• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१४२

भारून गेलेल्या मनाने आणि एका नव्या जबाबदारीच्या जाणिवेने आम्ही तो मंडप सोडला आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. बरोबर श्री. के. डी. पाटील, चंद्रोजीराव पाटील, गौरीहर सिंहासने, शांताराम इनामदार आणि जिल्ह्यातील आणखी काही प्रमुख कार्यकर्ते होते. आम्ही परत आल्यानंतर, मध्यरात्र होऊन गेली, तरी अधिवेशनात झालेल्या भाषणांवर आणि त्यांतून आपल्यावर पडलेल्या जबाबदारीवर चर्चा करीत बसलो आणि थकून झोपी गेलो.

दुस-या दिवशी ऐतिहासिक नऊ ऑगस्टची सकाळ जी उजाडली, ती एका नव्या क्रांतीचे रूप घेऊनच. आम्ही ज्या इमारतीमध्ये राहत होतो, तेथून खाली गेलो, तेव्हा मुंबई शहरातली सारी जनता रस्त्यावर आली असल्याचे दिसले. महात्मा गांधी आणि इतर नेते यांना आदल्या रात्री अधिवेशन संपताच पकडून मुंबईच्या बाहेर नेले होते, याची तोपर्यंत आम्हांला बातमी नव्हती, परंतु आता ती बातमी वा-यासारखी सर्व मुंबई शहरभर पसरली.

सगळीकडे हरताळ व रस्त्यांवर गर्दी करून घोषणा देणारी तरुण माणसे असे चित्र, आम्ही ज्या भागात राहत होतो, त्या भागात पाहिले. मुंबईचे हेही रूप एकदा पाहून घ्यावे, म्हणून मी माझ्याबरोबर एक-दोन माणसांना घेऊन चालत चौपाटीपर्यंत गेलो. चौपाटीवरून परत फिरून गिरगावच्या बाजूलाही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मोकळे हिंडणे एवढे सोपे नव्हते. जिकडे तिकडे कडक पोलिस बंदोबस्त होता. दगडफेक, लाठीमार, अश्रुधूर यांचा जीवघेणा खेळ सुरू झालेला होता.

तेथून आम्ही परत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. ती दुपार आम्ही आमचा परतीचा कार्यक्रम कसा ठरवावयाचा, त्या चर्चेत घालविली. आमचा पहिला निर्णय असा होता, की आम्ही सगळेजण मिळून आलो होतो; पण जाताना असे मिळून, गर्दी करून जायचे नाही.

प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या गावी किंवा कार्यक्षेत्री जायचे, असे ठरले. हेतू हा होता, की ब्रिटिश सरकारने दडपशाहीचा नंगानाच सुरू केलेला आहे. त्यामध्ये भोळेपणाने जाऊन, पोलिसांच्या तावडीत सापडून, तुरुंगात जाण्याचा खेळ करावयाचा नाही. माझ्या मनात जे विचार होते, ते मी माझ्या मित्रांना सांगितले, आपण आजपर्यंत जे झगडे दिले, त्यांपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने संघटना बांधली पाहिजे.

परत जाऊन, शक्य तितक्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करून भूमिगत जीवन जगण्याची तयारी करायला सांगितली पाहिजे. तुरुंगाच्या जाळ्यात न सापडणे हे पहिले पाऊल. यामध्ये पुष्कळ कार्यकर्ते बाहेर राहिल्यानंतर मग प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम काय करावयाचा, हे आपण ठरवू. परत जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटण्याची गरज भासली, तर कसे भेटावयाचे, याच्या काही खाणाखुणा ठरवून आम्ही परत जायची योजना आखली आणि एक-दोन, एक-दोन अशी मुंबई सोडून आपापल्या कार्यक्षेत्राकडे निघालो. एकाच दिवशी सर्वांनी निघणे शक्य नव्हते. तेव्हा वेगवेगळ्या वेळी जाणे इष्ट, असे ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठरवला.

मी त्यानंतर एक दिवस मुंबईत जास्त राहिलो आणि दहा तारखेच्या रात्री पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यामध्येही लोकांची अशीच उत्स्फूर्त निदर्शने झाल्याचे मी ऐकले. पुढे रात्री रेल्वेच्या तिस-या वर्गाच्या गर्दीत बसून मी कराडच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला आणि कराड स्टेशनच्या अलीकडे असणारे शिरवडे म्हणून स्टेशन आहे, तेथे पहाटे उतरलो. तेथून मसूर गाव जवळ होते. मसूर गावामध्ये बरेच प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्यांनाही अटक झाल्याची बातमी मला कोणी तरी सांगितली. तेव्हा मसूरमध्ये न जाता इंदोलीला जावे, असा मी माझ्या मनाशी बेत केला आणि हातात असलेली छोटीशी बॅग घेऊन मी पायीच इंदोलीच्या दिशेने निघालो.