• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - २०३

'रिव्हेरा' या निवासस्थानी साहेब विश्रांती घेत असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार निवड करण्याचं काम साहेबांनी हातावेगळं केलं.  दिल्लीहून साहेबांना संदेश मिळाला.  संदेश इंदिराजींचा होता.  गृहमंत्री म्हणून साहेबांची इंदिराजींनी निवड केली आहे.  

७ नोव्हेंबर १९६६ राजी गोवधबंदीसाठी देशातील हजारो साधू-संन्याशांनी संसदेवर हिंसक निदर्शने केली.  या हिंसक साधूंना शंकराचार्यांचा पाठिंबा मिळाला.  या निदर्शनकर्त्यांच्या उग्र अवतारानं दिल्लीचं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं.  दिल्लीवर या साधूंनी कब्जा मिळविला.  गृहखातं या साधूंना आवर घालण्यात कमी पडू लागलं.  हा प्रश्न गृहमंत्र्यांनी नीट हाताळला नाही, असा आरोप गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांच्यावर करण्यात संसद सदस्य सरसावले.  संसद सदस्यांनी नंदांच्या राजीनाम्याची मागणी केली.  संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीला इंदिराजी स्वतः हजर होत्या.  

या बैठकीत पंतप्रधानांनी आपली बाजू घेतली नाही म्हणून नंदाजींनी रागाच्या भरात गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.  इंदिराजींनी तो स्वीकारला.  गृहमंत्र्याचा कारभार स्वतःकडे घेतला.  या साधूच्या आंदोलनापाठीमागे इंदिराजी असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  ही घटना ७ नोव्हेंबरची आणि साहेबांना ८ नाव्हेंबरला मुंबईत इंदिराजींचा संदेश मिळाला.  

गृहमंत्रीपदावर हक्क सांगणारे महाराष्ट्राचे स. का. पाटील बाशिंग बांधून साहेबांच्या विरोधात सरसावले.  साहेबांना गृहमंत्रीपद दिल्यास हे महाशय राजीनाम्याची धमकी इंदिराजींना देऊ लागले.  स. का. पाटील केंद्रात रेल्वेमंत्री म्हणून कारभार पाहत होते.  कामराज यांना इंदिराजींनी स्पष्ट कल्पना दिली होती की, ''मी गृहमंत्रीपदी यशवंतरावांची निवड केलेली आहे.  हा माझा अधिकार मी वापरलेला आहे.''

कामराज यांनी साहेबांच्या निवडीबद्दल खळखळ करून बघितली; पण इंदिराजींच्या आग्रहाखातर त्यांनी साहेबांच्या निवडीला मूकसंमती दिली.

१४ नोव्हेंबर १९६६ ला गृहमंत्रीपदाची सूत्रं साहेबांनी स्वीकारली.  संरक्षणमंत्रीपदाची सूत्रं साहेबांनी नेहरूजींकडून स्वीकारली होती.  आज इंदिराजींकडून गृहमंत्रीपदाची सूत्रं साहेब स्वीकारत आहेत.  दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांनी या निवडीचं स्वागत केलं.  'गृहमंत्रीपदासाठी योग्य अशा नेत्याची निवड' अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या.  संकटावर मात करणारा एकमेव नेता म्हणून साहेबांची देशाला ओळख झाली.

गृहकलहात भारतीय राजकारण पोखरलेलं.  गोवधबंदी कायदा करावा याकरिता पुरीचे शंकराचार्य यांनी यमुनेच्या तीरावर उपोषण सुरू केलेलं.  नंतर फत्तेसिंह व त्यांच्या भक्तांनी उपोषण सुरू करून अग्निकुंडात उडी टाकून आत्मदहनाची धमकी दिलेली.  संयुक्त समाजवादी पक्षाच्या चिथावणीला बळी पडून विद्यार्थी देशभर धुमाकूळ घालीत आहेत.  या ६६ च्या काळात देश संकटाच्या टोकावर उभा आहे.  पक्षांतर्गत अविश्वासाचं वातावरण.  या सर्व संकटांवर साहेबांना मात करावयाची आहे.  भारतीय लोकशाहीचं कसोटीचं हे वर्ष.