(२) अमका पक्षवाला काय म्हणतो त्यापेक्षा या सगळ्या पक्षाच्या बाहेर म्हणून जी काही जनता आहे, जो बहुजन आहे, त्याचा काय अंदाज आहे, ते पाहून शहाण्या पक्षाने व शहाण्या राज्यकर्त्याने आपले धोरण ठरवावे. राज्ये जी चालतात ती, राज्य चालविणा-या माणसापेक्षा राज्य शक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या पुण्याईने चालतात. ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात त्यांच्या साह्याने ती चालतात.
(३) शहर व खेडे यांच्यातील अंतर कमी झाले पाहिजे. उत्पादनाचे नवे तंत्र व विज्ञान निर्माण करणारी साधने शेतक-यांपर्यंत गेली पाहिजेत. सर्वंकष विकास झाला पाहिजे. शेतीचा प्रश्न हा रावणासारखा आहे. जेथे पाहावे तेथे त्याला तोंडा आहे, आणि त्याच्या प्रत्येक तोंडाशी घास द्यावा लागतो इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे.
(४) शिक्षित व्यक्ती स्वतःच्या भोवती घडणा-या गोष्टी आणि जगामध्ये घडणा-या इतर गोष्टी याची संगती लावते. आपल्या जीवनावर याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेते. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे खेड्यातील व शहरातील माणूस यांच्यात जे कृत्रिम अंतर आहे ते कमी झाले पाहिजे. आर्थिक रचनेत बदल व्हावा. छोटे छोटे उद्योगधंदे काढावेत. शिक्षण घेऊन तयार झालेला तरुण हा गावातील शेतीच्या विकासाचा, ग्रामीण जीवनाच्या विकासाच्या उपयोगी पडण्याइतका सकस नागरिक व्हावा. गुणवत्तेवर आधारलेले नेतृत्व निर्माण केले पाहिजे.
यशवंतराव चव्हाण
''सह्याद्रीचे वारे''
रसेल यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी आपले जीवन तीन प्रकारच्या (Passions) भावनांनी नियंत्रित झाल्याचे म्हटले आहे. ''त्यांचे मन प्रीतीने मोहित झाले होते, ज्ञानाने मोहित झाले होते आणि दुःखी मानवाबद्दलच्या करुणेने ते भरून गेले होते.'' प्रेम मानवी स्वभाव धर्म आहे. ज्ञानाचा पाठलाग करून दुःखी मानवाबद्दल करुणा वाटली तरच मानव तत्त्वज्ञानी होऊ शकतो. दुःखी मानवासंबंधी करुणेने बुद्धाला प्रेरणा दिली आणि मानवतेला एक महापुरुष मिळाला. गरिबांच्या, पददलितांच्या घरात जन्म झाल्यामुळे होणा-या अपमानाची, अन्यायाची पोटतिडीक पोटामध्ये जळू लागली आणि त्यातून डॉ. आंबेडकर निर्माण झाले. महापुरुषांना जन्म देणा-या प्रेरणा या अशा आहेत. परंतु कोठल्याही प्रेरणेशिवाय राष्ट्र पुढे जात नसते.
समाज उतरंडीसारखा आहे. आम्ही सर्व एकमेकांच्या डोक्यावर बसलो आहोत; आणि वरचा जो खालच्याच्या डोक्यावर बसला आहे, तो नुसता बसलेला नाही तर तो त्याचा गळा धरून बसला आहे, त्याचे तोंड बंद करून बसला आहे. खालच्याला काहीच वाव नाही. ही उतरंड ज्या दिवशी आपण मोडू त्याच दिवशी खरी क्रांती होईल.
यशवंतराव चव्हाण
''युगान्तर''