• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ३९

''सोमण तेवढे ठामपणानं बोलले नाहीत.  आपल्या मागणीला त्यांचा पाठिंबा राहीलच असं काही सांगता येणार नाही.''

आपली मागणी श्रेष्ठींपुढे रेटायची असं या बैठकीत ठरलं.  सर्वसामान्याला चालेल असा ग्रामीण भागातील उमेदवार निवडण्याची जबाबदारी साहेबांवर सोपविण्यात आली.  साहेबांनी असहकार चळवळ, कायदेभंगाच्या चळवळीमध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सत्याग्रही म्हणून कारागृहाची सजा भोगली होती या निकषावर उमेदवार निवडण्याचं ठरविलं.  राघूअण्णा लिमये आणि साहेबांचं आत्माराम पाटील या नावावर एकमत झालं.  आत्माराम पाटील यांचं नाव शेवटपर्यंत लावून धरण्याचं ठरलं.

आत्माराम बापू पाटील जमीनदारही नव्हते आणि लहान शेतकरीही त्यांना म्हणता येणार नाही.  ते मध्यम शेतकरी होते.  आत्माराम बापू पाटील दोन भावांसोबत उत्तम प्रकारे आपला शेतीव्यवसाय करत.  थोरल्या आणि धाकट्या भावांनी शेती सांभाळायची व मधल्या भावानं म्हणजे आत्माराम बापू पाटलानं पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत काम करायचं असं त्या भावंडांमध्ये ठरलेलं.  आत्माराम पाटील पूर्णवेळ चळवळीत सहभागी होते.  त्यांच्याबद्दल मतदारसंघात आपुलकीची भावना होती.  आत्माराम पाटलांसारखा शेतकर्‍यांचा प्रतिनिधी प्रांतिकला मान्य करावा लागेल; पण आताच जिल्ह्याच्या नेतेमंडळीला दुखवायचे नाही असं साहेबांनी ठरविलं.  आत्माराम पाटलांची बाजू मांडण्याचं काम साहेबांवर सोपविण्यात आलं.  साहेबांनी आत्माराम पाटील यांच्या कार्याची माहिती जमा केली.  १९३० व ३२ च्या दोन्ही आंदोलनांमध्ये ते सहभागी होते.  दोन्ही वेळेस त्यांना कारागृहात डांबण्यात आलं होतं.  पूर्णवेळ देशसेवेसाठी वाहून घेण्याचं त्यांनी ठरविलं होतं.  कोल्हापूर येथे मॅट्रिकपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं होतं.  बोलण्याचालण्यात घरंदाजपणा होता.  भाषेवर प्रभुत्व होतं.  संघटनचातुर्य त्यांच्याजवळ होतं.  उंचीनं कमी पण व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं.

प्रांतिकच्या पुढार्‍यांच्या घराचे उंबरठे झिजविण्याचं काम साहेब व कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलं.  आत्माराम पाटील स्वतः सातारला शंकरराव साठे, भाऊसाहेब सोमण यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालायचे.  साहेबही दर शनिवारी-रविवारी कोल्हापूर, सातारा, कराड असा नियमित प्रवास करून आत्माराम पाटील यांच्या उमेदवारीबद्दल प्रयत्‍नशील होते.  प्रांतिकच्या श्रेष्ठींकडून तीच गुळगुळीत उत्तरं साहेबांना मिळायची.  आत्माराम पाटलांच्या उमेदवारीबद्दल बर्‍याच बातम्या वर्तमानपत्रांत येऊ लागल्या.  कार्यकर्ते विरुद्ध प्रांतिकचे श्रेष्ठी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली.  आत्माराम पाटलांच्या जवळचे बुवासाहेब गोसावी हे प्रांतिकच्या कर्त्या माणसांपैकी एक होते.  त्यांना वारंवार भेटून आपली बाजू त्यांच्यासमोर मांडणं हे काम कार्यकर्ते करू लागले.  वर्तमानपत्रामधून ज्या पुढार्‍यांची नावं उमेदवार म्हणून येत होती त्यांची साहेब भेट घ्यायचे.  ते निवडणूक लढविण्यास तेवढे उत्सुक दिसले नाहीत.

आत्माराम पाटील मित्रमंडळीनं सातारला एक बैठक घेतली.  त्यात आपली कैफियत सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर मांडावी व ते देतील तो निर्णय मान्य करावा, असं या बैठकीत ठरलं.  आत्माराम पाटील यांनी ही जबाबदारी साहेबांवर सोपवली.  साहेब यापूर्वी एकदाच मुंबईला गेले होते.  मुंबईची काहीच माहिती साहेबांना नव्हती.  सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध कार्यकर्ते बाबुराव गोडसे मुंबईत काम करीत होते.  साहेब मुंबईला जाऊन त्यांना भेटले.  मुंबईला येण्यामागचं कारण सांगितलं.  श्री. बाबुराव गोडसे यांनी सरदार पटेल मुंबईत राहत असलेल्या जागी साहेबांना आणून सोडलं.

सरदार पटेल यांचे चिरंजीव डाह्याभाई पटेल यांच्या भव्य बंगल्यासमोर साहेब उभे राहिले.  तिथे कार्यकर्त्यांची रीघ लागलेली.  या रांगेत आपला नंबर केव्हा लागेल असे साहेबांना वाटले.  तरीही साहेबांनी प्रयत्‍न तर करून पाहू, असा मनाचा निश्चय केला.  रांगेत साहेब शेवटचे होते.  तास-दीड तासानंतर रांग संपली.  साहेब एकटेच उभे.  डाह्याभाई पटेल बाहेर आले.