• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ५९

''फारच नशीबवान आहेत साहेब तुम्ही... आजचा दिवस भाग्याचा आहे.'' मधाळे.

''पण मी तर काही भविष्य पाहत नाही.  भविष्य पाहून आजचा दिवस मी ठरविला नाही.'' साहेब.

''ते पाहण्याचीदेखील तुम्हाला आवश्यकता नाही साहेब.  आज १४ एप्रिल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस.  या शुभदिनी आपण नवीन जबाबदारी स्वीकारणार आहात... या कार्यात तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे.'' मधाळे.

साहेब म्हणाले, ''आजचा योगायोग चांगला आहे.''

साहेब परत विचार करू लागले.  नियतीला आपल्या हातून वंचितांसाठी काही काम करून घ्यायचं असणार...

गाडी खंडाळ्याच्या घाटातून प्रकाशानंतर अंधार अन् अंधारानंतर प्रकाश असा पाठशिवणीचा खेळ खेळत बोगदे पार करून मुंबईला जवळ करीत होती.  साहेबांच्या जीवनातील पुढील वाटचालीचा हा नियतीचा संकेत तर नव्हता ?

रेल्वेस्टेशनवर उतरून साहेब सरळ जुन्या सचिवालयात पोहोचले.  खेरांचे कार्यालय जुन्या सचिवालयात आहे याची साहेबांना कल्पना होती.  विचारपूस करीत साहेब खेरांच्या खोलीजवळ जाऊन पोहोचले.  खेर कामात असल्याचं त्यांना कळलं.  त्यामुळे खेरांना भेटण्यापूर्वी मोरारजीभाईंना भेटावं असं साहेबांच्या मनात आलं.  साहेबांनी आणि मोरारजींची ओळख नव्हती तरीही साहेब मोरारजींच्या कार्यालयात गेले.  आपली ओळख स्वतःच मोरारजींना करून दिली.  

मोरारजी साहेबांना म्हणाले, ''तुम्ही अजून रुजू झाला नाही ?''

''खेर साहेब कामात आहेत.  तोपर्यंत आपली भेट घ्यावी असं वाटलं म्हणून आपल्या भेटीस आलोय.'' साहेब.

''तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही गृहविभागात रुजू व्हाल का ?''  मोरारजी.

''चालेल.''  साहेब.

मोरारजींनी साहेबांना आपल्या गृहविभागात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून रुजू करून घेतलं.

गृहखात्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेच्या जिव्हाळ्याच्या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम करण्याचं साहेबांनी ठरविलं.  'तमाशा' या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीनतेचा होता.  तसं पाहिलं तर सामान्य माणसापासून ते राजेरजवाड्यापर्यंतची मंडळी या कलेचा आस्वाद घेत; पण तिला समाजमान्यता नव्हती.  चोरून लपून सर्व स्तरावरील कर्ती मंडळी या कलेत रंगून जायची.  मग ती मोगलाई असो की पेशवाई... प्रकार वेगवेगळे होते हाच काय तो त्यात फरक.  लहानपणी यात्रेत अनेक वेळा तमाशाचा आनंद साहेबांनी घेतलेला होता.  त्यातील उत्स्फूर्त हजरजबाबीपणा, शृंगार, नृत्यगीत, नैसर्गिक विनोद, वेशभूषा हा या कलेचा आत्मा होता.  तमाशा म्हणजे 'शिवी' असा समज जनमानसांत झालेला होता.  त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम साहेबांनी केलं.  एक अभ्यासपूर्ण मसुदा साहेबांनी तयार केला.  त्यात कलावंतांना प्रतिष्ठा देण्यासंबंधीचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित केला.  'तमाशा' ऐवजी 'लोककला' असं नामकरण केलं.  त्याला सरकारनं मान्यता देणं किती अगत्याचं आहे याबाबत मसुद्यात पटवून देण्यात आलं.  हा सर्व मसुदा टाईप करण्याचं काम श्रीपाद डोंगरे या टंकलेखकानं केलं.  हा मसुदा मोरारजींमार्फत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविला.  त्या मसुद्यावर मुख्यमंत्र्यांनी 'अप्रतिम' असा आपला शेरा लिहिला.  साहेबांनी या कलेला राजाश्रय मिळवून दिला.  टंकलेखन करणारे श्रीपाद डोंगरे हे प्रथम साहेबांच्या सान्निध्यात आले आणि शेवटपर्यंत कुटुंबीयातील एक सदस्य म्हणूनच घरात वावरले.