• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १४९

''मोरारजीभाईंच्या मताशी मी सहमत आहे; परंतु द्वैभाषिक राज्य राबविण्याची कल्पना आमच्याच माथी का मारण्यात आली ?  असं लोक विचारतात.  यासाठी आमचीच निवड का करण्यात आली ?  या प्रश्नांना आमच्याजवळ समाधानकारक उत्तर नाही.  ही गोष्ट त्यांच्या मनाला डाचते.  इतरांचा हक्क तुम्ही मान्य करता; परंतु आमचा हक्क मात्र तुम्ही डावलता... हे कुठंतरी मनाला बोचतंय.  मराठी जनता याबद्दल जागृत आहे.  त्यांच्या भावना अधिक तीव्र आहेत.  त्यांच्यातील आपल्यावर अन्याय झाल्याची भावना उफाळून येते.  त्यांना पटवून देणे अवघड होऊन बसते.'' साहेब.  

यावर मोरारजी मत व्यक्त करताना म्हणाले, ''इतर राज्यांत ही कल्पना राबविण्याचा विचार होता. केरळ आणि तामिळनाडू एकत्र ठेवून तेथे द्वैभाषिक राबवायचे ठरले होते; पण ही कल्पना कामराज यांनी मानली नाही.  त्यांनी ती फेटाळून लावली.''  

मोरारजींनंतर साहेब म्हणाले, ''द्वैभाषिकाच्या विरोधात मी नाही.  जनतेच्या मनाचा विचार केल्यास राजकीयदृष्ट्या हा प्रयोग फसलेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.''

या बैठकीला चौघेच हजर होते.  या चर्चेनंतर ही बैठक संपली.  ही बैठक निर्णायक ठरली.  

या बैठकीचा वृत्तांत दिल्ली, मुंबई व अहमदाबाद इत्यादी ठिकाणच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाला.  नेहरूजींच्या वर्तुळातून तो वृत्तांत पसरविण्यात आला असावा. साहेब दिल्लीहून मुंबईला येताच भेटणार्‍यांची रीघ लागली.  विधानसभेचं अधिवेशन चालू होतं.  साहेबांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी जीवराज मेहता यांना हा विधिमंडळाचा विश्वासभंग झाला असं वाटलं.  त्यांचा गैरसमज साहेबांनी दूर केला.  द्वैभाषिकाची फेरपुनर्रचना दृष्टिक्षेपात आली असताना ढेबर यांचा फेरपुनर्रचनेला विरोध होता.  ढेबर हे या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते.  

त्यांनी नेहरूजींना प्रश्न केला, ''गुजरात जनतेची समजूत कशी काढणार ?  त्यांना ही बदललेली भूमिका कशी पटवून सांगणार ?''

नेहरूजींच्या स्वभावातले एक वैशिष्ट्य होते.  अशाप्रसंगी ते आपल्या कोशात जाऊन बसत.  तसे ते बसले.

साहेबांनी नेहरूजींना विचारले, ''फेरविचाराचे पाऊल कसे टाकायचे ?''  

त्यांनी मोरारजी आणि ढेबर यांचे म्हणणे ऐकविले.  साहेबांनी या दोघांच्या शंकेचे निरसन करावे असे नेहरूजींनी सांगितले.  ही प्रक्रिया येथेच थांबली तर जनतेच्या रेट्याला कसे तोंड द्यायचे हा प्रश्न साहेबांसमोर उभा ठाकला.  साहेब बेचैन झाले.

विदर्भात अणे यांच्या उचापतीनं जोर धरला. जनता अणे यांच्या चिथावणीला बळी पडून असंतोष व्यक्त करू लागली.  ढेबर, मोरारजी आणि विदर्भाच्या असंतोषाला तोंड देण्यासाठी साहेब सज्ज झाले.  नेहरूजींनी हे अडथळे कसे दूर करावयाचे याची जबाबदारी साहेबांवर टाकली.  साहेबांनी वसंतराव नाईक, शेषराव वानखेडे, नासिकराव तिरपुडे, काझी यांना बोलावून नेहरूजींची भूमिका समजावून सांगितली.  या मंत्र्यांनी साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं.  त्यांच्या परीनं ते दिल्लीतील श्रेष्ठींशी विचारविनिमय करू लागले.