• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ३६

साहेबांनी आपल्या प्रौढ शिक्षण शाळेचा वृत्तांत कर्मवीर अण्णासाहेब शिंदे यांना कळविण्याचं ठरविलं.  कारण आपण त्यांची फसगत केली असा त्यांचा समज होऊ नये म्हणून हरिजन सेवा आणि मॅट्रिकचा अभ्यास यात साहेबांनी स्वतःला वाहून घेतलं.  परीक्षा तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेली.  साहेबांचा आवडता विषय संस्कृत शाळेत चांगल्या प्रकारे शिकविला गोला नाही.  काही मुलांनी बाहेर संस्कृतची शिकवणी लावल्याचं साहेबांच्या कानावर आलं.  तशी व्यवस्था साहेबांना करता आली नाही.  शहरातील एक शास्त्री विद्यार्थ्यांना बोलावून संस्कृत शिकवीत असत.  साहेबांचा एक जिवलग मित्र अनंतराव कुलकर्णी त्या शास्त्रीकडे जात असे.  कुलकर्णीला शास्त्रीबुवाकडे चौकशी करण्यास साहेबांनी सांगितलं.  तीन-चार दिवस लोटले तरी कुलकर्णी काही बोलेना.  शेवटी साहेबांनी त्याला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा कुठं कुलकर्णी अपराधी मनानं म्हणाला,

''शास्त्रीबुवा म्हणाले, मी अब्राह्मणाला संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही.''

हे सांगताना कुलकर्णीचे डोळे पाण्याने डबडबले होते.  साहेबांनी कुलकर्णीची समजूत काढली.  साहेबांनी संस्कृतचा नाद सोडला व मराठी विषय घेऊन तीन-चार महिन्यांत परीक्षेची तयारी केली.

हरिजन सेवा कार्यात साहेबांना अपयश आलं असलं तरी साहेबांनी मॅट्रिकच्या परीक्षेत यश संपादन केलं.  पुढील शिक्षणाबद्दल घरात चर्चा सुरू झाली.  आर्थिक ओढाताण घरात होतीच.  आई व थोरल्या दोन्ही भावांनी पुढील शिक्षणाबद्दल साहेबांना विचारलं.  साहेबांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जातो म्हणून सांगितलं.  सामाजिक समतेचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी तळागाळातील विद्यार्थ्यांकरिता मोफत शिक्षण व वसतिगृहाची व्यवस्था केलेली होती.  साहेबांनी महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापूरची निवड केली.  आई व दोन्ही बंधूंनी साहेबांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या ऐपतीनुसार उचलण्याचं ठरविलं.  साहेबांनी त्यांचे मित्र गौरीहर सिंहासने यांच्याकडे पुढील शिक्षणाचा मनसुबा बोलून दाखविला.  खर्चाबद्दलही चर्चा केली.  गौरीहर सिंहासने यांनी मित्रमंडळींच्या वतीनं साहेबांना खर्चाबद्दल आम्ही सर्व पाहून घेऊ असं सांगितलं.  शेवटी १९३४ च्या जूनमध्ये साहेब कोल्हापूरला पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी निघाले.

आज साहेब कोल्हापूरला जाणार याबद्दल घरात दोघी जावांचं बोलणं चालू होतं.  दोघींनी साहेबांची थट्टामस्करी करण्याचं ठरविलं.  साहेब बाहेरून घरात आले.  त्यांनी पुतण्याला उचलून कडेवर घेतलं.

त्याच्याशी बोलू लागले, ''काय लबाडा, चलायचं का कोल्हापूरला ?''

तोच दरवाजाआडून सौ. सोनू वहिनींचं बोलणं ऐकू आलं.

त्या म्हणाल्या, ''भाऊजी, पुतण्याला घेऊन जाता सोबत; पण तिथं त्याला सांभाळायला काकू हवीय ना ?''

''मला नाही कळलं तुमचं म्हणणं.'' साहेब.

''वेड पांघरुण पेडगावला जाऊ नका...'' सौ. भागीरथी वहिनी.

''खरंच मला नाही कळलं.  असं कोड्यात का बोलता वहिनी ?  सरळ ते काय विचारा.''  साहेब.

''नाही म्हटलं, आम्ही असं ऐकतो की शहरात पोरीपण असतात म्हणे सोबत शिकायला !''  सौ. सोनू वहिनी.

''त्यात काय विशेष !''  साहेब.

''पुतण्याला काकू आणू नका म्हणजे झालं !''  सौ. भागीरथी वहिनी.

''नाही... नाही... असं काही होणार नाही.''  साहेब.