१५ यशवंतराव चव्हाण : एक ललित लेणे
प्रा. भु. दि. वाडीकर
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून पुढे आलेले आणि सत्तेच्या राजकारणात आयुष्यभर राहूनही आदरणीय राजकारणी म्हणून देशभर प्रतिष्ठा मिळालेले पहिले नेते पं. जवाहरलाल नेहरू आणि शेवटचे नेते यशवंतराव चव्हाण हे होत. यशवंतराव चव्हाणांचे गेल्या तीस-चाळीस वर्षांचे जीवन म्हणजे एका ठाम, प्रगत, वैचारिक आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या स्वरूपात विकास पावलेले व स्वतःच्या अभिजात वैशिष्ट्याने नटलेले एक तत्त्वज्ञान आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही स्वकर्तृत्वाने मनुष्य किती मोठा होऊ शकतो, हे भारतीय लोकशाहीत यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना दाखवून दिले आहे. आजपर्यंतच्या राजकारणात बहुतेक मोठमोठे पुढारी श्रीमंत दिसतात. सामान्य परिस्थितीतून वर आलेले आणि आपल्या कर्तबगारीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय पुढा-यांच्या दर्जापर्यंत पोचलेले आणि संघटना व प्रशासन या दोन्ही जबाबदा-या एकाच वेळी यशस्वीपणे पेलू शकरणारे भारतातील हे पहिलेच नेतृत्व होते.
यशवंतरावांच्या जीवनाकडे माणसे अनेक दृष्टींनी पाहू शकतात. पुत्र यशवंतराव, मित्र यशवंतराव, नेता यशवंतराव, वक्ता यशवंतराव, लेखक यशवंतराव, रसिक यशवंतराव, गृहस्थ यशवंतराव, विचारवंत यशवंतराव अशा अनेक नात्यांनी त्यांच्या जीवनाकडे पाहता येते. या प्रत्येकातील त्यांचे कर्तृत्व असे आहे की, त्या त्या क्षेत्रातील मोठेपणा त्यांच्याकडे आपोआप चालून यावे इतके यशवंतरावांचे जीवन मोठे होते. ''मी यशवंतराव चव्हाण होणार,'' असे त्यांनी त्यांच्या शेणोलीकर मास्तरांना दिलेले इंग्रजी चौथ्या इयत्तेतील उत्तर स्वतःच्या कर्तबगारीने त्यांनी अक्षरशः खरे करून दाखविले. प्रत्येक क्षेत्रातील त्यांची कामगिरी कशी शिगोशीग भरलेली आहे आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना मोहविणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे ठरले.
यशवंतरावांचे हे नेतृत्व कुठलीही परंपरा नसलेले, स्वयंभू, स्वकष्टार्जित नेतृत्व होते, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारणार नाही. जातीची, घराण्याची, परंपरेची पुण्याई गाठीशी घेऊन समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेला माणूस सापडू शकेल, परंतु केवळ नशिबावर हवाला न ठेवता ईर्षेने, चिवटपणे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून, स्वतःच्या दारिद्रयाची तमा न बाळगता व बहुजन समाजात आपण जन्मलो याचा अभिमान बाळगत, प्राप्त परिस्थितीला टक्कर देत देत, प्रतिष्ठित झालेलं व्यक्तिमत्त्व शोधायचा प्रयत्न केला तर तसं नेतृत्व फक्त यशवंतरावांच्या रूपानेच आपल्याला पाहायला मिळू शकेल. मराठी माणसाच्या मनात यशवंतरावांनी हे जे स्थान मिळविले होते त्यामागे त्यांचे स्वतःचे कर्तृत्व, अभ्यास आणि निष्कलंक जीवन-प्रवास यांची तपश्चर्या होती.
महाराष्ट्राने देशाला एकापेक्षा एक थोर नेते उपलब्ध करून दिले. दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, लो. टिळक, म. ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांपैकी अग्रगण्य, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता या सर्व आदरणीयांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतले स्थान दुस-या महायुद्धापूर्वीचे. दुस-या महायुद्धानंतर महाराष्ट्राची संपूर्ण देशात जी प्रतिमा उमटली तीत मात्र अग्रेसर म्हणून यशवंतरावांचेच नाव मुद्दाम घ्यावे लागेल. अर्थात वस्तुस्थिती म्हणून हे कबूल करायला हरकत नाही की, महाराष्ट्राच्या राजकारणातील यशवंतरावांचा उदय हा प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळातील आहे. पण त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत त्यांच्याइतका धूर्त मुत्सद्दी, विद्वान व यशस्वी राजकारणी म्हणून अन्य कुणाचाही उल्लेख करता येणार नाही. श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे हे सगळे त्यांना याने वडील, पण या त्यांच्या वडिलकीचा वसा जपत, त्यांचे प्रेमसंबंध कायम टिकवत, त्यांचे श्रेष्ठत्व न विसरता मराठी मनावर आपला पगडा बसवण्याचा पुरुषार्थ फक्त यशवंतरावच करू शकले, आणि त्यामुळेच यशवंतराव चव्हाण आकस्मिकरीत्या गेले तेव्हा आपल्याच घरातले एक वडिलधारी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले याची काळीज भेदणारी जाणीव महाराष्ट्राच्या घराघरातून व्यक्त झाली होती. यशवंतरावांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाच्या यशाची ती पावतीच म्हणावी लागेल. कारण ज्याच्या मृत्यूची खंत वाटावी आणि ह्या माणसाचे मरण लांबणे आवश्यक होते असे वाटावे असे ईश्वरी वरदान लाभलेले यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अजून काही दिवस मराठी माणूस अपेक्षित होता.