• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ४८

२० होनोलुलू

२ ऑक्टोबर, १९७२

आज गांधीजींचा जन्मदिन. घरापासून हजारो मैल दूर, काल रात्री आम्ही तो साजरा केला.

सॅन्फ्रॅन्सिस्कोहून काल विमान तीन तास उशीरा निघाले. त्यामुळे येथील लोकांची मोठी गैरसोय झाली. त्यांनी स्वागत-समारंभ व नंतर जेवण ठेवले होते.

विमानतळावरून मिसेस् वाटूमल, - येथील भारताच्या कौन्सल - यांनी आपल्या गाडीतून ईस्ट-वेस्ट-सेंटर मधील या समारंभ-स्थळी आणले. या बाई आपल्या पतीच्या मागे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

अमेरिकन आहेत त्या. वय ७२-७३ असावे. छोटीशी मूर्ति परंतु अपूर्व उत्साह. स्वत: मोटार चालवीत १०-१५ मैलांच्या प्रवासात मला सर्व काही स्थानिक माहिती आणि कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली.

मी अर्धा-एक तास भारतीय परिस्थितीवर बोललो. भारतीय बरेचसे होते. अमेरिकन्सही काही होते. वॉशिंग्टन पोस्टचा सेलीम हॅरिसन आपल्या पत्नीसह हजर होता.

दिल्लीनंतर त्यांची येथे भेट झाली. आम्हा दोघांनाही आश्चर्य आणि आनंद वाटला. वॉशिंग्टन येथील प्रेस क्लबमधील माझ्या भाषणात त्याच्या 'डेंजरस डिकेड' चा उल्लेख केला होता. तो त्याच्या त्याच्या पाहण्यात आलेला दिसला. काही महाराष्ट्रीय तरुण शिक्षणासाठी आलेले भेटले. एक तरुण 'काका' म्हणत जेव्हा जवळ आला तेव्हा तर फारच आनंद झाला.

रॉयल हवाईन हॉटेल मध्ये उतरलो आहे. या शहरात असंख्य राजेशाही हॉटेल्स आहेत. सबंध हावाईची लोकसंख्या दहा लाख; तर दरसाल १० ते १५ लाख बाहेरून येतात.

समुद्रकाठी हॉटेलची रांगच रांग आहे. आता मी अथांग पसरलेला समुद्र व रेशमी वाळूचे लांबच लांब पसरलेले बीच पहात पहात माझ्या खोलीत बसून हे लिहीत आहे. मुंबईसारखी हवा, जुहूसारखे वातावरण, मरीनड्राईव्हसारखा रस्ता. नेहरू शर्ट चुरीदार घालून बीचवर फेरफटका मारून आलो.

दुपारी ४ वाजता जपानसाठी प्रस्थान ठेवायचे आहे. त्यापूर्वी पर्ल हार्बर पाहून येणार आहे. आणखीही काही प्रेक्षणीय स्थळे पाहीन म्हणतो. वेळ थोडा आणि पाहण्यासारखे फार! जमेल तेवढे पहावे.

काही घ्यावे म्हणून येथील दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृति फार आवडली. किंमत ६५० डॉलर्स म्हणजे जवळ जवळ पाच हजार रुपये. म्हटले रामराम! निदान नेत्रसुख तरी लाभले.