• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१०३

त्यावेळी माझ्या लक्षात आले, की आत्माराम बापू पाटील हे आमदार झाले असले, तरी सरकारची धोरणे बदलण्याच्या प्रक्रियेत ते असहाय आहेत. सरकारची नवी धोरणे तयार व्हायची असली, तर त्यांच्यावर परिणाम करणारी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय निव्वळ कायदे मंडळाच्या सभासदत्वाचा काही उपयोग नाही, अशी भावना पहिल्या प्रथम त्यावेळी माझ्या मनात येऊन गेली. आणि आपली आमदारकी अपुरी आहे, याची जाणीव आत्माराम बापूंनाही त्यावेळी झाली असली पाहिजे. आत्माराम बापूंनी केलेला हा प्रयत्न तेथेच राहिला. आमचे राजकारण या नव्या जाणिवेने पुढे जात राहिले.

१९३८ साली मी बी. ए. ची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कायद्याचा अभ्यास कुठे करावा, असा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला. पदवीधर तर झालो होतो आणि आता पुढे काय करायचे, म्हणून एल्. एल्. बी. व्हायचे, असा मी विचार केला होता.

मी बी. ए. चा अभ्यास करीत असतानाही हा प्रश्न माझ्या पुढे उभा राही. पुढे काय करणार, असा प्रश्न जेव्हा विचारला जाई, तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत असे, की माझ्या मनात दोन गोष्टी आहेत : एक, सातारा किंवा कराड येथे एखादे वृत्तपत्र काढून तेथे संपादक म्हणून काम करायचे. किंवा ग्रामीण भागात एखादी शिक्षण-संस्था काढून राष्ट्रीय वृत्तीचा उत्तम शिक्षक व्हायचे. त्यावेळी वकील होण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता. बी. ए. ची परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा या गोष्टीवर चर्चा झाली, तेव्हा मित्रांनी मला सांगितले,

''तुला शिक्षक वा संपादक व्हायचे असले, तरी कायद्याचे ज्ञान काही तुझ्या आड येणार नाही. कायद्याची परीक्षा देऊनही तू त्या मार्गाने जाऊ शकशील. फक्त पदवीधरच राहिलास, तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील.''

मीही विचार केला, की मला शेवटी स्वातंत्र्य-चळवळीचे राजकारण करायचे आहे. राजकारण आणि वकिली हातात हात घालून चालते, हेही मी पाहात होतो.

- आणि अशा ब-याच विचारानंतर कायद्याचा अभ्यास करावा, असा निर्णय मी घेतला.

कायद्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी काही वेळ पाठीमागच्या काळात जाऊन माझ्या शैक्षणिक प्रगतीबरोबर राजकीय विचारांचा प्रवास कसा झाला, याची नोंद येथे घेऊ इच्छितो.

जेलमधून बाहेर पडताना १९३३ साली मी फक्त काँग्रेसमन राहिलो नव्हतो. तर माझ्या काँग्रेस-निष्ठेला समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती. काँग्रेस-निष्ठा या शब्दाचा अर्थ येथे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. हिंदुस्थानातील राष्ट्रीय जन-आंदोलनाची जी चळवळ होती, त्या चळवळीने काँग्रेसचे रूप घेतले होते. जवळ जवळ पन्नास वर्षे या चळवळीने प्रवास केला होता आणि त्या पन्नास वर्षांमध्ये हिंदुस्थानची जनता आणि इंग्रज यांचे संबंध कसे असावेत, यासंबंधीच्या कल्पना बदलत गेल्या होत्या. काँग्रेसच्या इतिहासाचे सार हे आहे, की जसजसा काळ पुढे जात गेला, तसतशी काँग्रेसची चळवळ ही अधिक जनताभिमुख होत गेली आणि ख-या अर्थाने जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब बनत गेली आणि या बदलाबरोबरच अंतिम राजकीय ध्येय व त्यासाठी कराव्या लागणा-या चळवळींच्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. अर्ज-विनंत्यांनी आपले प्रश्न सोडवावेत, असे म्हणणा-या काँग्रेसची 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या टिळकांच्या घोषणेतून हिंदुस्थानमधून ब्रिटिश सत्तेने जाऊन संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी करण्याच्या स्तरापर्यंत प्रगती झाली होती. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी कोणाचे काहीही विचार असले, तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा मूलभूत असल्यामुळे तो काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहूनच सोडवावा लागेल, यासंबंधी जवळजवळ एकमत होते, असे म्हटले तरी चालेल. वेगळे वेगळे, छोटे मोठे, विचारप्रवाह काँग्रेसमध्ये होते. पण मतभेद कितीही तीव्र झाले, तरी काँग्रेस अंतर्गत राहूनच हे मतभेद चालावयाचे, असा जणू काही नियमच बनला होता.