• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- २०

राजकारणाचा प्रपंच करताना, दुसर्याचं अंतःकरण जाणावं लागतं.  वैयक्तिक प्रपंचाचं जे, तेच राजकारणाच्या प्रपंचाचं.  समय ओळखावा लागतो, अडचणीत न सापडण्याची खबरदारी घ्यावी लागते.  प्रसंगी नम्र व्हावं लागतं, लोकांची पारख करावी लागते.  दोष अवगुणांत दडवावे लागतात.  विरोधकांशी त्यांच्याच शस्त्रानं लढावं लागतं.  तसं करणं कित्येकदा अवश्यच असतं.  दूरदर्शीपणानं काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढं जावं लागतं.  यशवंतरावांनी हे सारं केलं.  देशाचं सुख समोर ठेवून यथामति, यथाशक्ति, असं आचरण करण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला.  हा कटाक्ष पाळून राजकारणात, कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन, उपदेश करण्याचं महत्त्वाचं कामही केलं.

हे सारं घडलं.  पण हे कसं आणि कशानं घडलं याच्या तपशिलात शिरलं की विचाराशी येऊन थांबावं लागतं.  विचारानं यशवंतरावांनी किंवा यशवंतरावांनी विचारांची अहर्निश सोबत केली.  त्यांचं कर्तृत्व उदयाला आलं, चमकलं आणि स्थिर बनलं हे त्याचंच फळ मानलं पाहिजे.  तरीपण विचार म्हणजे वाचनानं, अध्ययनानं मेंदूत साठवलेले विचार आणि त्यामुळे असं काही घडलं असं मानता येणार नाही.  तसं पाहिलं तर वाचनानं, अध्ययनानं विचारवंत बनलेले पुष्कळ असू शकतात.  परंतु कित्येकदा असंही आढळतं की, विशाल विचार मेंदूत जमा झालेले आहेत पण त्यांची हृदयाशी ताटातूट झालेली कायमच आहे.  वास्तवात ते विचार अवतरलेले नाहीत.  याचा अर्थ असा की, विशाल विचाराची स्वप्नं करावयाची तर त्यासाठी वेगळीच कला आत्मसात करावी लागते, लागत असावी.  यशवंतरावांनी ही कला चांगलीच आत्मसात केलेली असली पाहिजे.  

यशवंतरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जी स्वप्ने उरीपोटी बाळगली होती ती बहुतांशी साकार केलेली आढळतात.  म्हणजेच त्यांनी आपले विचार मेंदूत अडकवून ठेवलेले नव्हते.  ते रक्तात भिनवले.  देशाच्या स्वातंत्र्याचे आणि देशातील लोकांना सुखी करण्याचे विचार क्रांतिवीरांच्या सर्वांगात, रक्तात भिनल्यानेच ते आपले स्वप्न साकार करू शकले.  क्रांतिवीर असो वा यशवंतरावांसारखा शांतिवीर असो, त्याला विचार हा रक्तापर्यंत पोहोचवावाच लागतो.  तरच तो विचार त्याच्या जीवनाला ऊब आणतो.  यशवंतरावांनी विचारांचं बी रक्तात भिजत घातलं, रक्तमांसाच्या चिखलात रुतवलं, त्यामुळेच त्याला कोंब फुटले आणि कालांतराने डेरेदार बनलेल्या वृक्षानं फळ धरलं.  ज्यांच्या ज्यांच्या कर्तृत्वानं फळ धरलं त्यांच्याबद्दलची इतिहासाची अशीच साक्ष आहे.

