• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- १६ प्रकरण ४

४. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

एस. एम. जोशी

संयुक्त महाराष्ट्राचे घटक राज्य स्थापन झाल्याला आता पंचवीस वर्षे झाली.  हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.  मी संयुक्त महाराष्ट्र समितीचा सरचिटणीस होतो.  त्यामुळे अनेक वर्तमानपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या प्रतिनिधींनी माझ्या मुलाखती घेतल्या.  त्यांपैकी बर्याच प्रतिनिधींनी मला एक खास प्रश्न विचारला; हे सारे महाभारत होऊन गेले.  संयुक्त महाराष्ट्र झाला.  महागुजरातही झाला.  मागे वळून पाहता तुम्हाला या लढ्यात भाग घेतल्याबद्दल पश्चात्ताप होत नाही काय ?

त्यांच्या प्रश्नाचा रोख सध्या जी मराठी व मराठीतर अशी संकुचित भावना वाढत आहे तो असावा किंवा महाराष्ट्रामध्ये विशिष्ट जातीच्या हाती सत्ता एकवटू पाहते आहे, त्याला अनुलक्षून असावा.  मी मात्र ठणकावून सांगत असे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी जे प्रयत्न केले त्याबद्दल जागतेपणीच काय पण स्वप्नातदेखील मला पश्चात्ताप झालेला नाही.

स्वर्गीय यशवंतरावा चव्हाण यांच्या निधनामुळे मला दुःख झाले.  कारण आता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे सुरू झालेली समाजपरिवर्तनाची प्रक्रिया अशीच पुढे चालू ठेवण्याचे काम करू शकेल असा एक समर्थ नेता आम्ही हरवून बसलो आहो.  समितीने एक ऐतिहासिक कार्य केले, यात वाद नाही.  महाराष्ट्रातील सर्व जाति-जमातींच्या लोकांना एका झेंड्याखाली आणून सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला चालना दिली.  एक अनुकूल वातावरण निर्माण केले.  यापुढील कार्य करण्याची जबाबदारी यशवंतरावांवर येऊन पडली.  त्यासाठी लागणारी योग्यता आणि गुण त्यांच्या ठिकाणी होते असे माझे मत आहे.  जातीय भावनेपासून पूर्णतया मुक्त असा पुढारी आज तरी मिळणे कठीण आहे.  पण सर्व जातिजमातींना बरोबर घेऊन वाटचाल करणारा आणि जातिद्वेष वाढू नये अशी खबरदारी घेणारा नेता महाराष्ट्राला हवा आहे.  यशवंतरावांचा तसा प्रयत्न होता.  त्यांनाच ते शक्य होते.

संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांना स्व. माडखोलकर यांनी सरळच प्रश्न केला की, हे राज्य मराठ्यांचे होणार काय ?  तेव्हा यशवंतरावांनी देखील तितक्याच मोकळेपणाने सांगितले की हे राज्य मराठ्यांचे नाही तर मराठी जनतेचे होणार आहे.  महात्मा फुल्यांच्यापासून केशवराव जेधे यांच्यापर्यंत महाराष्ट्रात जी चळवळ झाली तिचा आशय प्रामुख्याने समाजपरिवर्तनाचा होता.  सामाजिक समतेच्या ध्येयाकडे नेणारे ते आंदोलन होते.  सन १९२० च्या आसपास तिला ब्राह्मणेतरांची ब्राह्मणविरोधी चळवळ असे स्वरूप आले होते.  पण मूलतः अन्यायाविरुद्ध ती चळवळ होती.  स्वर्गीय केशवराव जेधे यांना पहिली कारावासाची शिक्षा झाली ती त्या चळवळीतच झाली होती.  याची पुरेशी जाणीव आजच्या तरुण पिढीला दिसत नाही.  यशवंतरावांना ती सारी परिस्थिती अवगत होती.  काही वर्षांखाली केशवराव जेध्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये एक सभा आयोजित केली होती.  त्या सभेचे अध्यक्ष यशवंतराव आणि मी प्रमुख वक्ता होतो.  मी माझ्या भाषणामध्ये केशवरावांच्या पहिल्या तुरुंगवासाचा उल्लेख केला.  त्यांची चळवळ प्रामुख्याने सामाजिक समतेसाठी होती.  म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील शोषित आणि पीडित जनतेचा पाठिंबा होता.  बहुजन समाजाचे पुढारीपण लाभले होते.  केशवरावांचे एक चरित्र अजून प्रसिद्ध झालेले नाही याबद्दल मी माझी खंत व्यक्त केली.

यशवंतरावांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माझ्या सूचनेचा उल्लेख केला आणि त्याला आपला पाठिंबा दिला.  महात्मा फुले आणि केशवराव जेधे यांनी पुढाकार घेऊन चालविलेले समाजपरिवर्तनाचे कार्य चालू राहिले पाहिजे असे आवर्जून सांगितले.  सुदैवाने त्यानंतर डॉ. य. दि. फडके यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले केशवरावांचे चरित्र प्रसिद्ध झाले.  बहुजन समाजाचे दुःख, दैन्य आणि दारिद्र्य दूर केले पाहिजे, याची जाणीव यशवंतरावांना होती.  म्हणूनच ''समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्राचे स्वप्न'' ते पाहू शकत होते.  त्यासाठी लागणारा विशाल दृष्टिकोण आणि औदार्य यशवंतरावांच्या ठिकाणी होते, असे माझा अनुभव मला सांगतो.