• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १२८

कराडचा निकाल लागला.  साहेब सहाशे मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं.  साहेबांच्या विजयाचा निष्कर्ष काढण्यात बुद्धिजीवी वर्गात चढाओढ लागली.  कुणी म्हणू लागले, 'साहेबांचा विजय म्हणजे द्वैभाषिकाचा विजय.'  काहींच्या मते 'अहिंसेनं हिंसेवर मिळविलेला हा विजय.'  वर्तमानपत्रांच्या मते, 'यशवंतरावांचा विजय हा हिंसक आंदोलनावर लोकशाहीनं मिळविलेला विजय.'  साहेबांनी आपल्या विजयाबद्दल 'माझा विजय हा द्वैभाषिकाला मिळालेला कौल आहे' असं मत व्यक्त केलं.  विदर्भ आणि मराठवाड्यानं समितीकडं दुर्लक्ष केलं.  गुजरातेत एक-दोन जिल्हे सोडता महागुजरात समितीची डाळ शिजली नाही.  शेवटी द्वैभाषिक राज्य नेहरूजी व साहेबांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहिलं.  पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत काहीअंशी भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.  इथे इंडियाला यश मिळालं.  उर्वरित महाराष्ट्रात मात्र इंडियाचं पानिपत झालं.

संयुक्त महाराष्ट्राची मागणी हा बुद्धिजीवी वर्गांनी पांघरलेला बुरखा होता.  त्यांचा व्यक्तिद्वेष हा छुपा कार्यक्रम होता.  समाजात व्यक्तिद्वेष पेरण्यासाठी राज्य पुनर्रचनेचा आश्रय घेऊन पद्धतशीर व्यक्तिद्वेषाची पाठराखण करण्यात बुद्धिजीवी मंडळी मश्गुल होती.  त्यांना ग्रामीण जनतेच्या मनाचा अंदाज बांधता आला नाही.  काँग्रेसला गुंड व पुंड म्हणणार्‍या विरोधकांनी साधनशुचितेचीही निवडणुकीत हत्या केली होती.  साहेबांना विश्वासघातकी म्हणणारे स्वतः जनतेचा विश्वासघात करीत होते.  शंभर वर्षांपूर्वी याच वर्षी स्वातंत्र्याकरिता बंड करण्यात आलं होतं, असं बुद्धिजीवी सांगतात.  त्या बंडातून प्रेरणा घेऊन मिळविलेल्या स्वातंत्र्याला लोकशाहीत सुरुंग लावण्याचं काम इंडियाप्रवृत्तीच्या लोकांनी आरंभिलं होतं.  त्यांच्या या आत्मघातकी वृत्तीला चिरडून टाकण्याचं काम लोकशाहीत जनतेनं केलं.  १९५७ ची निवडणूक अटीतटीची झाली.  काँग्रेस पक्षाला विजय मिळाला.

या विजयाचं स्वागत करताना साहेब म्हणाले, ''हे यश माझं व्यक्तिगत नसून काँग्रेसच्या विचाराचं आहे.  स्थानिक प्रश्नाला किती महत्त्व द्यायचं हे आमचा मतदार जाणून आहे.  त्यांना देशहित महत्त्वाचे आहे.  मी नेहमीच देशहिताचा विचार घेऊन राजकारण करीत आलो आहे.  माझ्या देशहिताच्या विचारांना मतदारांनी कौल दिलेला आहे.  द्वैष, तिरस्कार करून देशाचा गाडा चालविता येणार नाही याचा विरोधकांनी विचार करावा.  निवडणुकीत झालंगेलं गंगेला मिळालं.  आपण सर्व विसरून जाऊ आणि एकदिलानं देशाचं व वंचित नागरिकांचं भवितव्य घडविण्याकरिता एकत्र काम करूया.''  एवढे बोलून साहेबांनी शेवटी मतदारांचे आभार मानले.

नव्या विधानसभेच्या नेतेपदी साहेबांची फेरनिवड झाली.  साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतली.  साहेबांनी सहकारी मंत्र्यांची निवड करताना विभागवार विचार करून प्रतिनिधत्व दिलं.  विदर्भ आणि मराठवाड्याला झुकतं माप दिलं.  विधानसभेत विरोधक प्रबळ असताना त्यांना त्याच तोडीचे सडेतोड उत्तर देणारे सहकारी निवडले.  त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्याची आखणी केली.  विधानसभेत विरोधकांनी कितीही अकांडतांडव केलं तरी शांतता भंगू द्यायची नाही, असं सत्ताधार्‍यांनी ठरविलं.  राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याने सत्ताधार्‍यांना विरोधकांनी धारेवर धरलं.  सत्ताधार्‍यांच्या दबावामुळेच राज्यपालांनी आपल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख टाळला, असा आरोप विरोधक सत्ताधार्‍यांवर करू लागले.  विधानसभा वेळीस धरली.  सभागृहामध्ये शक्यतो कटुता टाळून कामकाज सुरळीत पार पाडण्याची भूमिका सत्ताधार्‍यांनी घेतली.  साहेबांनी मनाची विचलता ढळू न देता शांतपणे विरोधकांना उत्तरं दिली.

म्हणाले, ''देशाचे हित लक्षात घेऊन देशपातळीवर निर्णय घेण्यात येतात.  द्वैभाषिक राज्याचा निर्णय देश आणि मुंबई राज्यातील जनतेचं हित लक्षात घेऊन घेतलेला आहे.  जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून द्वैभाषिक आपल्याला राबवावे लागणार आहे.  यात विरोधकांनी विरोधासाठी विरोध करण्याचं टाळून विधायक आणि लोकहितासाठी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका पार पाडावी.''