• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ७६

सांगली येथे केलेल्या भाषणात ते म्हणाले होते की नेहरू हे महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत.  या वाक्याने टीकेच्या आगीचे मोहोळ उठले.  वास्तविक त्याचा अर्थ भारत जगला तरच महाराष्ट्र जगेल (कारण नेहरू भारताचे प्रतिनिधी होते.) असा होता.  महाराष्ट्रात जे जे उंच असेल ते ते भारताच्या उत्थापनासाठी यावे हा त्याचा अर्थ होता.  पण त्यांचा कलात्मक जीवनपट सर्वांना उमगला असे नाही.  यशवंतराव स्वगृही परतले त्यावरही खूप टीका झाली.  पण लोकमताला सोडून, लोकांना त्यागून राहण्याची सवय नसलेले यशवंतराव पुन्हा लोकांत, प्रवाहात म्हणजे स्वगृही परत आले असा त्याचा अर्थ होता, पण इमर्सन म्हणतो त्याप्रमाणे मोठ्या माणसांबद्दल नेहमीच गैरसमज होतात.  खरे तर निष्क्रिय माणसाला शत्रू नसतात.  जो कर्तबगार असतो त्यालाच शत्रू निर्माण होतात.  स्वतःचा मोठेपणा वाढविण्यासाठी ते नाटकीपणापासून, दंभ-ढोंगापासून, शेकडो योजने दूर राहिले.  राजकारण, समाजकारण, सहकार, शेती, उद्योग यांत त्यांनी माणसे अक्षरशः उभी केली.  काळ्या मातीतून सोन्यासारखी माणसे उभी करण्याची किमया त्यांनी घडविली.  त्यामुळेच ते गेले तेव्हा लोकसिंहासन रिकामे झाले अशी लोकांची भावना बनली.  मनाने मोठे, विचाराने समृद्ध, आचाराने निष्कलंक असे यशवंतराव महाराष्ट्राची शान होती.  अस्मिता होती.  शिवाजी महाराजांबरोबर माझी तुलना करू नका असे सुचविताना यशवंतराव म्हणाले की शिवाजी व टिळक एकदाच होऊन गेले.  ते पुन्हा होणे नाही.  पण तीच तेजस्विता, तीच अस्मिता महाराष्ट्रात यशवंतरावांनी जोपासली त्यामुळे शिवाजीराजांबरोबर त्यांची तुलना करण्याचा लोकांचा अधिकार यशवंतराव हिरावून घेऊ शकले नाहीत.

जीवनात राजकारण हेच सर्वस्व त्यांनी कधी मानले नाही.  राजकारणाच्या धकाधकीला साहित्याची सोनेरी किनार त्यांनी लावली.  त्यांची संभावना एका जर्मन पत्रकाराने आधुनिक बुद्धिनिष्ठ युगाचे नेते अशी केली.  त्यांचा मानवतावाद याच स्त्रोतातून अवतरला.  हिमालयातील गंगा जेव्हा भागीरथी होऊन येते तेव्हाच ती लोकोपयोगी बनते, तसेच ज्ञानाची गंगा समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचली म्हणजे ती सर्वांना कल्याणकारक होईल असे त्यांना वाटे.  ते लेखक, कवी, विद्वानांचे चाहते होते.  कारमध्ये, विमानात, प्रवासात ते पुस्तके वाचून काढीत.  वाचायला वेळ मिळत नाही अशी तक्रार करून एकदा ते म्हणाले होते की, पाचसहा वर्षांत माझ्या ह्या बुद्धीवर गंज चढेल की काय अशी भीती वाटते.  साहित्यिक मन असलेल्या ऐन संवेदनशील राजकारणी नेत्याचे हे विचार निश्चितच लोभस आहेत.  'शांतिचितेचे भस्म' हा त्यांचा लेख त्यांच्या सहृदय साहित्य कवीचा उत्कृष्ट नमुना आहे.  ग. दि. माडगूळकर म्हणत, ''मधाचं पोळं जसं थबथबलेलं असतं तसा हा माणूस रसिकतेनं थबथबलेला आहे.''  म्हणून रणजित देसाई, ना. धों. महानोर, सरोजिनी बाबर, मधुकर भावे, भा. कृ. केळकर, भा. खं. मंगुडकर, बाळ कोल्हटकर यासारखे विविध क्षेत्रांत लेखणीचा संचार करणारी माणसे यशवंतरावांबद्दल आदरभावाने बोलतात.  त्यांचे थोरपण मान्य करतात.  असा हा रसिक सौजन्यशील साहित्यप्रेमी स्वतःही एक अव्वल दर्जाचा साहित्यिक होता हे 'कृष्णाकाठ'ने दाखवून दिलेच आहे.  म्हणून नेतृत्वाला जनसामान्याचा आधार देणारे, कणखरपणाला विवेक व व्यवहार यांची जोड देणारे, बाँबे हॉस्पिटलमध्ये स. का. पाटीलसारख्या राजकीय विरोधकास विकलांग पाहून हुंदका देणारे, नोकरांचीसुद्धा आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे, राजकीय शत्रूशी सुद्धा स्नेह व जवळीक बाळगणारे, निर्भय पत्रकारांना अभयदान देणारे, सर्वच बाबतीत विशाल दृष्टिकोण ठेवणारे यशवंतराव लोकोत्तर लोकाग्रणी होते म्हणूनच महाराष्ट्राचे, देशाचे भूषण होते.

आणि हे त्यांचे दर्शनही तसे अपुरेच घडले आहे.  यशवंतराव चव्हाण या प्रचंड हिमनगाच्या मोठेपणाचा वरवरचा एक अष्टमांश भाग या लेखातून कदाचित दिसू शकला असेल.  त्यांच्या थोरवीचा सात अष्टमांश भाग गतेतिहासाच्या पाण्याखाली आहेच.