१४ व्हिएन्ना
२२, एप्रिल, १९७२
आज दुपारी ए. डी. बी. ची सभा संपली. माझे भाषण कालच झाले. सर्व देश आपापले निवेदन करतात. विकासशील देशांमार्फत अधिक स्पष्टपणे बाजू मांडण्याचे काम भारताला नेहमीच करावे लागते. याही खेपेला काही विचार परखडपणे मांडावे लागले.
आशियातील सर्व प्रतिनिधींना आनंद वाटला. पण स्वत: मात्र सर्वजण जपून, सांभाळून बोलले. बँकेचे अध्यक्ष श्री. वॉटनबी यांच्याशी सभेनंतर चर्चा झाली. बांगला देशाचा प्रश्न अधिक तपशीलाने मांडला.
हा गृहस्थ फार सावधपणे बोलतो. सहानुभूति आहे. कायद्याच्या काही अडचणी सांगत होता. परंतु शेवटी मदत करील असा अंदाज आला.
ऑस्ट्रियाचा अर्थमंत्री ३४ वर्षाचा समाजवादी विचाराचा तरुण आहे. त्याच्याशी आणि इंग्लंडचे मंत्री रिचर्ड वूड (लार्ड हॅलिफॅक्सचा मुलगा) यांच्याशी हिंदुस्थानच्या आर्थिक व परदेशी कर्जांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. परदेशी मदतीबाबत अमेरिकेच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर खरी चर्चा झाली.
हा प्रश्न आम्ही अधिक काळ लोंबकळत ठेवणार नाही. आम्हाला काही पावले निर्धाराने टाकावी लागतील असे मी सूचित केले. या प्रश्नाबाबत विशेष चर्चा श्री. पीटर कारगिल यांच्याशी झाली. हिंदुस्थानच्या वतीने, मदत देणा-या राष्ट्रांशी त्याला नित्य बोलावे लागते. तेव्हा आमच्या धोरणाची पूर्वसूचना त्यांना स्पष्टपणे देणे आवश्यक होते.
श्री. आय. जी पटेल यांनीही त्याच्याशी तपशीलावर चर्चा केलेली होतीच. पीटरला अमेरिकेची नीति नामंजूर आहे. अर्थात् त्याने आपला सल्ला देऊ केला नाही. परंतु आम्ही काही कडक उपाय योजले तर ते समजण्यासारखे आहेत व इतर देशांचाही त्यामुळे गैरसमज होऊ नये असे तो म्हणाला. येथून परत आल्यानंतर या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करावा लागणार आहे.
व्हिएन्ना हे इतिहासप्रसिध्द आणि युरोपमधील एक प्रकारे सांस्कृतिक केंद्र आहे. ऑस्ट्रिया आता एक फार मोठा देश आहे. परंतु एकवेळ मध्ययुरोपातील अत्यंत प्रबळ साम्राज्याचे हे केंद्र होते. त्याची साक्ष आजही या शहरामध्ये ठायी ठायी दिसते. इतक्या प्राचीन व कलाकुसरीने संपन्न अशा अनेक सुंदर इमारती व विशाल राजवाडे, दुस-या कुठल्याही एका शहरात असतील असे वाटत नाही.
या देशामध्ये भाषा जर्मन बोलली जाते. परंतु हे लोक स्वत:ला जर्मन समजत नाहीत. त्यांची जर्मन सॉफ्ट आहे असे तेहून सांगतात. या देशावर तुर्कांची अनेक आक्रमणे झाली परंतु ती त्यांनी परतवून लावली. हिटलरने देश जिंकल्यानंतर मात्र अनेक संकटपरंपरा आल्या. पण शेवटी हा देश मजबूत निघाला. आज तसा पुष्कळ प्रगत देश आहे. स्थिर लोकशाही समाजवादी सरकार येथे संपन्न आहे.