• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ११४

१९४१ मध्ये रॉयवादी व कम्युनिस्ट यांच्या मतांत साम्य निर्माण झाले. सर्वसामान्य उथळ मीमांसा करणा-या लोकांची मोठी अडचण झाली. हे युद्ध ही एक जबरदस्त घटना होती. तिचा अर्थ निदान आमच्या देशातील राजकीय पक्षांना लवकर कळला नाही, ही वस्तुस्थिती होती.

मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो होतो. देशाच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची घटना आहे आणि स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असणारी जी माणसे आहेत, त्यांनी काही तरी करायचा काळ हाच आहे, या विचाराने मी अस्वस्थ झालो. आमच्या रॉयवादी मित्रांशी चर्चा करताना मी त्यांना हे स्पष्ट सांगितले. ही अपघाती युद्धाची मीमांसा साफ चूक आहे. रॉयना हिंदुस्थानच्या जनमनाची कल्पना नाही. त्यामुळे ते तसे बोलले आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना त्यामुळे ते संकटात टाकणार आहेत.

विशेषत:, आत्माराम बापूंशी माझी पुष्कळ चर्चा झाली. त्यांच्या माझ्यामध्ये वाढते अंतर आता कायमच्या अंतराचे स्वरूप घेणार, असे स्पष्ट दिसत आहे. मला वाटत होते, की या महायुद्धाच्या प्रसंगाने जी राजनीती रॉयसाहेब सांगत आहेत, ती चूक आहे, असे निदान आत्माराम बापूंना वाटेल, कारण ते स्वातंत्र्य-संग्रामातल्या वातावरणात आणि परंपरांत वाढले होते. परंतु आत्माराम बापू हे, रॉयवादी विचारांची जी मंडळी होती, त्यांच्या मानसिक वर्चस्वाखाली पुरे गेले होते. त्यामुळे त्यांना सरळ, सोपे, राजकीय सत्य दिसले नाही आणि त्यांनी मला सांगितले,
''यशवंतराव, तुमचे आणि आमचे रस्ते आता वेगळे झाले आहेत.'' हे केव्हा तरी घडणार, हे मला वाटतच होते. त्यामुळे मी त्यांना सांगितले, ''तुमच्या राजकीय साहचर्यापासून मी दु:खाने मुक्त होत आहे.''

रॉयवादी राजकारणाशी आणि त्यांच्या मित्रांशी माझा संबंध यापुढे कमी कमी होत गेला. हे आमचे युद्ध नव्हे, ही काँग्रेसने घेतलेली भूमिका मूलत: बरोबर होती. त्यानुसार आता जो कार्यक्रम नेते देतील, त्याचा अगदी मनापासून पाठपुरावा करावयाचा, हा माझा निर्णय झाला. आणि माझ्या पुढचा वैचारिक त्रिकोण मूलत: येथे संपला.

पण हा त्रिकोण संपण्यापूर्वीच्या एका महत्त्वाच्या घटनेची नोंद केली पाहिजे. युद्ध आमचे नव्हे, ते साम्राज्यवाद्यांचे आहे, हे जरी काँग्रेस नेतृत्वाने मान्य केले होते, तरी युद्धविरोधाचा कार्यक्रम ते देत नव्हते. मला आणि माझ्या काही मित्रांना प्रत्यक्ष कृतीची घाई झाली होती. या पार्श्वभूमीवर आपण कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करावा असा प्रबळ विचार माझ्या मनात एकदा येऊन गेला व त्या दृष्टीने पुणे शहरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी माझी चर्चाही झाली. परंतु असले महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मनमोकळे बोलले पाहिजे. म्हणून मी जिल्ह्यात जाऊन आठ दिवस सर्व मित्रांशी चर्चा करून आलो. मूलभूत गोष्टींचा घाईघाईने विचार करून मी असा एकांगी व चुकीचा निर्णय घेऊ नये, असा त्यांचा स्पष्ट सल्ला मिळाला. एका टोकाला जाण्याचा माझ्या मनाला आलेला विचार मी सोडून दिला.

या सर्व चर्चांनंतर मात्र रात्री मी निवांत झोपू लागलो. काँग्रेस पक्षाने जरी मूलभूत भूमिका घेतली होती आणि ती बरोबर होती, तरीही जनतेसाठी दैनंदिन कार्यक्रम त्यांच्याकडून अजून मिळत नव्हता आणि ते स्वाभाविकही होते. असा कार्यक्रम ठरवायला पुष्कळ तयारी करावी लागते. तेव्हा त्या तयारीच्या कामात नेतृत्व असेल, अशी माझी भावना होती. १९३९ साल या विचारात गेले. परंतु मी मनाने अतिशय अस्वस्थ होतो. तासन् तास कुठे तरी बसून या काळात काय केले पाहिजे आहे, या विचारात मी दिवस काढले.

कित्येक दिवस मी कॉलेजमध्येसुद्धा जात नव्हतो. माझे लक्षच लागत नव्हते. पुन्हा आपले वर्ष वाया जाईल काय, अशी मला धास्ती होती. पण मला त्याची पर्वा नव्हती. आमच्या जिल्ह्यात कम्युनिस्ट श्री. विष्णुपंत चितळे यांनी माझे जे काही मित्र होते, त्यांच्याशी संपर्क वाढविला होता. त्यांना त्यांनी सांगितले, की तुमचा काँग्रेस पक्ष या संकटकालीन परिस्थितीत काही मार्गदर्शन करणार नाही. यावेळी या देशात फक्त कम्युनिस्ट पक्षच मार्गदर्शन करू शकेल आणि त्यांनी युद्धविरोधी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात माझे एक-दोन महत्त्वाचे स्नेहीही सामील झाल्याचे चित्र मी पाहिले. आपण काहीच न करता असे बरेच दिवस राहिलो, तर आपला पक्ष जिल्ह्यात राहील, का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना जाऊन व्यक्तिश: भेटलो आणि कम्युनिस्ट पक्षाच्या या डावपेचाला फसू नये, असे त्यांना सुचविले. हे महायुद्ध बरीच वर्षे चालणार आहे. तेव्हा या बाबतीत घ्यावयाचे निर्णय तुम्हांला आम्हांला तातडीने घेतलेच पाहिजेत, हे खरे नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने मूळ भूमिका रास्त घेतलेली आहे. निश्चित काय करायचे, यासंबंधी त्यांच्यांत कदाचित मतभेद असले, तरी त्यांच्या निर्णयाची वाट तुम्हां-आम्हांला संयम राखून पाहिली पाहिजे.

दुस-या महायुद्धाचे पहिले वर्षही पहिले काही आठवडे सोडले, तर रेंगाळल्यासारखेच चालले होते. लढाई सुरू होताना जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि एक-दोन आठवड्यांतच त्यांना जो पोलंडचा भाग घ्यावयाचा होता, तो घेऊन लढाई तेथेच थांबविली होती. पोलंडचा उरला सुरला भाग रशियाने घेतला असल्यामुळे त्याही बाजूला एका अर्थाने मामला थंड होता.