संत फत्तेसिंग यांनी पंजाबी सुभ्यासाठी दोन वेळेस यापूर्वी शासनाला वेठीस धरलं होतं. केंद्रीय शासनानं लोकसभेचे सभापती सरदार हुकूमसिंग यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नाचा गुंता सोडविण्यासाठी एक समिती गठित केली. या समितीनं विनाविलंब आपला अहवाल शासनाला सादर केला. या समितीच्या शिफारशीनुसार सोपस्कार होऊन पंजाबी सुभा निर्माण करण्यात आला. संत फत्तेसिंग यांनी या निर्णयाबद्दल समाधानही व्यक्त केलं. पंजाबी सुभ्याच्या रचनेबद्दल मात्र त्यांचं समाधान झालं नव्हतं. राजकारणातून निवृत्ती स्वीकारून संपूर्ण वेळ धार्मिक कार्यास वाहून घेण्याचं त्यांनी जाहीर केलं.
संत फत्तेसिंग यांनी घेतलेला राजकारण संन्याशाचा निर्णय जास्त काळ टिकला नाही. अकाली दलाच्या दबावाला बळी पडून त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचं ठरविलं. १७ डिसेंबर १९६६ ला उपोषण सुरू केलं. २७ डिसेंबरला आत्मबलिदान करणार, अशी धमकी केंद्र शासनाला दिली. अकाली दलाच्या ७ सदस्यांनी संत फत्तेसिंग यांना पाठिंबा महणून २४ तास अगोदर आत्मदहनाचा कार्यक्रम जाहीर केला. साथी जयप्रकाश नारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा प्रयत्न सार्थकी लागला नाही.
संत फत्तेसिंग यांच्या साथीदारांच्या अग्निदहनाचा दिवस २६ डिसेंबर उगवला. या तारखेला ४ वाजता हे ७ साथीदार स्वतःला अग्नीच्या हवाली करणार... संपूर्ण पंजाबमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुवर्णमंदिराच्या आवारात अग्निकुंडातील ज्वाला भडकलेल्या. अशा या गंभीर वातावरणात संत फत्तेसिंग यांच्या ७ शिलेदारांनी मंदिरातील तलावात स्नान केलं. अखेरच्या प्रार्थनेल सुरुवात झाली. घडीचा एक-एक ठोका पडत तसतसं मंदिरातलं वातावरण गंभीर स्वरून घेऊ लागलं. घटनेची वेळ समीप येऊन ठेपलेली. घड्याळानं ३.३० चा ठोका दिला.
३.३० च्या ठोक्याला लोकसभेचे सभापती सरदार हुकूमसिंग ध्यानीमनी नसताना अकाली दलाच्या नेत्यांसोबत मंदिरात अवतरले. संत फत्तेसिंग यांच्याशी विचारविनिमय सुरू केला. इकडे अग्निकुंडातील ज्वालांनी उग्ररूप धारण केलेलं. घडीचा ठोका चारच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याच्या काही क्षण अगोदर ७ शिलेदारांचं अग्निदहन आता होणार नाही, हे जाहीर झालं. मंदिराचा परिसर तणावमुक्त झाला. ५ वाजता अकाली दलाच्या नेत्यांनी जाहीर केलं की, सरदार हुकूमसिंग साहेबांकडून काही गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. तो झाला की आम्ही आमचा निर्णय जाहीर करू.... थोड्याच वेळात अकाली दलानं त्यांचा निर्णय जनतेला सांगितला. संत फत्तेसिंग व त्यांच्या ७ साथीदारांनी आत्मदहनाचा निर्णय मागं घेतला.
अमृतसरला पोहोचण्यापूर्वी साहेब व सभापती हुकूमसिंग यांच्यात चर्चा झाली. आजचं हे संकट टळलं पाहिजे याबाबत दोघांचं एकमत झालं. हे संकट कसं टाळायचं हे हुकूमसिंग यांनी ठरवायचं. साहेबांनी मात्र कुठलंही आश्वासन न देता ही दुःखद घटना टळली पाहिजे असं मत व्यक्त केलं. सरदार हुकूमसिंग आणि संत फत्तेसिंग यांनी मुख्यमंत्री ग्यानी गुरुमुखसिंग मुसाफीर यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी साहेबांशी दिल्लीला संपर्क साधला. या आत्मदहनाच्या परिस्थितीचा विचार करण्याकरिता केंद्र सरकारनं एक समिती नियुक्त करावी. याबाबतीत साहेबांनी ठाम असं काही सांगितलं नाही. यावर विचार करता येईल असं मोघम मुख्यमंत्र्याला सांगितलं.