देश स्वतंत्र व्हावा, देशातील सर्व लोकांना सुख लाभावे यासाठी काहीतरी करावे असे विचार यशवंतरावांच्या मेंदूत उद्भवले ते त्या काळातील वाचनामुळे.  श्रेष्ठ विचारवंत नेत्यांचे विचार ऐकल्यामुळे, त्यातूनच त्यांनी कामाचा वसा घेतला.  अनेकांशी बोलत राहिले.  चर्चा करीत राहिले.  स्वतः विचारही करू लागले.  त्या काळात विचार आणि विकार याचा झगडा मनात वाढत राहिला.  परंतु पुढे पुढे बोलून विचार करावा यापेक्षाही विचार करूनच बोलावे असा त्यांच्या मनाचा पिंड बनला.  मेंदूतील विचारांचा नकळत हृदयाशी मिलाफ होऊ लागला.  देशाच्या सुखाचा विचार रक्तातच सर्वत्र पसरण्याची प्रक्रिया यातून घडली असली पाहिजे.  विचार, उच्चार आणि आचार याची संगती हे त्या प्रक्रियेतून निर्माण झालेले यशवंतरावांचे सहज स्वरूप म्हणावे लागते.  अशा सहज स्वरूपातून नीतीची मूर्तीही मूर्त रूप धारण करू लागते.  

यशवंतरावांच्या संदर्भात नेता आणि नीती हे दोन शब्द समोर आले की विचारचक्राला वेगळीच गती मिळते.  नेतृत्वाचा अर्थ काय ?  खरा नेता कोण ?  लोकशाहीत नेत्याचे, नेतृत्वाचे स्थान आणि मान कोणते ?  असे अनेक प्रश्न समोर गर्दी करतात.  नेता, नेतृत्व हे शब्द अलीकडे बरेच घसरडे झाले आहेत.  खरं म्हणजे, लोकांना योग्य तर्हेनं, योग्य ठिकाणी नेतो तो नेता.  उदात्त उदाहरण घालून देणे, प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणे म्हणजे नेतृत्व करणे होय.  नेता हा सर्वांच्या पुढे, अग्रभागी असावा लागतो.  सर्वांच्या अगोदर त्याने तेथे पोहचावे लागते आणि शेवटपर्यंत त्याला थांबावे लागते.  नेता सर्वांच्या वर असतो तो श्रेणीने.  सर्वांच्यावर म्हणजे त्यांच्या डोक्यावर नव्हे.  तसा तो डोक्यावर राहील तर तो ज्यांचे नेतृत्व करतो, त्यांच्या आशा-आकांक्षा पायदळी तुडविल्या जाण्याची भीती असते आणि असे झाले म्हणजे ते नेतृत्व चेष्टेचा विषय बनते.  प्रसंगी संपुष्टात येते.  यशवंतरावांचे नेतृत्व प्रसंगोपात्त टीकेचा विषय बनले असेल पण ते कधी चेष्टेचा विषय झाले नाही.  याचं कारण त्यांनी नेतृत्वाची जागा लोकांच्या समोरची राखली.  डोक्यावरची नव्हे.  लोकांच्या समोर राहून त्यांच्या आशा-आकांषांचा आदर केला.  त्या अधिकात अधिक फलद्रूप होतील याचा अहर्निश ध्यास घेतला.

लोकशाहीत जो नेता लोकांशी संलग्न राहून लोकांचा आणि स्वतःचा आत्मविकास घडवितो त्यालाच लोक आराध्य दैवत मानतात.  लो. टिळक, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर, म. जोतिबा फुले हे या श्रेणीचे नेते झाले.  लोक हे त्यांनी आराध्य दैवत मानले आणि लोकही त्यांना अराध्य दैवत मानू लागले.  भारतीय लोक, लोकसंख्या आणि हे नेते यांच्यात खरेखुरे तादात्म्य नांदले.  यशवंतरावांच्या बाबतीत नेमकी हीच वस्तुस्थिती आढळते.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाशी, लोकांशी ते तादात्म्य पावले.  नंतरच्या काळात उभयपक्षी हे तादात्म्य एकरूप बनले.  कारण देश, देशातील लोक, लोकशाही यावरील त्यांची श्रद्धा इतकी दृढमूल झाली की व्यक्ती म्हणून त्यांच्यात वेगळेपणाची भावनाच उरली नाही.