• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- १२

यशवंतराव त्या वेळी बीड जिल्ह्यात केजजवळ दौर्याच्या प्रवासात होते.  त्या वेळी तर ते फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच होते.  त्यांच्या गाड्यांचा तांडा नेहमीप्रमाणे अंतर ठेवून चालला होता.  एका निरुंद पुलाजवळ एका जाम म्हातारी बाई शेजारी बहुधा नातवंडांना घेऊन निर्धारानं उभी होती.  ती मंत्र्यांच्या गाड्यांना धीरानं पुढं होत थांबण्याची इशारत करीत होती.  एस्कॉर्टच्या एक दोन गाड्या तिला न जुमानता पुढं गेल्या.  यशवंतरावांनी ती म्हातारी आपल्यासाठीच थांबली असावी हे अचूक हेरून गाडी थांबवायला सांगितले.  ते गाडीतून बाहेर उतरणार नव्हते.  श्रीपादराव डोंगरे या आपल्या सचिवांना म्हणाले, ''श्रीपादराव, त्या बाईचं म्हणणं काय आहे बघा बघू.''  सचिवांनी उतरून तिच्याजवळ जात तशी चौकशी केली.  म्हातारीचे केस काही केवळ उन्हाच्या धगीनं पांढरे झाले नव्हते.  ती ठणकावत बोलली, ''तुम्हापैकी यशवंतराव म्हन्तेला कोन ?  त्येला म्होरं घ्या.''  श्रीपादराव फार समजदार सचिव होते.  त्यांनी साहेबांना बाईचा निरोप आपल्या कार्यालयीन अदबीनं सुधारून सांगितला.  ''बाई आपणालाच भेटायचं म्हणतात साहेब !''

यशवंतराव उतरले.  बाईसमोर जाऊन दोन्ही हात जोडून-वाकून अत्यंत नम्रपणे म्हणाले, ''मीच यशवंतराव आई...., बोला काय गान्हाणं आहे ?''  महाराष्ट्राचा सामान्यातून सरसावत मुख्यमंत्री झालेला राजा कमालीच्या आस्थापूर्ण आदबीनं म्हणाला.

कानशिलाकडनं डोळ्यांच्या सुरकुत्यांचं थकलेलं जाळं आक्रसत त्या अनाम कुणबाऊ म्हातारीनं महाराष्ट्राचं समोर उभं ठाकलेलं 'बलवंत' 'यश' डोळाभर निरखलं.  मग म्हातारी रांगड्या मराठवाडी बोलीत ठणकारली, ''गार्हानं न्हाई ल्येकरा माजं काई !  ह्यो तुझ्या ल्येकराबाळास्नी खाऊ द्यायसाटनं उबी हाय कवा धरनं !''

- आणि म्हातारीनं कमरेजवळ खोचलेली कापडी पिशवी बाहेर खेचून - तिच्यातून बंदा रुपाया काढला आणि तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हातावर ठेवून त्याची अलाबिला घेत त्या रस्त्यावर आपल्या कानशिलाजवळ आपली निरागस, निरामय बोटं कटाकट मोडली !!

यशवंतरावांसह सगळ्यांच्या अंगावर काटाच सरकविला असेल त्या बंदा रुपयानं.  त्यांनी वाकून रस्त्यावरच म्हातारीला नमस्कार केला, आणि काहीच न बोलता ते गाडीत येऊन बसले.  कितीतरी आत्ममग्न होत आपल्याच विचारात गढलेले.

यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एका अनाम वृद्धेकडून आपणाला नसलेल्या लेकराबाळांच्या खाऊसाठी संतांच्या भूमीवर तो रुपया स्वीकारला होता !

भावप्रधान यशवंतरावांचं उभं जीवन अशा कितीतरी रसवाळ्या व जिवंत अशा मराठमोळ्या रांगडेपणानं शिगोशीग भरलेलं होतं.  त्यांचे अभ्यासपूर्ण तरी सहजपणे अवतरलेलं व्याख्यान ऐकणं हा स्मरणीय अनुभव असे.  त्यांच्या स्वभावाला धरूनच त्यांचे वागणे व बोलणे होते.  तशी खरेतर मराठी भाषा तिच्या भुप्रदेश व माणसांप्रमाणे रांगडी आहे.  फव्वारती आहे.  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार विषयावर बोलताना तर ती पट्टीच्या वक्त्यालाही केव्हा रूक्षतेकडं घेऊन जाईल याचा नेम नाही.  पण यशवंतरावांचं कुठल्याही व्यासपीठावरचं व्याख्यान कधीच रूक्ष व सत्त्वहीन झालं नाही.  वेळेचं अचूक अवधान हे त्यामागचं एक सुप्त असं त्यांचं म्हणून सूत्रबुद्ध शास्त्र होतं.  राजकीय व सामाजिक व्यासपीठापेक्षा ते साहित्यिक व्यासपीठावर अधिक रंगून जायचे.  अधिक खोलीनं व खेळीमेळीत प्रकट व्हायचे.

त्यांची साहित्यिक व्यासपीठावरची अनेक व्याख्यानं गाजली.  त्यांचं नकळतच आतलं असं सूत्र असे.  ते नव्या, तरुण व साहित्यवकूब असलेल्या प्रतिभावंतांना दिलखुलास व मन भरून निकोप असं प्रोत्साहन देत.  अनेकदा म्हणूनच मी म्हणतो की राजकारणानं आमच्या मराठी साहित्य-दरबारातील दोन जबरे लेखक केव्हा लाटून नेले ते समजलंच नाही.  ते म्हणजे यशवंतराव व नानासाहेब गोरे.

यशवंतराव साहित्याच्या व्यासपीठावर स्वतःला हरवून किती रंगून जात हे बघणं हाही एक जिवंत अनुभव होता.  काँटिनेंटल प्रकाशनचे साक्षेपी प्रकाशक अनंतराव कुलकर्णी यांनी छत्रपती शिवराय हे यशवंतांचं महाकाव्य पुण्यात १९६८ साली बालगंधर्व रंगमंदिरात यशवंतरावांच्या हस्ते प्रकाशित केलं.  काँटिनेंटलचा तो जाहीर असा पहिलाच समारंभ असल्यानं सर्व काँटिनेंटलकरांनी त्याचं भव्य असं आयोजन केलं होतं.

त्या दिवशी व्यासपीठावर कुसुमाग्रज, भाऊसाहेब खांडेकर, कवी यशवंत, हरिभाऊ पाटसकर अशा दिग्गजांच्या मखरात यशवंतराव अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून मध्यभागी बसले होते.  पुरं बालगंधर्व छत्रपती शिवरायांवरील ''महाकाव्य'', रचनाकार कवी यशवंत व काव्यावर बोलणारे कवी कुसुमाग्रज व भाऊसाहेब अशा दुर्मिळ मेळामुळं खचाखच तुडुंबलं होतं.  साहित्यातील झाडून सारं आघाडीचं क्रीम उपस्थित होतं.  प्रेक्षकांत पहिल्या रांगेतच पु. ल., ना. सी. फडके, ग. दि. मा., द. र. कवठेकर असे आमंत्रित साहित्यिक बसले होते.