• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ११३

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं अधिवेशनाला जोडून प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित केली.  या बैठकीला नेहरूजींना आमंत्रित करण्यात आलं.  त्यांनी तसं येण्याचं कबूलही केलं; पण त्यांनी ऐनवेळी कार्यक्रमात बदल करून महाराष्ट्राच्या निवडक नेत्यांना राजभवनावर चर्चेकरिता येण्याचं सांगितलं.  हिरे आणि गाडगीळ यांनी राजभवनावर जाण्यास नकार दिला.  साहेब, देवगिरीकर आणि भारदे हे नेहरूजींच्या भेटीकरिता राजभवनावर गेले.  या भेटीत नेहरूजी तणावग्रस्त दिसले.  नेहरूजींनी या निघांसोबत मनमोकळ्यापणानं चर्चा केली.  शांतपणे या तिघांचं म्हणणं ऐकून घेतलं.  'गुजरात वेगळा होऊ द्या, नंतर मुंबईबद्दल विचार करू' असं नेहरूजी या तिघांजवळ बोलले.  महाराष्ट्राची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीसमोर ठेवावी, अशी विनवणी साहेबांनी नेहरूजींना केली.  साहेबांची ही मागणी त्यांनी मान्य केली.  सायंकाळच्या चौपाटीवरील जाहीर सभेतही सांगतो, असं या तिघांजवळ कबूल केलं.  

निदर्शनं, दगडफेक, घोषणाबाजी, अधिवेशनाला येणार्‍या काँग्रेस प्रतिनिधींची अडवणूक करणे, अपमानास्पद वागणूक देणे इत्यादी घटनांनी नेहरूजी चिडले होते.  यापूर्वीच्या सभेत नेहरूजी अत्यंत शांत व धीरगंभीरपणे मुद्दे मांडायचे.  त्यांचं भाषण ऐकवत राहावं असं वाटायचं; पण आजच्या सभेत ते संतापलेल्या अवस्थेत होते.

म्हणाले, ''दगडफेक, निदर्शने, घोषणाबाजी या कृत्यानं सरकार दबावाला बळी पडेल असं कुणाला वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे.  दगडांच्या वर्षावानं हे सरकार कोसळेल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असं मला खेदानं म्हणावं वाटतं.  दगडांच्या मार्‍यानं निष्पाप लोकांचा कपाळमोक्ष होत आहे.  तुम्हाला जर माझ्यावर हल्ला करावयाचा असेल तर मी हा तुमच्यासमोर उभा आहे.  माझं डोकं हवं असेल तर घेऊ द्या त्यांना माझं डोकं; पण लक्षात ठेवा, हे सरकार अशा भ्याड हल्ल्यासमोर नमणार नाही आणि कोसळणारही नाही.''

अधिवेशनातून परत जात असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या गाड्यांवर निदर्शकांनी दगडफेक केली.  शहा, संघवी, वाडीलाल यांच्या मोटारी चर्नी रोडजवळ अडविण्यात आल्या.  वाडीलाल यांनी गर्दीच्या दिशेनं पिस्तूल झाडलं.  सीताराम घाडीगावकर धारातीर्थी पडला.  जनतेचा क्रोध अनावर झाला.  जनतेनं संघवी व पांचाळ यांना मोटारीतून ओढून बाहेर काढलं आणि चांगला चोप दिला.  वाडीलाल यांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली असल्याचं समर्थन मोरारजींनी केलं.  मुंबई प्रदेश काँग्रेस व मोरारजींचा डाव हाणून पाडण्यात मुंबईकर यशस्वी झाले.  मुंबईत अधिवेशन घेऊन मुंबईतील जनता मुंबईच्या निर्णयाच्या बाजूनं आहे हे नेहरूजींच्या निदर्शनास मोरारजींना आणून द्यायचं होतं.  जनतेनं सभामंडपाची मोडतोड, जाळपोळ व पुढार्‍यांना धक्काबुक्की करून अधिवेशनाचे तीनतेरा वाजविले.  मोरारजींची दादागिरी मुंबईकरांनी मोडून काढली.  मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याची कुठलीच संधी मोरारजी सोडत नसत.

महाराष्ट्राच्या प्रश्नाचा काँग्रेस श्रेष्ठींनी पुनर्विचार करावा याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक १५ जून १९५६ ला सुरू झाली.  काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर जो निर्णय घेतला त्याबद्दल नापसंती दर्शवून प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांनी आणि असेंब्लीच्या सदस्यांनी राजीनामे द्यावेत असं सुचविण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र व पूर्व खान्देशाच्या प्रतिनिधींनी काँग्रेस श्रेष्ठींचा निर्णय आपल्यावर बंधनकारक आहे असं मत व्यक्त केलं.  कार्यकारी मंडळात प्रथम साहेब विरुद्ध हिरे असं वातावरण निर्माण झालं.  हे दोघे एकमेकांच्या समोर आले.  कोकणचे नेते, पी. के. सावंत, भास्कर दिघे, भाऊसाहेब वर्तक आणि हिरे एका बाजूला तर देवकीनंदन नारायण, रत्‍नाप्पा कुंभार, छन्नुसिंग चंदीले आणि साहेब दुसर्‍या बाजूला अशी फाळणी प्रदेश काँग्रेसची झाली.  गोपाळराव खेडकर, तुमपल्लीवार बैठकीस हजर नव्हते; पण ते श्रेष्ठींच्या निर्णयाशी बांधी राहावं या विचाराचे होते.