'नया जीवन' नावाच्या कवीनं तर शत्रूला इशाराच दिला. ते लिहितात,
ये मेनन नही है, ये चव्हाण है ।
यें स्पीकर नहीं है, ये एक आन है ॥
कोई जा के कह दो, ये अयुब से ।
अडेगा जो इससे, वो मिट जाएगा ॥
४ जानेवारी १९६६ ला अयुबखान आणि शास्त्रीजींना ताश्कंद येथे एकत्र आणण्यात कोसिजीनला यश आलं. युद्धसमाप्तीनंतर ताश्कंदला जाण्यापूर्वी साहेब व शास्त्रीजी एकत्र बसले. वाटाघाटीसंबंधी चर्चा केली. दोन राष्ट्रांत समेट घडवीत असताना राष्ट्रप्रमुखासोबत त्या देशाचे परराष्ट्रमंत्री असतात; परंतु शास्त्रीजींनी साहेबांना सोबत घेतलं. लष्करी कराराच्या संदर्भात साहेबांनी शास्त्रीजींना साहाय्य केलं. २५ फेब्रुवारी ६६ पूर्वी दोन्ही देशांनी आपापले सैन्य ५ ऑगस्ट १९६५ ला जिथे होतं त्या ठिकाणापर्यंत मागे घ्यावं, युद्धबंदीच्या अटींची दोन्ही देशांनी पूर्तता करावी तसेच राजनैतिक संबंध पूर्ववत करून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करावी असं ठरलं.
लष्करी युद्धात भारत जिंकला, पण तहात हरला. शास्त्रीजींसारखा भारतमातेचा लाल आम्ही तहात गमावून बसलो. १० जानेवारी १९६६ ला करारावर सही केल्यानंतर मध्यरात्री काळानं या भारतरत्नावर झडप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेलं. ११ जानेवारीला शास्त्रीजींचं निधन झाल्याचं जाहीर झालं.
शास्त्रीजींच्या निधनानंतर हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांनी सूत्रं स्वीकारली. दोन वेळेस हंगामी पंतप्रधानपद भूषविल्यानंतर त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. आपल्याशिवाय आता दुसरा कुणी पंतप्रधान होणार नाही, आपणच खरे पंतप्रधानपदाचे हक्कदार आहोत, असे त्यांना वाटू लागले. मागच्या वेळी पंतप्रधानपदानं हुलकावणी दिलेले मोरारजी देसाई या वेळी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होते. कामराज यांनी वेगळीच चाल खेळली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई व साहेब यांच्यापैकी त्यांनी इंदिरा गांधींना पसंती दिली. मोरारजी आपल्या ऐकण्याबाहेरचे आहेत. साहेबांची प्रतिमा कणखर बाण्याचा पुरुष म्हणून झालेली. बुद्धिचातुर्यात हा गडी भारी पडेल अशी समजूत कामराज यांची झाली. इंदिरा गांधींना आपण केव्हाही पंतप्रधानपदावरून दूर सारू शकतो ही भावना कामराज यांची होती. वसंतराव नाईक यांनी सारी शक्ती साहेबांच्या पाठीमागे उभी केली. महाराष्ट्रातील व देशातील तरुण खासदार साहेबांच्या पाठीमागे होते. इंदिरा गांधी उभ्या राहणार नसतील तर मी निवडणूक लढविण्याचा विचार करील, असं साहेबांनी पाठीराख्यांना सांगितलं. साहेबांनी इंदिराजींची भेट घेतली.
मनात कुठलाही आडपडदा न ठेवता इंदिराजींना विचारलं, ''आपण जर पंतप्रधानपदासाठी इच्छुक असाल तर माझा पाठिंबा तुम्हाला; पण तुमची इच्छा नसेत तर मी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवील. आपण मला पाठिंबा द्यावा.''