यशवंतरावजींना ज्याला 'थ्री लँग्वेज फार्मुला' म्हणतात तो मान्य होता. मातृभाषा, तिच्या जोडीला राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि हिंदीच्या जोडीला काही काळ तरी 'लिंक लँग्वेज' म्हणून इंग्रजी अशा तीन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रादेशिक भाषांचा स्वीकार करण्यास काही कालावधी लागेल; पण शेवटी ते मातृभाषेतूनच दिले पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे यशवंतरावजींचे स्पष्ट मत होते. वस्तुतः त्या दिशेनेच आपली वाटचाल होत आलेली आहे. मात्र म्हणावी तेवढी प्रगती झालेली नाही. पण दिशा बरोबर आहे. कोठारी आयोगाने (१९६४-६६) देखील उच्च शिक्षणाचे माध्यम प्रादेशिक भाषाच असावे अशी शिफारस केली होती. ती स्वीकारली गेली आहे. लोकभाषा ही ज्ञानभाषा असलीच पाहिजे अशी यशवंतरावजींनी आग्रही भूमिका घेतली होती. या संदर्भातही त्यांनी 'च'चीच भाषा वापरली, असे म्हणावे लागेल. ते म्हणतात, ''उच्च शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे याला एक दुसरेही कारण आहे. ते काहीसे ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. क्रांती होऊन, सामाजिक उलथापालथ करून एक प्रकारचे नवीन तर्हेचे जीवन बनले असे फारसे हिंदुस्थानात कधी घडलेले नाही. याचे खरे कारण असे आहे की, सामान्य माणसांपर्यंत महत्त्वाचा विचार किंवा ज्ञान आम्ही कधी जाऊच दिले नाही, ही माझी मुख्य तक्रार आहे. हा मुद्दा थोडक्यात सांगावयाचा झाला तर मी असे म्हणेन की, ज्ञान, भाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. ॠषिमुनींची आणि पंडितांची ज्ञानभाषा होती संस्कृत. कारण ती देवभाषा होती आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत. हे फार पूर्वी. पण नंतरही तेच झाले. मुसलमानी अमलात ज्ञानभाषा उर्दू, फारशी, अरबी जी काही असेल ती झाली. त्यानंतर इंग्रज आले आणि या देशातील ज्ञानभाषा इंग्रजी बनली. लोकभाषा अशा त-हेने दुर्लक्षित राहिल्यावर लोक शहाणे होणार तरी कसे ? आता स्वातंत्र्यानंतर जेव्हा जनजीवन आम्हाला विकसित करावयाचे आहे असे आम्ही म्हणतो, तेव्हाही लोकभाषा ज्ञानभाषा होणार नसेल तर ज्ञानभाषा हा ज्यांचा मक्ता होता त्यानेच संस्कार आणि त्यांचेच साम्राज्य सांस्कृतिक जीवनामध्ये निर्माण होईल ते होऊ देता कामा नये असे माझे स्वतःचे खंबीर मत आहे.''२८
यशवंतरावजींनी शैक्षणिक प्रश्नांवर मांडलेले विचार एकत्रित केले तर त्यांना एक प्रकारच्या 'शैक्षणिक जाहीरनाम्या'चे (Educational Manifesto) स्वरूप प्राप्त होऊ शकेल, आणि त्यात लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे हा मुद्दा अतिशय मूलगामी स्वरूपाचा ठरेल. लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली की लगेच शैक्षणिक क्रांती घडेल अशी भाबडी समजूत करून घेण्याचे कारण नाही. सामाजिक रचनेला हात घातल्याशिवाय ते शक्य नाही. समाजामध्ये जे जे घडत असते ते ते सामाजिक रचनेच्या केंद्राभोवती फिरत असते. या देशातील सांस्कृतिक घडामोडी आजपर्यंत जुनाट आणि कालबाह्या अशा सामाजिक रचनेच्या केंद्राभोवतीच फिरत आलेल्या आहेत. तेव्हा केंद्रच बदलावे लागेल. ते बदलायचे असेल तर लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जावे लागेल. हे काम लोकभाषांच्या माध्यमातून होऊ शकते. लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली तर आपल्याला अभिप्रेत असलेल्या सामाजिक क्रांतीच्या प्रक्रियेत ती एक महत्त्वाचा घटक ठरेल यात शंका नाही. लोकभाषेच्या संदर्भात मांडलेला त्यांचा हा विचार आपल्या ऐतिहासिक परिस्थितीच्या मर्मावरच बोट ठेवतो यात शंका नाही. शिक्षण हे संस्कृतीचे प्रवेशद्वार (Gateway of Civilisation) असते. ते समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व राष्ट्रांच्या समग्र सांस्कृतिक परिवर्तनाचे माध्यम बनले पाहिजे, असे यशवंतरावांना वाटत होते. ऐतिहासिक परंपरेने आणि परिस्थितीने आपल्यावर लादलेली ही वेठबिगार फेकून दिल्याशिवाय या देशात सांस्कृतिक परिवर्तन घडणार नाही असेच ते सूचित करतात.
उच्च शिक्षण हे संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे यात शंका नाही. पण या प्रवेशद्वाराची किल्ली मात्र आता विज्ञानाच्या हातात गेली आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. यशवंतरावांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणले होते. विकास आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक म्हणून विज्ञानाकडे आपण पाहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते, आणि म्हणून निरनिराळ्या शास्त्रांचे ज्ञान मराठीत आले पाहिजे आणि मराठी भाषेचा उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे, या गोष्टींवर त्यांचा भर होता. मराठी भाषेच्या विकासावर त्यांनी खूप भर दिला होता. तिचा विकास करायचा असेल तर तिच्यात नवनवीन विचार आणावे लागतील, तिच्यातूनच 'विचार' करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते म्हणतात : ''खरे म्हणजे भाषा ही विचाराच्या पाठीमागे येत असते. भाषेचे खरे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे. संशोधनाच्या क्षेत्रात नवे विचार आणण्याचा प्रयत्न करणारी माणसे जसजशी निर्माण होतील, वाढतील, तसतशी भाषा वाढत जाईल. नवे अनुभव आले, भाषा वाढली. नवे काम वाढले, भाषा वाढली. पहिल्याने मोटारीची कल्पना आली आणि त्या मोटारीबरोबर किती तरी नवे शब्द आले. एक नवी परिभाषा आली. साखर कारखान्यांबरोबर किती तरी नव्या कल्पना आल्या. नवीन जीवन आले. नवा विचार आला की भाषा नवे रंगरूप घेऊन आपल्यापाशी येते आणि तो विचार व्यक्त करण्याच्या प्रयत्नात ती स्वतःच संपन्न होऊन जाते. भाषेचे स्वरूप हे असे आहे. तेव्हा भाषा ही सतत वाढत राहील, याबद्दल शंका नको.''२९ यशवंतरावजींनी भाषाविकासाचे रहस्य किंवा सूत्रच आपल्याला सांगितलेले आहे. सर्वांगीण विकासाच्या कार्यातून भाषा विकसित होते आणि भाषेच्या विकासातून सांस्कृतिक संपन्नता वाढते, आणि या सर्व गोष्टींचे संक्रमण आणि संवर्धन उच्च शिक्षणातून व्हायला हवे.
---------------------------------------------------------------
२८. 'लोकभाषा हीच ज्ञानभाषा', युगांतर, पृ. १७२-७३.
२९. कित्ता, पृ. १७४.
---------------------------------------------------