• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ९५

किडवाई यांनी साहेबांना दिलेला शब्द पाळला.  काँग्रेस कमिटीचं अधिवेशन संपवून १९ जानेवारीला महाराष्ट्रातील दुष्काळी भागास भेट देण्याकरिता ते आले.  महाराष्ट्रात येण्यापूर्वी विजापूर येथे त्यांची जाहीर सभा झाली.  सभेत किडवाई यांची सुस्पष्ट शब्दफेक, शांतपणे बोलण्याची तर्‍हा साहेबांना आवडली.  या सभेत साहेबांनीही किडवाईंच्या उपस्थितीत चक्क हिंदीतून २० मिनिटे भाषण केलं.  साहेबांची काय अवस्था झाली असेल कल्पना करवत नाही; पण साहेब बोलले.  भीमा ओलांडून किडवाईंसोबत साहेब निंबर्गी गावी पोहोचले.  शेतकी खात्यातील शेळके यांनी बरीच वर्षे नालाबंडिंगचे काम करून त्याचे होणारे परिणाम किडवाई व साहेबांना दाखविले.  लहानसा ओढा अडवून नालाबंडिंगच्या होणार्‍या परिणामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.  सात-आठ फूट खोल खोदून त्यावर इंजीन बसविले.  खडकाळ जमिनीवर वीस एकरात पीक उभे होते.  छोटे बंधारे बंदिस्त आणि नालाबंडिंग करून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचा कायम उपाय निघू शकतो, असा विश्वास साहेबांमध्ये निर्माण झाला.  दुष्काळावर कायमचा उपाय शोधण्याचे सोडून केंद्र शासनाचे अर्थमंत्री पुण्यात बसून त्यांच्या पुस्तकी ज्ञानाची मुक्ताफळे उधळण्यात मग्न होते.

'दुष्काळ ही राज्याची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण उपाशी राहू द्या.'  बहुजन समाज आताच कुठे डोळे किलकिले करून इकडेतिकडे पाहू लागलेला तोच हे विद्वान आम्हाला सांगणार की, 'पोट उपाशी नको असेल तर डोके उपाशी ठेवा आणि डोके उपाशी नको असेल तर राहूद्यात पोट उपाशी.' या देशातील ग्रंथपंडितांची ही अशी मुक्ताफळे वाचून साहेब बेचैन होत असत.

साहेब सारखे दौर्‍यात-बैठकीत गर्क राहायचे.  महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकातील जनतेचे प्रश्न धसास लावण्याकरिता दौर्‍यावर असायचे.  नेहरूंजींचा सामाजिक, आर्थिक विचार वंचित समाजाच्या गळी उतरविण्याचा प्रयत्‍न करायचे.  बारा बलुतेदार व धनगर, माळी, तेली, तांबोळी या समाजाला काँग्रेसच्या पाठीशी उभं करण्याचं काम साहेब करू लागले.  बहुसंख्य प्रस्थापित शेतकरी वर्ग हा शे. का. पक्षाकडे आकृष्ट झालेला होता.  या वर्गाला काँग्रेसच्या बाजूनं वळविण्याचं काम साहेब करू लागले.  काही शे. का. पक्षातील नेतेमंडळी आतून साहेबांसोबत संधान बांधून होती.  एके दिवशी साहेबांना निवांत वेळ होता.  

मीच त्यांना विचारलं, ''अहो, आपण एकदा फलटण आणि कराडला जाऊन येऊत.  आईचे आणि चंद्रिकाताईचे सारखे निरोप येत आहेत एकदा येऊन जा म्हणून.''

''हे बघ वेणू, तू बघतीच आहे माझी धावपळ.  घडीची फुरसत नाही.  तुझ्याकडे लक्ष द्यायलाही सवड मिळेना मला.  तू असं कर - एकटी जाऊन ये.'' साहेब.  

''मी गेले असते हो एकटी, पण...'' मी.

''पण काय ?  मला सांगण्यासारखं नाही का ?'' साहेब.

''तसं नाही काही.  तुम्ही घरातील कर्ते आहात.  तुम्हीच ही जबाबदारी पार पाडावयास पाहिजे.'' मी.