वकिलीचा धंदा हा असा चालू असताना राजकारण, मी पूर्वी सांगितले, त्याप्रमाणे अधिक स्पष्ट झाले होते आणि जनआंदोलनाच्या दिशेने चालले होते. राजकारणाकडे मी काही पाठ फिरवली नाही. त्या सालच्या एप्रिलमध्ये झालेल्या अलाहाबाद काँग्रेसनंतर निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण एकत्र बसले पाहिजे, असे के. डीं. नी सुचविले, तेव्हा आम्ही एका शनिवारी-रविवारी आमच्या चार-सहा मित्रांना निमंत्रण करून कोल्हापूर संस्थानातील कोडोली येथील आमच्या दोघांचे स्नेही श्री. विश्वनाथराव कोरे यांच्याकडे जायचे ठरविले.
विश्वनाथराव ऊर्फ तात्यासाहेब कोरे हे एक उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ते म्हणून आज विख्यात आहेत आणि त्यांचा आणि माझा सर्व जन्मभर ऋणानुबंध वाढत गेलेला आहे. त्या वेळी ते व्यापार आणि शेती यांमध्ये लक्ष घालीत होते. त्यांचा 'डागमळा' म्हणून वारणाकाठी अत्यंत उत्तम प्रकारचे उसाचे पीक काढणारा शेतीचा उद्योग होता.
आम्ही योजलेली आमची ही बैठक आम्ही त्या डागमळ्यामध्येच घेतली. मला आठवते, के. डी., तात्या कोरे आणि इतर मित्रमंडळी हजर होती. अलाहाबादच्या काँग्रेसचा मला समजलेला अर्थ मी त्यांना स्पष्ट करून सांगितला. आणि या मतभेदांतून एक तर काँग्रेस फुटेल तरी, नाही तर गांधीजी आपल्या इच्छेप्रमाणे जनआंदोलन सुरू करतील, हा माझा कयास मी त्यांना सांगितला. त्यावेळच्या वातावरणाने आम्ही सगळे भारून गेलो असल्यामुळे के. डीं. नी तर त्याच ठिकाणी कबूल केले, की असे आंदोलन होणार असेल, तर तुमच्याबरोबरच आम्हीही आमच्या वकिलीला रामराम ठोकू. तात्यासाहेब कोरे यांची आम्हांला सहानुभूती होती.
आमच्या मित्रांपैकी परिस्थितीने सुखी असलेले ते गृहस्थ होते. पण मैत्रीला अत्यंत उत्तम. राष्ट्रीय विचार त्यांनी निष्ठेने स्वीकारलेले होते. त्या दिवसाची ती दुपार आणि संध्याकाळ या अनेकविध राजकीय व इतर चर्चांमध्ये रंगल्याची आठवण मला नेहमी होते. तात्या कोरे आम्हांला थट्टेने म्हणत,
''तुम्हांला हे उद्योग करावयाचे होते, तर वकिलीच्या पाट्या कशाला लावून बसलात?''
मी त्यांना सांगितले, ''वकिलीचा अभ्यास करण्याचा निर्णय करण्यापूर्वी मी हा विचार केला, की वकिली आणि राजकारण हे एकत्र करता येते. जे चांगल्या तऱ्हेने करता येईल, ते करावयाचे. पण आमच्या जीवनात राजकारणाला प्राधान्य आहे. कारण राजकारण हे स्वातंत्र्याचे राजकारण आहे आणि आम्ही त्याला मनाने वाहून घेतले आहे.''
अशा चर्चांमुळे आमचे जे निर्णय झालेले होते, ते अधिक स्पष्ट आणि स्वच्छ होत होते. के. डीं. शी ज्याप्रकारे माझे बोलणे होत होते, तसेच जिल्ह्यातील इतर मित्र-विशेषत: १९४२ सालच्या चळवळीमध्ये माझ्याशी संपूर्ण साथ केलेले माझे मित्र श्री. शांताराम इनामदार यांच्याशी या बाबतीत मी खूप चर्चा करत असे. माझ्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असे आणि सर्व कामांत ते मला सहकार्य करीत होते. कोर्टाची वेळ संपली, म्हणजे संध्याकाळी या मित्रांना बरोबर घेऊन राजकारणावरील गप्पा झोडीत बसणे हा आमचा आवडता उद्योगच होता. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला राजकारण वेगाने पुढे जात होते आणि त्या वेगाच्या प्रवाहात आम्ही सापडून तिकडे खेचले जात होतो.
वर्धा वर्किंग कमिटीचा ठराव १९४२ च्या जुलैमध्ये पास झाला आणि आम्ही सर्व मित्रमंडळी पुन्हा एकदा कराडमधील आमच्या घरी एकत्र जमलो. त्यावेळी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक होणार, असे जाहीर झाले होते, आणि या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये जितके जास्तीत जास्त मित्र घेऊन जाता येईल, तेवढे न्यायचे, असा माझा विचार होता.