• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- २३ प्रकरण ६

६ आधुनिक महाराष्ट्राचा युगपुरुष

पद्मश्री शामराव कदम

महाराष्ट्राने देशाला जी बलदंड कर्तृत्वाची माणसं दिली त्यांत यशवंतराव चव्हाणांचे स्थान अग्रगण्य आहे.  स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अलौकिकत्व लाभलेले जे राष्ट्रीय नेते सर्वमान्य ठरले त्यांतही यशवंतराव यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.  सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळींचा स्वराज्य-मागणीसाठी एकत्रित विचार करणारे जितके नेते महाराष्ट्रात झाले तितके देशाच्या अन्य प्रांतात झालेले नाहीत ही अनेक विचारवंतांनी मान्य केलेली वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे व मुंबईचे योगदान सर्वश्रेष्ठ मानले गेले आले.  लो. टिळकांच्यासारखा लोकोत्तर नेता, म. गांधींनी ज्यांना गुरुस्थानी मानले ते गोपाळ कृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राने देशाला दिलेली काही अलौकिक माणसे.  त्याचबरोबर निरनिराळ्या क्षेत्रात कीर्तिवंत ठरलेले अनेकजण महाराष्ट्रातच घडले आणि वाढले.  मुंबई हे तर अनेकांचे कार्यक्षेत्र राहिले.  अशा अनेक द्रष्ट्या आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या कार्याने पुनित झालेल्या या मंगलभूमीत समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा एक धुरंधर द्रष्टा राजकारणी म्हणून यशवंतराव चव्हाणांनी मिळविलेले महत्त्वपूर्ण स्थान कुणीही नाकबूल करणार नाही.  स्वातंत्र्यपूर्वकाळात म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोडले तर ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून यशवंतरावांच्याच नेतृत्वाचा उल्लेख करावा लागेल.  अर्थात केशवराव जेधे, शंकरराव मोरे, बापूसाहेब लाड, नाना पाटील इ. नेत्यांचा उल्लेख करणे या ठिकाणी आवश्यक असले तरी देशभर कीर्तिवंत ठरलेला सर्वमान्य नेता फक्त यशवंतरावांच्याच रूपाने अवतीर्ण झाला ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल.

तशी यशवंतरावांची कौटुंबिक परिस्थिती राजकारणास पूरक नव्हती.  त्यांचे बालपण व शालेय शिक्षण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे आयुष्य एकाअर्थी दारिद्य्रातच गेले.  'कृष्णाकाठ'मधील त्यांच्या आठवणी वाचल्या तर किती विषम आणि प्रतिकूल परिस्थितीस त्यांना तोंड द्यावे लागले याची कल्पना येते.  आईच्या संस्काराने सुसंस्कारित झालेले मन घेऊन यशवंतराव खेड्यापाड्यातील शतकानुशतके खुरटलेल्या ग्रामीण जीवनाचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहात होते.  प्रत्यक्ष तशाच परिस्थितीत राहून आपल्या शिक्षणाची आवड अत्यंत कठीण परिस्थितीस तोंड देत पूर्ण करून घेत होते.  हा विद्यार्थिदशेतील संघर्षाचा काळ यशवंतरावांना अनेक गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी ठरला.  ग्रामीण भागातील जनतेच्या दुःखावर पुंफ्कर घालण्यासाठी या तप्त अनुभवाचे भांडवल त्यांना उपकारक ठरले.  आपल्या दैन्याचा व दुःखाचा प्रत्यक्ष साक्षीदार व भागीदार असलेला माणूस महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेने प्रेमादराने आणि कौतुकाने आपला नेता म्हणून स्वीकारला.  कारण महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्वंकष नेतृत्व देण्याचे सामर्थ्य फक्त त्यांच्यातच दिसले.  महात्मा जोतिराव फुले यांनी अनेक सामाजिक प्रश्न घेतले, ग्रामीण भागातील जनतेच्या दैन्याची मीमांसा केली, त्यावर उपायही सुचविले, परंतु समाजाचे राजकीय नेतृत्व त्यांना करता आले नाही आणि तो त्यांच्या जीवनधारणेचा भागही नव्हता.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जरी सामाजिक चळवळीचे प्रणेते होते त्यांचे नेतृत्व दलितांपुरतेच मर्यादित राहिले.  राजर्षी शाहू महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मर्यादित कार्यक्षेत्रात बहुजन समाजाचे नेतृत्व केले.  केशवराव जेथे, यशंकरराव मोरे, भाऊसाहेब हिरे, बापूसाहेब लाड इ. मंडळी बहुजन समाजाचे नेतृत्व करताना एका विशिष्ट चक्रातच अडकून पडली आणि म्हणून त्यांचेही नेतृत्व प. महाराष्ट्रातील काही विभागांच्या पलीकडे जाऊ शकले नाही.  यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास पाहता सर्व विभागाने स्वीकारलेले व बहुजन समाजाने आपल्या जीवनात मंगल क्षण निर्माण करू शकणारा एकमेव द्रष्टा ह्या दृष्टीने भौगोलिक विभागांच्या सर्व कक्षा ओलांडून निर्विवादपणे मान्य केलेले नेतृत्व होते.  म्हणून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, प. महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या सर्वच विभागांत त्यांचे नेतृत्व आदराने स्वीकारले गेले ही घटना आवर्जून उल्लेख करण्याजोगी आहे.  पंजाबराव देशमुखांसारख्या केंद्रीय मंत्रिपद भूषविणार्या व्यक्तीलाही विदर्भाव्यतिरिक्त आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आली नाही.  ही सर्वच माणसे आपापल्या क्षेत्रातही बलदंड माणसे होती, पण मराठी माणसाची नाडी ओळखता आलेला आणि खेड्यात व शहरी भागात सर्वदूर स्वतःचा प्रभाव निर्माण करू शकलेला यशवंतरावांच्याशिवाय दुसरा माणूसच सांगता येणार नाही.  देशाच्या पातळीवर तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरवाने उल्लेख केला गेला.  राज्याच्या आणि राष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर सारख्याच सामर्थ्याने तळपणारा एक समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अनेकावधानी नेता म्हणून त्यांचे स्थान वादातीत आहे.