• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १९१

अॅन्थनी म्हणाले, ''कृष्ण मेनन यांनी लष्करात एक वेगळा पायंडा पाडला.  कर्तव्यदक्ष लष्करी अधिकार्‍यांना बाजूला सारून लष्करात हुजर्‍यांची फौज निर्माण केली.  या फौजेला 'आग्रा ब्रिगेडियर्स' म्हणून संबोधण्यात येते.  ही भरती बहुसंख्य उत्तर प्रदेशातून होत आहे.  कोअर कमांडर लेप्ट. जनरल कौल या आग्रा ब्रिगेडियर्सचे जनक आहेत.  माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन हे खरे या देशाचे गुन्हेगार आहेत.  हे सर्व काही लष्करात घडत होते हे मेनन यांच्या आशीर्वादानेच.  नेफा आघाडीवरील अपयश हे लष्कराचं नाही.  स्वाभिमानी आणि लढवय्या जनरल्सना घरी बसवून त्यांच्या जागी अकार्यक्षम जनरल्सची नेमणूक केली गेली.  त्यामुळं आपल्या लष्कराला हे अपयश स्वीकारावं लागलं.  तरी अशा जनरल्सना दोषी न धरता त्यांची पाठराखण केली जात आहे.  हा राजकीय नेतृत्वाचा पराभव आहे.  मला खेदानं सांगावं लागत आहे की, लष्करानं या जनरल्सला 'खच्चर कोअर कमांडर' ही पदवी दिलेली आहे.''

संसदेत स्मशानशांतता पसरलेली.  ऍन्थनी यांच्या बोचर्‍या उपहासगर्भ भाषणानं संसद हसायच्या ऐवजी अधिक धीरगंभीर झाली.  प्रत्येक सदस्याच्या काळजाला जाऊन भिडणारं वक्तव्य संसदेला चिंतामग्न करीत आहे.  अशा या वातावरणात कृष्ण चंद्र पंत यांनी परदेशातील युद्धाच्या अपयशाचे दाखले दिले व त्यापासून आपण शिकले पाहिजे, पराजयाची कारणमीमांसा करत असताना त्यातील उणिवांचा शोध घेऊन वर्तमानकाळात त्या उणिवा दूर करून सैन्याचे मनोबल वाढविले पाहिजे.  या पराजयावर केवळ चर्चा करून काहीही निष्पन्न होणार नाही.  केवळ वेळेचा अपव्यय होईल.

साहेबांच्या हे लक्षात आले की, दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर आपण प्रांजळ आणि निर्मळ आपली भूमिका मांडली तर आपणास या दोन्ही सभागृहांचा पाठिंबा मिळू शकतो.  विरोधी सदस्यांच्या वक्तव्यातून हे निदर्शनास आले की, त्यांचा रोख नेहरूजी, कृष्ण मेनन, कौल यांच्या दिशेने आहे.

राज्यसभेत आणि लोकसभेत बोलताना साहेब म्हणाले, ''ही चौकशी समिती नसून सत्यशोधन समिती आहे. कुणा एक्स किंवा वायला दोषी ठरविण्यासाठी ही समिती नसून पराभवाच्या मुळाशी जाऊन त्यामागील सत्य शोधण्याकरिता हा सर्व खटाटोप आम्ही केला आहे.  सन्माननीय सदस्यांच्या भावनांचा आदर ठेवून सत्य काय आहे हे मी आपल्यासमोर निर्मळ आणि प्रांजळपणे ठेवीत आहे.  मला कुणाची वकिली करायची गरज नाही.  मी वकिली करीत आहे देशाच्या संरक्षणाची.  भविष्यात माझ्या देशावर असा प्रसंग आला तर त्याला प्रत्युत्तर कसे द्यावयाचे या चिंतेत मी आहे.  पराभवाच्या या सत्यशोधनातून जे काय आमच्या निदर्शनास आले ते मी आपल्यासमोर ठेवत आहे.  सर्वप्रथम आम्ही हे मान्य केलं पाहिजे की, आम्ही गाफील राहिलो. भौगोलिक परिस्थितीचा फायदा शत्रूपक्षाला मिळाला.  गेल्या दहावीस वर्षांपासून सैन्याचं सबलीकरण या शत्रूपक्षानं केलं.  लष्कराची संख्या आपली आणि त्यांची तुलना केली असता त्यांच्या लष्करी संख्येच्या तुलनेत आपण पासंगालाही नव्हतो. लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यातील परस्परांवरील विश्वासाचा अभाव.  लष्करी अधिकारी आणि जवान खांद्याला खांदा लावून शत्रूपक्षाच्या गोळ्यांना समोरे जात असतील तर सैनिकांचा ऊर भरून येतो.  तो अधिक ईर्षेनं शत्रूच्या सैन्यावर तुटून पडतो.  विजयासाठी ज्या युद्धसामुग्रीची आवश्यकता असते ती रसद, ती कुमक वेळेवर पोहोचत नसेलच तर सैनिक हतबल होतो.  आपले सैनिक तुटपुंज्या शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानं मृत्यूशी झुंज देत होते.  आपल्याकडं कमतरता होती आधुनिक साधनसामुग्रीची.  यातही आपण कमी पडलो.