाटी होती आणि समोर संगमाचा डोह होता. यामुळे तेथे चर्चेसाठी निवांत जागा होती. ही सभा माझ्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे पाटणच्या मोर्च्याची तयारी करण्याचे काम श्री. विठ्ठलराव मावशीकर आणि त्यांचे सहकारी यांनी कबूल केले होते. त्या ठिकाणी या चळवळीची पुढे वाढ कशी करावयाची, यासंबंधीचे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारले आणि त्या प्रश्नांची मी जी उत्तरे दिली, त्याची स्मृती अजून मला आहे. मी त्यांना त्या वेळी सांगितले, की या मोर्च्याच्या चळवळीनंतर आपल्याला दुसरेही काही कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. म्हणून मी त्यांना पाच-सहा कलमी कार्यक्रमांची कल्पना दिली. यावेळी समाजवादी पक्षातर्फे राष्ट्रीय स्तरावर जे काम चालू होते, त्याच्या पत्रिका आणि सूचना यांचा प्रसार होत होता. त्याच्या आधारे मला काही मंडळींनी प्रश्न विचारले. माझी भूमिका स्पष्ट होती. अगदी त्यांच्या सूचना व हुकूम याप्रमाणे काम करण्याची आपल्याला गरज नाही. आपण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, तेव्हा काँग्रेसच्या मूळ धोरणाला सुसंगत असे जे कार्यक्रम असतील, तेच आपण स्वीकारू आणि करीत राहू. जनमनावरचे ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व कमी करावयाचे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रिटिश सत्ता ही हिंदी जनसामान्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे भय आहे, त्या भयावर त्या सत्तेचे अस्तित्व आहे. लोकांच्या मनातून हे भय दूर झाले, म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आपोआपच कोलमडून पडेल. ही एक दृष्टी, आणि दुसरे म्हणजे जे युद्ध त्यांनी आमच्यावर लादलेले आहे, तो युद्धप्रयत्न यशस्वी होणार नाही, अशा तऱ्हेचे प्रयत्न करणे. यासाठी जे काही करता येईल आणि काँग्रेसच्या ध्येय-धोरणात जे बसेल, ते आपणांस केले पाहिजे. शेतकऱ्यांची संघटना आपण बांधू शकलो, तर करबंदीसारखी चळवळसुद्धा आपण हाती घेऊ शकू. त्यासाठी सरकारधार्जिणी असणारी जी खेड्यांतील वर्चस्व असणारी मंडळी आहेत, त्यांना लोकमतापुढे कमजोर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा तऱ्हेच्या चर्चा तेथे झाल्या आणि जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांपुढे पुढले दोन-तीन महिने मला बोलावे लागले, तेव्हा मी त्यांना माझा हा दृष्टिकोन सांगत असे.
कराडचा मोर्चा झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात मोर्च्याची एक मोठी चळवळ उभी राहिली, असे म्हटले, तरी चालेल. कराडनंतर पाटणला मोर्च्याचा कार्यक्रम झाला व त्यानंतर अत्यंत यशस्वी असा मोर्चा तासगावला झाला. या मोर्च्यामध्ये श्री. विठ्ठलराव पागे, कृष्णराव कुऱ्हाडे, गोविंदराव खोत ही मंडळी प्रमुख होती. विठ्ठलराव पागे यांची माझी गाठ पडली नव्हती. त्यामुळे त्यांची माझी या बाबतीत चर्चा झाली नव्हती.
मोर्च्याच्या आदल्या दिवशी किर्लोस्करवाडीला माझ्या इतर एक-दोन सहकाऱ्यांच्या सोबतीने, आमच्या नेहमीच्या पद्धतीने सायकलवरून अधलेमधले रस्ते काढत या मोर्च्याच्या तयारीची बैठक किर्लोस्करवाडीत घेतली. गोविंदराव खोत हे किर्लोस्करवाडीपासून जवळच असलेल्या अमणापूर गावचे मोठे प्रसिद्ध कार्यकर्ते होते. किर्लोस्करवाडीतील कामगार मंडळींत त्यांना मोठा मान होता.
कृष्णराव कुऱ्हाडे हे पलूस येथील प्रमुख कार्यकर्त्यांमधील एक अग्रेसर कार्यकर्ते होते. ते आणि इतरही कार्यकर्ते त्या बैठकीस हजर होते. मी पाठीमागे या चर्चांचा उल्लेख केला, त्या चर्चा येथेही झाल्या. चळवळ पुढे कशी वाढवावयाची, त्यांची सुरुवात मोर्च्यापासून करणे कसे आवश्यक आहे, या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या. त्या मंडळींनी आमचा निरोप घेतला आणि तो दुसरा दिवस आम्ही किर्लोस्करवाडीमध्येच काढला. आमचा मुक्काम तेव्हा किर्लोस्करवाडीतच आमच्यांत काम करीत असलेल्या भूमिगत कार्यकर्त्यांतील एक प्रमुख कार्यकर्ते श्री. सदाशिव पेंढारकर यांच्या राहत्या जागी होता.