• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ७२

मी चौकशी करता समजले की, ते युध्दकालानंतर बांधलेले थिएटर आहे. काल संध्याकाळी ७ ते ९॥ आम्ही 'अॅना करेनिना' हा बॅले पाहिला. दोन हजार लोक बसतील एवढे प्रेक्षागृह आहे. त्याच थिएटरमध्ये दुसरेही प्रेक्षागृह आहे. तेथेही एक हजार प्रेक्षकांची सोय असून त्या वेळी त्या ठिकाणी कॉन्सर्ट चालू होता.

येथील अॅडमिनिस्ट्रेशनच्या कार्यालयात दीड दोन तास घालविले. त्यांच्या व्हाइस चेअरमननी तेथे चालू असलेल्या विविध कार्यांच्या प्रगतीचा तपशील दिला. अर्धा पाऊण तास त्यांनी, आम्ही आता पुरे म्हणावे, अशा थाटात स्टॅटिस्टिक्सची भेंडोळी आमच्या अंगावर फेकली. अर्थात् ही सर्व वस्तुस्थितिनिदर्शक माहिती होती. I was really impressed.

दुपारी जेवणानंतर 'सिटी ऑफ सायन्स' २०-२५ मैलांवर आहे, तेथे गेलो. सोव्हिएटच्या नेत्यांच्या दूरदृष्टीचा खरा पुरावा मला येथे दिसला. तेथील उपप्रमुखांनी संस्था, केव्हा, कशी व का सुरू झाली याची साद्यंत माहिती प्रथमच दिली. या अॅकॅडमीची पुढील कार्य-दिशा आणि मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत तेही स्पष्ट केले.

१९५७ मध्ये सेंट्रल कमिटीने प्रथम निर्णय घेतला की, सैबेरियामध्ये विज्ञानाचे केंद्र स्थापित करावयाचे. पुढे त्याची अंमलबजावणी झाली. अजूनही होत आहे. राष्ट्रीय प्रमुख केंद्रापासून दूर विभागात विज्ञानाचा पाया प्रस्थापित केला पाहिजे हे एक मूलसूत्र! Deconcentration. त्याचबरोबर अनेकविध संपत्तीनी भरलेल्या सैबेरियाचा विकास म्हणजे फक्त उद्योगधंदे काढून ती संपत्ती वापरणे असाच त्याचा उद्देश असता कामा नये.

त्याचबरोबर त्या प्रदेशात देशातील पहिल्या प्रतीच्या वैज्ञानिकांनी जाऊन राहिले पाहिजे. तेथे आपले कार्यक्षेत्र केले पाहिजे. त्या प्रदेशातील निवडक, पहिल्या प्रतीच्या तरुणांना निवडून त्यांच्यामध्ये विज्ञानाचा प्रसार केला पाहिजे. मूलतत्त्वांच्या संशोधनाबरोबरच तेथील प्रश्नांच्या व परिस्थितीच्या संदर्भातही संशोधन झाले पाहिजे अशी तत्त्वप्रणाली त्यांच्यापुढे होती. यामध्ये फार दूरदृष्टि होती.

प्रदेशाचा विकास म्हणजे फक्त साधन-संपत्तीचा विकास व वापर नव्हे तर तेथील जनजीवनाचा विकास. हे करावयाचे तर आधुनिक जीवनाची कार्यशील प्रेरणा म्हणजे विज्ञान - त्याची वाढ केली पाहिजे. विज्ञानावर आधारलेली संस्कृति हा जनजीवनाचा स्थायीभाव करावयाचा असेल तर असा ऐतिहासिक महत्त्वाचा निर्णय आवश्यक होता. त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

सायन्सच्या सर्व प्रमुख शाखांच्या संशोधन-संस्था येथे प्रस्थापित आहेत. मॉस्को, लेनिनग्राड व तिसरी नोवोसिबिर्रस्क अशी विज्ञानाची तीन केंद्रे मानली जातात.

महत्त्वाचे मानले गेलेले तज्ज्ञ येथे येऊन राहिले आहेत. जगातील महत्त्वाच्या विश्वविद्यालयांशी त्यांचे संबंध आहेत. एक नवी पिढी बनली आहे. नवे विश्वविद्यालय याच कँपस्वर आहे. या कँपस्ची लोकसंख्या दहा हजार आहे.

सैबेरियामध्ये इतर दोन ठिकाणीही नवी केंद्रे सुरू केली आहेत. याकुत (Yakut) (पूर्व सैबेरिया) मध्ये असेच केंद्र आहे. संशोधनाचे नवे विषय येथील भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर निवडले आहेत. उदाहरणार्थ - येथील मैलोगणती जमीन नित्य बर्फाच्छादित असते. तेव्हा त्या जमीनीची परिस्थिती-तिचा उपयोग, तेथील प्राणी, यांच्या संदर्भात याकुतमध्ये एक इन्स्टिटयूट फक्त हेच संशोधन-कार्य करीत आहे.

सैबेरिया ही सोविएत रशियाची एक जबरदस्त शक्ति आहे व ती अधिकाधिक शक्तिमान होऊन राहिली आहे.

आम्हाला पुष्कळ पाहाण्यासारखे व शिकण्यासारखे आहे. आज जे मी पाहिले त्याचा माझ्यावर परिणाम झाला आहे. पाहिल्याचा आनंद आहे. नवी नजर यातून मिळते. आम्ही ती केव्हातरी वापरू या आशेनेच हे लिहिले आहे.