• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१२७

या वेळी एक दुसरे आश्चर्य घडले. ते म्हणजे कूपर यांचे गटातच मतभेद झाले. त्यांचे प्रसिद्ध सहकारी श्री. अण्णासाहेब कल्याणी आणि सरदार पाटणकर हे त्यांच्यापासून अलग झाले आणि अध्यक्षपदाचा खेळ सुरू झाला.
अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील दोन तरुण, नवे वकील लढाईच्या मैदानात उभे राहिले. एक श्री. आनंदराव चव्हाण आणि दुसरे श्री. बाळासाहेब देसाई. या दोघांपैकी श्री. आनंदराव चव्हाण हे माझे विद्यार्थिदशेपासूनचे मित्र होते. इंटर आणि बी. ए. च्या परीक्षेच्या वेळी आम्ही एकत्र अभ्यास केला होता. विद्यार्थिदशेतच आनंदरावांनी आग्रहाने मला कुंभारगावातील त्यांच्या घरी नेले होते आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कुटुंबियांच्या ओळखी करून दिल्या होत्या. तसे म्हटले, तर त्यांचा-माझा पहिल्यापासून जुना वैयक्तिक स्नेह होता. पण त्यांच्या पाठीमागे ज्या शक्ती उभ्या राहिल्या, त्यांचे अप्रत्यक्ष नेतृत्व कूपर करत होते. मी आनंदरावांशी बोलून त्यांना हे सांगितले. परंतु त्यांना पाठिंबा देणारी दुसरी जी महत्त्वाची माणसे होती, त्यांच्या प्रेमाखातर त्यांना ते संबंध काही तोडता आले नाहीत. श्री. बाळासाहेब देसाई हेच आमचे या परिस्थितीतील उमेदवार ठरले. तसे आम्ही बाळासाहेबांना बोललोही. श्री. बाळासाहेब हे पाटण तालुक्यातील होते, परंतु त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले होते. आनंदराव आणि बाळासाहेब या दोघांचा तालुका एकच आणि दोघांचेही शिक्षण कोल्हापूरला झाले होते. त्यांची नाती-गोतीही कोल्हापूरच्या सरदार घराण्यांशी होती. तसे म्हटले, तर या दोघांनी एकत्र बसून मार्ग काढावयास काहीच हरकत नव्हती, पण तसे झाले नाही. श्री. बाळासाहेब देसाई हे मुख्यत: पाटणला वकिली करीत. परंतु त्यांनी आपले घर कराडला ठेवले होते. माझे बंधू गणपतराव यांचा त्यांचा चांगलाच परिचय होता. माझी त्यांची कराडला ओळख झाली होती.

शेवटी निवडणुकीच्या राजकारणामध्ये चढाओढ सुरू झाली. माणसे जमविण्याची शर्यत सुरू झाली आणि अखेरीस निवडणुकीच्या दिवशी मतदान होऊन बाळासाहेब देसाई निवडून आले. त्यांच्या निवडीला आम्हां काँग्रेस कार्यकर्त्यांनी फार मोठी मदत केली होती. बाळासाहेबांना त्याची जाणीव झाली आणि त्यातून त्यांचे आमचे सहकार्य हळूहळू वाढत गेले. सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष झाल्यामुळे स्वाभाविकच ते जिल्ह्यातले एक प्रमुख नागरिक बनले. त्यांचा आणि आमचा जिल्ह्यातला गट एक असे मानले जाऊ लागले. त्यावेळी आम्ही सर्वजण प्रथमच प्रत्यक्ष निवडणुकीत कूपर गटाचा पराभव करू शकलो, याचा आम्हांला आनंद होता. परंतु या सर्व प्रकरणामध्ये माझे जुने मित्र आनंदराव चव्हाण यांना मात्र मी दुखवून बसलो, याची खंत होती.

आनंदराव आणि बाळासाहेब ही दोन्ही महत्त्वाची माणसे होती आणि भविष्यातील राजकारणामध्ये दोघांचीही गरज लागणार होती. बाळासाहेब देसाई हे ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतले होते. त्यांनी त्यावेळी तत्त्व म्हणून, कोणत्याही राजकीय पक्षाचा स्वीकार केलेला नव्हता. काँग्रेसशी, आमच्याशी आलेल्या संबंधामुळे जी काही जवळीक झाली होती, तेवढीच. या निवडणुकीच्या निमित्ताने ते आणि आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही त्यांना हळूहळू खेचत राहिलो. तसे ते मैत्रीला चांगले गृहस्थ होते. जिल्हा लोकल बोर्डाचे कामही त्यांनी आपले वजन ठेवून पार पाडायचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा लौकिकही झाला. पण मूलत: त्यांचा पिंड सरकार-विरोधकाचा नव्हता. जिल्ह्याचे प्रमुख सरकारी अधिकारी म्हणजे कलेक्टर. या कलेक्टरच्या अधिकाराला व प्रतिष्ठेला ते फार जपत. मी तर इंग्रजविरोधी चळवळ्या आणि त्यांचा मित्रही, अशा काही कठीण अवस्थेत त्यांची आमची मैत्री वाढत होती. मी काही वेळा त्यांच्याकडे उतरत असे. तेव्हा मी पाहिले आहे, की कलेक्टरकडून काही लिफाफा आला आहे, असे पाहिले, की ते एकदम अस्वस्थ होत आणि उघडून पाहून त्यात काय आहे, नाही, हे पाहिल्याशिवाय त्यांना कोणाशी बोलणे किंवा इतर कामे करणे कधी सुचत नसे. आम्ही मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत असू, की  ''तुम्ही एका अर्थाने जिल्हाप्रमुख आहात. कलेक्टरची एवढी मिजास तुमच्या मनामध्ये कशासाठी?'' ते हसून म्हणत, ''अहो, या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मी अध्यक्ष आहे ना? तिच्या सुरक्षिततेसाठी मला हे सगळे केले पाहिजे.''

असा त्यांचा माझा स्नेह सुरू झाला. पुढे तो जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षे वाढत राहिला आणि टिकला. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. शेवटी शेवटी ते मजवर नाराज होऊन काहीसे दूर होते.  पण एक घरोब्याचा स्नेही आणि जनतेच्या हितासाठी तळमळीने कार्य करणारा लोकनेता, ही त्यांची आठवण कायम राहील. त्यांच्या प्रत्यक्ष राजकारणातील जी पहिली पावले त्यांनी टाकली, त्यावेळी त्यांचा साथीदार म्हणून मी होतो, याची मला मोठ्या आनंदाने आठवण होते.

बाळासाहेब देसाईंच्या निवडणुकीने पाटण तालुक्यातील लोकांना मोठा आनंद झाला. मागासलेला तालुका, डोंगराळ भाग, म्हणून त्यामध्ये विकास कमी, अशी तेव्हाची परिस्थिती होती. बाळासाहेबांच्या गावी त्यांच्या सत्काराचा फार मोठा समारंभ झाला. त्यावेळी बाळासाहेबांनी मला आग्रहाने समारंभाचे अध्यक्षस्थान घ्यायला लावले. या सगळ्या जुन्या आठवणी मनाशी गर्दी करून येतात, याचे कारण आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते जेलमध्ये असताना जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही राष्ट्रीय प्रवृत्तीची इज्जत राहील, अशा तऱ्हेने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्याचे काम केले होते आणि त्यामुळे किसन वीर, के. डी. पाटील आणि मी यांना एक प्रकारचा आनंद वाटत होता.