• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ४०

१५ व्हिएन्ना
२३ एप्रिल, १९७२

आभाळ भरून आले आहे. पावसाची रिमझिम चालू आहे. वातावरण धुक्याचेच आहे. परंतु डॅन्यूबच्या खो-यात सफर करण्याचा विचार आम्ही अमलात आणलाच.

सकाळी ९॥ वाजता सामानाची बांधाबांध करून हॉटेल सोडले. मेल्क Monastry पाहण्यासाठी बाहेर पडलो. हे ठिकाण व्हिएन्नाहून १२५-१५० किलोमीटर असावे. राजरस्त्याने वेगाने प्रवास सुरू होता. समुद्रसपाटीपासून ४००-५०० फूटच उंच, परंतु हिरव्यागार वनराजीने भरलेल्या डोंगराळ मुलुखातून हा रस्ता जात होता. उंच वृक्ष, हरित शेते, उजव्या बाजूने थोडया अंतरावर चाललेली डॅन्यूब नदी असा हा सुरेख प्रवास होता.

मेल्क मोनॅस्ट्री हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. त्याच्या पाठीमागे शेकडो वर्षांचा इतिहास आहे. आज असलेली मोनॅस्ट्री सतराव्या शतकात बांधलेली आहे. त्याच्यापूर्वीची अशीच मोठी असलेली इमारत पाडून नव्या बॉराक शिल्पपध्दतीने ही नवीन बांधली आहे.

मोनॅस्ट्री हे खरे म्हणजे धर्मशिक्षणाचे केंद्र. त्याच हेतूने ते बांधले होते. आजही तेथे धर्मगुरूंच्या शिक्षणाचे काम चालू आहे. परंतु धार्मिक लढयांसाठी आवश्यक असलेल्या किल्ल्याचे त्याचे स्वरूप होते असे म्हटले तर ते अधिक युक्त होईल. त्याचा तसा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

तुर्कांच्या कब्जातून जेरुसलेम मुक्त करण्यासाठी युरोपमधून जाणा-या crusaders चे विश्रांतिस्थान होते. हा विशाल राजवाडाही आहे. ऑस्ट्रियाचे सम्राट-सम्राज्ञी येथे येऊन राहात असत.

एका सम्राटाने मधुचंद्रासाठीही येथे येऊन मुक्काम केला होता. त्यामुळे काही खोल्यांतील सजावट फारच कलापूर्ण व राजेशाहीची आहे. ऑस्ट्रियाची कर्तबगार सम्राज्ञी मेरिया थेरॅसो येथे येऊन राहात असे.

नोपोलियननेही येथे येऊन दोन वेळा मुक्काम केला होता. त्याच्या सुरेख हस्ताक्षरांतील एक पत्र येथील लायब्ररीमध्ये मुद्दाम आठवणीसाठी ठेवले आहे. जुने हस्ताक्षरांतील व इतर छापील सात-आठ हजार ग्रंथ येथील लायब्ररीत आजही आहेत.

डॅन्यूबच्या काठचा हा प्रासाददुर्ग आणि त्याच्या जवळून वाहणारी विशाल डॅन्यूब पाहून मन प्रसन्न झाले. सुमारे दीड-दोन तास ही मोनॅस्ट्री आम्ही पहात होतो. नंतर मोटारबोटीवर चढून डॅन्यूब ओलांडली. वर डॅन्यूबच्या काठाकाठाने जाणा-या रस्त्याने परतीचा प्रवास सुरू केला.

नदीकाठाने, निसर्गसौंदर्याने बहरून गेलेल्या या प्रदेशातून प्रवास करताना अनेक आठवणींनी मन भरून आले. कवींनी व लेखकांनी वर्णिलेली मध्युगीन निळीभोर डॅन्यूब आज राहिलेली नाही.

औद्योगिक युगातील आजची डॅन्यूब ही वेगळी आहे. परंतु काठोकाठ भरून वेगाने वाहणारी नदी पाहिली की मला फार आनंद होतो. आषाढ-श्रावणात काठोकाठ भरून वाहणा-या कृष्णा-कोयनेच्या काठच्या माझ्यासारख्या माणसाच्या मनात जुन्या काळच्या स्मृतींनी गर्दी केली तर आर्श्चय कसले!

वाटेत Hotel Schlob Durnstein या डॅन्यूब काठच्या छोटेखानी गावातील सुंदर हॉटेलमध्ये आरामशीर खाना घेतला. अॅम्बेसडर श्री. त्रिवेदी व श्रीमति त्रिवेदी आमची देखभाल करण्यासाठी बरोबर असल्याने आम्हास काहीही कमी नव्हते. थोडी विश्रांति घेऊन स्टॉकहोमचे विमान गाठण्यासाठी व्हिएन्नाच्या विमानतळाकडे त्या सुंदर रस्त्याने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला.