• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१४०

हिंदुस्थानच्या राजकारणातील हे खरे सौंदर्यस्थळ होते. 'करू किंवा मरू' अशा तऱ्हेचा निर्धार करून लढ्यासाठी तयार झालेला देशाचा नेता त्या लढ्याची भूमिका मांडताना ती वैराच्या भावनेने तो मांडत नाही, तर सहकाराच्या भावनेने मांडतो आहे. गांधीजींच्या नेतृत्वाने हिंदुस्थानला जी देणगी दिली आहे, ती ही होय, असे वाटले. पंडितजींनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा वेध घेतला आणि स्वच्छ केले, की-
''आम्हांला फॅसिझमविरुद्ध लढण्याची इच्छा आहे. परंतु आम्ही ब्रिटिशांचे गुलाम म्हणून लढू इच्छीत नाही. फॅसिझमचा पराभव करण्यामध्ये भाग घेऊ इच्छितो - परंतु स्वतंत्र देशाचे सैनिक, म्हणून !'

या ठरावापर्यंत कसा प्रवास झाला, याचीही माहिती त्यांनी आपल्या भाषणात सांगितली. कोणते मतभेद झाले, वगैरे त्यांचा जाता जाता खुलासा त्यांनी केला आणि आपले भाषण संपविले. त्या ठरावाला पाठिंबा देण्याकरता म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी भाषण केले. त्यामुळे हा ठराव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीपुढे संपूर्ण एकमताने मांडला जात होता, हे स्पष्ट झाले. पण या सर्वांमध्ये मौलाना आझाद यांनी प्रथमत: जे भाषण केले, ते त्यांच्या प्रामाणिकपणाचे, बुद्धिचापल्याचे आणि उत्कृष्ट वक्तृत्वाचे एक सुंदर चित्र होते. त्यांनी एका गोष्टीचा खुलासा केला आणि सांगितले,

'' 'छोडो हिंदुस्थान' या घोषणेचा निश्चित अर्थ विचारण्याकरता म्हणून आम्ही वर्ध्याला जाऊन गांधीजींना भेटलो. तेव्हा त्यांनी आम्हांला असे स्पष्ट सांगितले, आम्ही ब्रिटिशांना हिंदुस्थानातून जा, असे सांगतो, याचा अर्थ इंग्रज माणसांनी आत्ताच्या आत्ता ताबडतोब हिंदुस्थान सोडला पाहिजे, असा नाही, तर ते हिंदुस्थानात राहू शकतात. पण माझ्या मनात आहे, ते ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा ताबडतोब त्याग करावा. हिंदुस्थानात राज्यकर्ते म्हणून जे ब्रिटिश आहेत, ते हिंदुस्थानमध्ये मित्र म्हणून राहू शकतात.''

गांधीजींनी त्यांना काय सांगितले होते, याचा उल्लेख त्यांनी मुद्दामहून एवढ्यासाठीच केला, की परदेशात आणि सरकारच्या बाजूने या संबंधाने पुष्कळसा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात होता. सात तारखेची ही संध्याकाळची सभा महत्त्वाची भाषणे झाल्यानंतर स्थगित झाली.

आठ तारखेला सकाळी आणि दुपारनंतर अधिवेशन झाले. सकाळच्या अधिवेशनामध्ये ब-याच उपसूचना मांडल्या गेल्या. त्यांमध्ये कम्युनिस्टांच्या दोन-तीन उपसूचना होत्या. कम्युनिस्टांनी त्यांच्या बदललेल्या भूमिकेस अनुसरून ठरावातील लढ्याचा आदेश गाळला जाईल व त्याचे मूळ रूप बदलून टाकील, अशा या उपसूचना दिल्या होत्या.

आजपर्यंत हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या सबबीचा वापर ब्रिटिश सरकारचे समर्थक करीत होते. आश्चर्य त्या दिवशी असे होते, की कम्युनिस्टांच्या उपसूचनांमध्ये जास्त भर या प्रश्नावर होता. जणू काही काँग्रेस हिंदू-मुसलमान ऐक्याच्या विरोधीच होती ! प्रश्न होता, तो आता प्राधान्य कशाला आहे? आता प्राधान्य हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला आहे. आणि त्याला कसलाही अवधी लागता कामा नये, ही साधी गोष्ट आहे. ती कम्युनिस्ट समजू शकले नाहीत.

महात्मा गांधींनी या अधिवेशनात दोन भाषणे केली. मला जे स्मरते आहे, त्याप्रमाणे ठराव पास करण्याकरता प्रतिनिधींच्या पुढे मांडून त्यांनी तो ठराव स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या जबाबदा-या कोणत्या आहेत, त्यांवर त्यांनी भाषण केले. आणि ठराव पास झाल्यानंतर जवळ जवळ दीड तास हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते बोलले. सभा चित्रासारखी तटस्थ बसली होती.

जेव्हा गांधीजी बोलत होते, तेव्हा एवढा मोठा सभामंडप माणसांनी चिक्कार भरून गेला होता. परंतु सुई पडली असती, तरी तिचासुद्धा आवाज ऐकू आला असता, अशी शांतता होती. मी तर माझे प्राण कानांत आणून ते भाषण ऐकले. माझ्या मनावर कायमचा परिणाम करणारे असे हे त्यांचे भाषण होते. त्यांनी ठरावाची भूमिका स्पष्ट मांडली. परंतु आता लोकांवर कोणती जबाबदारी आहे, ही गोष्ट स्पष्ट केली.

''मी काही तुमचा सेनापती म्हणून हे भाषण करीत आहे, असे नाही.'' असे त्यांनी स्पष्ट केले.