• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ५५

इंडिकेट व सिंडिकेटच्या वेळी म्हणजे रेड्डी, गिरी यांच्या निवडणुकीच्या वेळी मी त्यांच्यावर 'कुंपणावरचे शहाणे पायउतार झाले' हा अग्रलेख लिहिला होता व नंतर अलीकडे म्हणजे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव होऊन त्या परत सत्तेवर आल्या तेव्हा 'खरारा करणारे, अश्वमेधाचा घोडा काय अडविणार ?' असाही एक अग्रलेख प्रकाशित केला होता.  त्यातील टीकेचा रोख आठवून यशवंतरावांनी प्रांजळपणे सांगून टाकले की, तुम्हा मंडळींना काय कुस्त्या मारणारा व जिंकणाराच पहिलवान हवा असतो.  परंतु प्रत्येक खेळात हारजीत असतेच व प्रत्येक पहिलवानावर कधी ना कधी कुस्तीचा फड सोडण्याची पाळी येतच असते.  मी काय ते समजलो.  मग खूप प्रश्नोत्तरे झाली.  पक्षांतराविषयी यशवंतराव अलीकडे प्रांजलपणे सांगून टाकीत असत की, त्यांची चूक झाली.  इंदिरा गांधीच बरोबर होत्या.  फारसा वादविवाद त्यांना मंजूर नव्हता.  असे असले की, यशवंतराव समोर जे कोणी असेल त्याला बेमालूम विषयांतर करायला लावीत.  यशवंतरावांच्या वार्तापरिषदाही अत्यंत चांगल्या व संस्मरणीय असत.  

पंडित नेहरूंना रागात आणले की, त्यांची उत्तरे अत्यंत गाजत असत.  मोरारजी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी त्यांनाच प्रतिप्रश्न करीत.  आचार्य विनोबा वार्तापरिषदांच्या भानगडीत क्वचितच पडत, परंतु जे थोडे प्रसंग त्यांच्यावर आले त्यावरून त्यांची ही लकब लक्षात आली की, ते वार्ताहरांच्या प्रश्नामध्येच चुका दाखवीत व मग उत्तरे देत.  यशवंतरावांची पद्धत निराळी.  ते प्रश्न करणा-याच्या प्रश्नाचीच प्रथम स्तुती करीत.  विचारणारालाच आपला गौरव होतो आहे असे एकसारखे वाटत असे.  अशी मानसिक अवस्था निर्माण करून मग यशवंतराव उत्तराची रचना अशी करीत की, हाती काहीच लागू नये.  ही लबाडी लक्षात येण्याइतका प्रश्नकर्ता तल्लख असला की, मग प्रश्नोत्तरे बाजूला राहून हास्याचे धबधबे कोसळत.  मात्र एवढे तरी की, यशवंतरावांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी नेहमीच अशी तरबेज राहात आली की, समोरच्यांना त्यांच्याशी व त्यांना समोरच्यांशी झट्या घेण्यावाचून आणि दोन हात केल्यावाचून राहताच येऊ नये.  पुष्कळदा तर तेच डिवचीत आणि मग कोंडीत गाठून गडी आऊट करीत.  म्हणूनच यशवंतरावांचा सहवास सत्ताधारी असूनही सदैव हवाहवासा वाटत असे.  काही तरी हमखास मिळेल असे हे महाराष्ट्रातील सत्ताधा-यांपैकी एकमेव स्थळ होते.  बाकी सगळे ऐसपैस परंतु निखळ सर्वे नंबर होते.  भूमिका असलेली भूमी ही एवढीच.  

