थोरले साहेब - २०८

राज्यपालांच्या नेमणुका, घटनादुरुस्ती बिल, राज्यपाल सत्यानंद कानुनगो यांच्या नियुक्तीला बिहार सरकारचा विरोध इत्यादी प्रश्नांचा भडिमार विरोधक साहेबांवर करू लागले.  लोकसभेत साहेब आणि विरोधक यांच्यात चकमकी झडू  लागल्या.  साहेब एकटे विरोधकांच्या आक्रमणाला नामोहरम करण्यात यशस्वी होऊ लागले.  विरोधकांशी झुंज देऊन साहेब देशापुढील प्रत्येक प्रश्न यशस्वीपणे सोडवू लागले. ६७-६८ ची लोकसभेची अधिवेशनं 'चव्हाण अधिवेशन' म्हणून गाजली.  ६९ सालची नोंद जातीय दंगलीचं वर्ष म्हणून झाली.  साहेबांनी अत्यंत खंबीरपणे रांचीतील दंगल, श्रीनगरमधील परमेश्वरीदेवी आणि प्रवीण अख्तर यांच्या विवाहाचा प्रश्न, महाराष्ट्रातील अहमदनगर, मालेगार, सोलापून येथील जातीय दंगली तसेच मिरत, करीमगाव, अलाहाबाद, केरळ आणि म्हैसूर येथील दंगलींना आवर घालून त्यात दोषींना कडक शिक्षा सुनावली.  या दंगली गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी जरी घडवून आणल्या असल्या तरी त्यांना राजकीय मंडळींचा आशीर्वाद होता असा साहेबांनी निष्कर्ष काढला.

जातीय दंगलींच्या धगधगणार्‍या वणव्यातून देशाला साहेबांनी सहीसलामत बाहेर काढलं.  प. बंगाल नक्षलाईटच्या सशस्त्र बंडाच्या तडाख्यात होरपळत आहे.  साहेबांनी नक्षलाईटच्या रूपानं देशावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याचं धोरण आखलं.

''दबलेल्या वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाला सनदशीर मार्गाचा अवलंब करून सोडवणूक केली पाहिजे.  कुणी या मार्गानं वंचितांच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय मिळवून देत असेल तर त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्‍न कुणी करणार नाही; पण दहशतीच्या मार्गानं जाऊन कोणी सशस्त्र क्रांतीची भाषा करीत असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल'' अशी ठाम भूमिका साहेबांनी लोकसभेत मांडली.

या नक्षलवाद्यांनी चीनचं नेतृत्व मान्य केलेलं.  गृहखात्यानं १७०० नक्षलवाद्यांना अटक केली.  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही, असा शब्द साहेबांनी लोकसभेला दिलेला.  नक्षलवाद मोडून काढण्याची कार्यवाही साहेबांनी युद्धपातळीवर सुरू केली.  नक्षलवाद्यांनी साहेबांना लक्ष्य केलं.  साहेबांवर टीकेची झोड उठविली.  ६९ च्या फेब्रुवारीमध्ये रात्रीतून संपूर्ण दिल्ली तांबड्या रंगाच्या पोस्टर्सनी चिकटवून रंगविली.  या पोस्टर्सवर दमदाटीची भाषा वापरलेली.

त्यात 'कनू सन्याल आणि जंगल संथाल यांची तत्काळ मुक्तता केली नाही तर साहेबांना जनरल ओडवायर यांच्या मार्गानं संपविणार' असा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला... साहेबांनी लोकसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली.  नक्षलवादींच्या अमानवीय कार्यवाहीला आळा घालण्याच्या उपाययोजनेवर चर्चा करून निर्णय घेऊ हा बैठक बोलावण्यामागील साहेबांचा उद्देश होता.  लोकसभेतील विरोधी पक्षाचा एकही नेता या बैठकीला हजर राहिला नाही.  साहेबांनी एकट्यानं या संकटाचा सामना करण्याचं ठरविलं.

काँग्रेसमधील दोन गटांत सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्‍नांत साहेबांची भूमिका पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे.  सत्तेचा लगाम आपल्या हातात राहवा असं निजलिंगअप्पा, कामराज, मोरारजी, अतुल्य घोष, स. का. पाटील यांना वाटायचं.  साहेब मात्र पक्षाच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ म्हणून या मंडळींच्या संपर्कात होते.  इंदिराजींना या मंडळींच्या बंधनात राहाणं अमान्य होतं.  पक्षांतर्गत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दुर्दैवी प्रसंग नियतीनं पक्षावर लादला.  राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन ३ मे १९६९ ला अल्लाला प्यारे झाले.  त्यांचं निधन झालं.  उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथविधी झाला.