• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - २८

निवडक शंभर माणसे राहतील अशी १२ नंबरच्या बराकीत व्यवस्था होती.  आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन हेच या बराकीचे प्रमुख होते.  रावसाहेबांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं.  त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेण्याचं जेल अधिकार्‍यानं ठरवलं.  प्रशासनाला मदत म्ळणून पटवर्धन जेल कार्यालयात जाऊ लागले.  त्यांच्या या संबंधातून राजबंद्यांना उत्तम अशी सर्व विषयांची व विचाराची पुस्तकं वाचायला मिळू लागली.  सक्तमजुरीची शिक्षा ही कागदावरच होती.  कधीतरी पाच-पन्नासच्या गटाला घेऊन ते रस्त्यावर खडी फोडायला लावीत.  पुढे पुढे तेही काम बंद पडले.  बराकीमध्ये कापडी पट्टे विणण्याचे बैठे काम मिळाले.  बराकीमधील सत्याग्रहींच्या एकमेकांशी ओळखी होऊ लागल्या.  त्यात पुण्याचे श्री. अंतीलकर, श्री. एस.एम. जोशी, श्री. वि. म. भुस्कुटे, आयुर्वेदतज्ज्ञ मामा गोखले यांचा समावेश होता.  समविचारी व खेळाची आवड असणार्‍यांचे एकत्र येऊन गट निर्माण होऊ लागले.

साहेबांच्या वयाच्या तरुणांचा एक गट एकत्र आला.  त्यात सोलापूरचे भोसले, सेनापती बापट यांचे पुत्र वामन बापट, प्रसिद्ध डॉ. लागू यांचे धाकटे बंधू होते.  साहेबांचे कराडचे मित्र कोपर्डेकर व पांडूतात्या डोईफोडे होते.  पुढे या बराकीमध्ये राघूअण्णा आले.  ह. रा. महाजनीसुद्धा बराकीमध्ये होते.  ह. रा. महाजनी सातारा जिल्ह्याचे असल्याने साहेबांच्या परिचयाचे होते.  

आचार्य भागवतांनी साहेबांना व त्यांच्या वयाच्या विद्यार्थ्यांना एक सल्ला दिला.  ''तुम्हाला जेवढे ज्ञान मिळवता येईल तेवढे मिळवा. पुढे तुमचे शिक्षण पूर्ण होईल किंवा नाही काही सांगता येणार नाही.  सर्व विचाराच्या ग्रंथांचे वाचन करा, चर्चा करा आणि तुम्हाला पटेल त्या विचाराच्या मार्गानं जा.''

याबाबत साहेबांनी ह. रा. महाजनी यांच्यासोबत चर्चा केली.  सात-आठ जणांचा एक गट तयार झाला.  ह. रा. महाजनींनी 'शाकुंतल', 'मेघदूत' यांचे वर्ग घेतले.  आचार्य भागवतांनी शेक्सपियरचे 'ज्युलियस सिझर' या नाटकातील इतिहासाचे व सौंदर्यस्थळांचे बारकावे उलगडवून दाखविले.  या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा किती फायदा झाला हे सांगता येणार नाही; पण हे विद्यार्थी इंग्रजी ग्रंथाच्या वाचनाकडे वळले.  त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला.  साहेब इंग्रजी ग्रंथाची निवड करून ते वाचू लागले.  इतरांनी सुचविलेल्या इंग्रजी ग्रंथांचे वाचनही ते करू लागले.  त्यांना इंग्रजी ग्रंथ वाचनाची आवड निर्माण झाली.

गांधीवादाच्या चर्चेसोबतच समाजवाद, मार्क्सवाद याही विचारांची चर्चा होऊ लागली.  साहेबांनी आतापर्यंत गांधीवाद संपूर्णपणे स्वीकारला किंवा नाही याचं उत्तर त्यांना देता येत नव्हतं.  समाजवाद व मार्क्सवाद वाचल्यानंतर साहेबांच्या मनात वैचारिक आंदोलन सुरू झालं.  ज्या विचाराचा वक्ता वर्ग घ्यायला आला की त्याचे विचार ऐकून साहेबांना आपण या विचारांचा स्वीकार करावा, असं वाटायचं.  अशा दोलायमान अवस्थेतून साहेब जात होते.  ह. रा. महाजनी व एस. एम. जोशी यांनी गांधीवाद स्वीकारल्याचं जाणवत नव्हतं.  वि. म. भुस्कुटे हे मार्क्सवादाचे कट्टर पुरस्कर्ते झाले होते.  गांधीवाद, समाजवाद व मार्क्सवाद यापेक्षा वेगळा विचार करणारा एक गट होता.  टिळक आणि गांधी यांनी स्वराज्य मिळविण्यासाठी जो मार्ग दाखविला आहे त्या मार्गाचा अवलंब करून गांधीजी देतील त्या आदेशाप्रमाणं कार्य करू हा तो गट होता.  गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद यावर चर्चा केल्यानं कार्यकर्ते एकमेकांपासून दूर, जातात, एकमेकांची मनं कलुषित होतात, असं या गटाचं मत झालं होतं.

साहेब झपाटलेल्या अवस्थेत वाचन करू लागले.  इंग्रजी ग्रंथ वाचताना साहेबांना इंग्रजी शब्दकोशाचा आधार घ्यावा लागायचा.  आवाक्याबाहेरील ग्रंथ वाचताना अडचण आल्यास साहेब सहकार्‍यांसोबत चर्चा करू लागले.  'रोडस् टू फ्रिडम' हे बर्ट्रांड रसेलचं पुसतक एक महिनाभर साहेब वाचत होते.  हा ग्रंथ वाचल्यावर साहेबांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या.  स्वातंत्र्य हा भारताचा प्रश्न नसून तो मानवमुक्तीचा प्रश्न आहे, असं साहेबांचं मत झालं होतं.  गांधीजी व लेनिनच्या जीवनावरील साहित्य वाचण्यात साहेब दंग झाले.