यशवंतराव हे महाराष्ट्राच्या बहुजन समाजापैकी कदाचित पहिले आणि शेवटचे नेते होते, की ज्यांनी करावयाचे ते सर्व डावपेच करून आणि राजकारण खेळून महाराष्ट्रात जातिधर्मनिरपेक्षपणे चांगल्या तीन पिढ्या घडविल्या.  त्यांनी हे ओळखले होते की, राजकारणाचा प्रवाह शहरी, मध्यवर्गीय व वरिष्ठ जातीय वर्गामध्ये कुंठित होऊन पडला होता तो खेड्यापाड्यांपर्यंत मोकळा करून दिला पाहिजे आणि राजकारणाला फुले आणि शाहू महाराज यांच्यानंतर व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बहुजन समाजाचे भक्कम अधिष्ठान मिळवून दिले पाहिजे, हे मोलाचे कार्य त्यांनी केले.  त्यासाठी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून कृषि-औद्योगिक क्षेत्र तयार केले व त्याला सहकाराची जोड दिली.  यशवंतरावांच्या पारदर्शी राजकीय दृष्टीचा हा सबळ पुरावा होय.  सहकाराच्या बरोबरच त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण घडवून आणून पंचायत समित्या व जिल्हा परिषदा निर्माण केल्या.  खेड्यापाड्यांतून बहुजन समाजातील नेतृत्व तयार होण्यासाठी व त्यात सातत्य राहण्यासाठी या विकेंद्रीकरणाचा फार उपयोग झाला.  यशवंतरावांचे हे ॠण विसरण्याइतका महाराष्ट्र कृतघ्न ठरणार नाही, अशी अपेक्षा आहे.

राजकारणाच्या मध्य धारेत असूनही यशवंतराव कधी एकारले नाहीत.  जीवनाच्या विविध क्षेत्रांचे मोल त्यांना माहीत होते.  आधुनिक काळातील शासनसंस्था केवळ सरकारपुरतीच म-यादित नसते तर ती संपूर्ण जीवन व्यापण्याची आकांक्षा व शक्ती बाळगून असत.  म्हणून राज्यकर्ता जीवनाच्या अनेक अंगोपांगांविषयी जागृत असावा लागतो.  यशवंतराव स्वतः चांगले व्यासंगी होते.  त्यांचे नित्य वाचन कधी खंडले नाही.  साहित्य, शास्त्र, काव्य, नृत्य, संगीत, शिल्प संशोधन, इतिहास अशा अनेक क्षेत्रांचे ते साक्षेपी अभ्यासक होते.  प्रत्येक क्षेत्र आणि त्यातील तज्ज्ञ यांच्या स्वायत्ततेविषयी त्यांना डोळस आदर होता.  औरंगाबादचाच एक प्रसंग आठवतो.  मला वाटते, संगीत संमेलनाचे का अशाच कसल्या ललित कलेच्या एका कार्यक्रमांचे त्यांच्या हातून उद्धाटन ठरले होते.  यशवंतराव आले आणि त्यांनी आपल्या भगतगणांनाच त्या दिवशी यथेच्छ फटकारले.  ते म्हणाले की, अशा कलेच्या क्षेत्रात राज्यकर्त्यांची जागा येथे व्यासपीठावर अगर रंगमंचावर नसून श्रोत्यांत कुठेतरी मागच्या बाजूला आहे.  रसिक श्रोता अगर प्रेक्षक म्हणून त्याने पुढचे स्थान जरूर मिळवावे.  परंतु हे स्थान प्रेक्षकातले व श्रोत्यातलेच असेल हे लक्षात ठेवावे.  त्यांनी ललित क्षेत्रात काम करणारांकडूनही अशी अपेक्षा व्यक्त केली की, आपला मान आपण राखला पाहिजे.  स्वायत्तता आणि स्वातंत्र्य या कल्पना विकसित संस्कृतीच्या द्योतक आहेत.  सुसंस्कृत आणि स्वतंत्र मनच स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकते.  सत्तेचा तिरस्कार नको, परंतु सत्तेपुढे सदैव लांगूलचालनही नको.  यशवंतरावांचे हे उद्गार कायमचेच लक्षात राहून गेले.  अशी जाण असलेल्या व सर्व थरांतून प्रामाणिक पाठिंबा असणारा मराठी नेता यशवंतरावांच्या नंतर अजून तरी बघावयास मिळाला नाही.  असा हा मोठा नेता इंदिरा गांधींच्या राजकारणाने वाळीत टाकला आणि विकलांग बनविला तेव्हा यशवंतरावांच्या सर्वच चाहत्यांना वाईट वाटले.  यशवंतराव तेव्हाच थकले होते व म्हणूनच त्यांनी कबुलीची जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारली होती.  शेक्सपीयरने ज्युलियस सीझरची शोकांतिका चितारताना त्याचे पतनही फार मोठे दाखवले.  जगातील सर्व मोठ्या माणसांचे दैव असेच राहात आले आहे.  यशवंतरावांच्या मृत्यूने एक कायमची खंत निर्माण केली तिचे कारण या नेत्याचे मोठेपण हेच.